८४ वर्षांचा घरोबा संपवून शापूरजी पालनजी टाटासमूहातुन का बाहेर पडले?

८४ वर्षांनंतर शापूरजी पालनजी उद्योग समुह काल अखेर टाटा उद्योग समुहातुन बाहेर पडल्याची बातमी आली. पण या वादाची सुरुवात २०१४ च्या आसपासच झाली होती. या वादाची कारण आणि शापूरजी – पालनजी उद्योग समुह कोण होता, टाटा समुहाशी त्यांचा संबंध कधी आला या सगळ्याचा ‘बोल भिडू’नं घेतलेला आढावा…..

आजपासून बरोबर १५५ वर्षांपुर्वी म्हणजे १८६५ मध्ये मुंबईमधील गोरेगाव चौपाटीवर एक फुटपाथ बनविण्याचं काम सुरु होतं. गुजरातच्या सुरत जवळील वेसा भागातुन आलेला तरुण हे काम करत होता.

लिटीलवुड पालनजी मिस्त्री असं त्यांच नावं. हे त्याच्या कंपनीला मिळालेलं पहिलचं काम होतं.

पुढे १८६८ मध्ये टाटा ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपसाठी पालनजी यांना अॅटोमोबाईल फॅक्टरी आणि स्टील प्लांट बांधण्यांच कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. आणि इथूनच पालनजी – टाटा समूहाचा संबंध येण्यास सुरुवात झाली.

पालनजी आणि टाटा यां दोघांच्याही कामाची ती नवीनच वर्ष होती.

पुढे १८८०च्या दरम्यान पालोनजी यांना मलबार हिलमधील जलाशय बांधण्याच काम मिळालं. या जलाशयामुळं मुंबईचा पुढचा १५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटला. आजही हा जलाशय मुंबईकरांची तहान भागवत आहे. २०१८ मध्ये महानगरपालिकेनं या जलाशयाच नुतनीकरण करुन २० टक्के साठवण क्षमता वाढवली आहे.

१९२१ साली शापूरजी पालनजी कंपनीची स्थापना :

लिटीलवुड पालनजी यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा शापूरजी पालनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायात आले. मॅट्रिक ही न झालेल्या या उद्योजकानं आपली आर्थिक घडी बसविण्यासाठी शापूरजी पालनजी कंस्ट्रक्शन या फर्मखाली आपला सगळा उद्योग आणला. यानंतर त्यांनी मुंबईसह देशभरामध्ये आपला बांधकाम व्यवसाय वाढवला.

तसेच टाटा ग्रुपसाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्लांट बनविण्याचं काम मिळालं. काही संदर्भ असेही वाचनात आले की त्यावेळी टाटा समूहाकडे या कामाचे पैसे रोख स्वरुपात देण्यासाठी नव्हते. अशावेळी झालेल्या रक्कमेच्या किंमतीएवढे टाटांनी त्यांना आपल्या कंपनीचे काही शेअर्स देवू केले.

शापूरजी ही आपला व्यवसाय वाढवत होते.

पुढे १९२८ च्या दरम्यान बेलासीस रेल्वे स्टेशनचं (आताचे मुंबई सेंट्रल) नुतनीकरण करण्याच ठरवलं. त्यावेळचं हे सर्वात मोठं म्हणजे १.६ कोटी रुपयांच काम पालनजी समुहाला मिळालं. त्यांनी रेकॉर्डब्रेक २१ महिन्यांमध्ये हे काम पुर्ण केल्याचं मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर सर स्यायकीस सांगितलं.

हे काम पाहून पुढे गव्हर्नर पदी आलेल्या लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बांधकामाचं कामं दिलं. हे काम देखील वर्षभरात पुर्ण करुन १९३८ ला उद्घाटन पण झालं.

टाटा ग्रुपची शेअर होल्डर कंपनी :

शापूरजी पालोनजी आणि टाटा ग्रुपच्या व्यावसायिक संबंधाची प्रत्यक्ष सुरुवात १९३६ मध्ये झाली. पालनजी उद्योग समुहाची आर्थिक स्थिती सुधारत होती. तेव्हा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पालनजी यांनी एफ.इ.दिनशॉ आणि कंपनीच्या संस्थापकांचा मृत्यु झाल्यानंतर ही कंपनी विकत घेतली.

या दिनशॉचे टाटा समुहामध्ये जवळपास १२.५ टक्के शेअर्स होते. ते सर्व पालोनजी यांच्या नावावर झाले. इथूनच पालोनजी – टाटा हे दोन्ही समुह एकत्र आले.

पालनजी मिस्त्रींनी समुह वाढवला.

शापूरजी पालनजी यांच्या मृत्युनंतर १९७५ ला उच्च शिक्षीत पालनजी मिस्त्री प्रमुख झाले. शापूरजी पालनजी इंजीनियरिंग एंड कंस्ट्रक्शन, ऐफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर, फोर्ब्स टेक्सटाईल्स, गोकक टेक्सटाईल्स, यूरेका फोर्ब्स, फोर्ब्स एंड कंपनी, शापूरजी पालनजी कंस्ट्रक्शन मटेरियल्स ग्रुप, शापूरजी पालनजी रियल इस्टेट, नेक्स्ट जेन आज जवळपास १६ उपकंपन्या या शापुरजी पालनजी समुहाच्या मालकीच्या आहेत.

मार्च २०१९ मध्ये ४५ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असल्याचं अहवालात सांगितलं आहे.

आज जवळपास १७ लिस्टेड कंपन्यांच्या टाटा ग्रुपची मार्केट व्हॅल्यु १२.९६ लाख कोटी रुपये इतकी आहे. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे १८.३७ टक्क्यांच्या शेअर्स होल्डरसह (१ लाख ८० हजार कोटी) शापूरजी पालनजी उद्योग समुहाची ओळख होती.

वाद कुठे सुरु झाला :

२०१२ चा डिसेंबर महिना. टाटा समुहाचे तत्कालिन अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या समुहाच्या वारसदाराचं नाव जाहिर केलं. ४४ वर्षीय तरुण उद्योगपती सायरस मिस्त्री असं त्यांच नाव होतं. टाटा समुहामध्ये १८.३७ टक्क्यांची भागीदारी असणाऱ्या पालनजी मिस्त्री यांचे ते पुत्र आणि शापूरजी पालनजी उद्योगाचे संचालक होते

२००६ मध्ये वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी टाटा सन्सच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली होती.आणि तेव्हाच त्यांचं नाव प्रथम चर्चेत आलं.

सहा वर्ष प्रत्यक्ष काम केल्यानं त्यांना टाटा समुहाच्या व्यवाहारांची पुर्ण माहिती आहे. त्यामुळे ते ही जबाबदारी उत्तम संभाळतील अशा शब्दात रतन टाटांनी त्यांच नाव जाहिर केलं.

मात्र २४ ऑक्टोंबर २०१६ रोजी भारतातीलं उद्योगविश्व अक्षरशः हादरुन गेलं.

ही बातमी होती भारताच्या उद्योगविश्वातील सर्वात मोठ्या भुकंपाची. रतन टाटांनी एक इमर्जन्सी मिटींग बोलावून टाटा सन्सचे तत्कालिन प्रमुख सायरस मिस्त्री ह्यांची आपले विशेष अधिकार वापरुन आणि इतर संचालकांच्या मदतीने हकालपट्टी केली.

पण असं काय झालं होतं की स्वतःच निवडलेल्या नेतृत्वाला इतकं तडकाफडकी काढून टाकण्याची वेळ आली?

ह्या सगळ्यांचं मुळ नोव्हेंबर २००९ मध्ये झालेल्या एका करारामध्ये होते. तेव्हा भारतात नव्यानं उभं होत असलेल्या टेलिकॉम क्षेत्रात टाटा टेलिसर्व्हिस ही कंपनी आपल्यासाठी एक परदेशी भागीदार शोधत होती.

त्यावेळची जापानी कंपनी डोकोमोने टाटा टेलिसर्व्हिसमधील २६.५ टक्के शेअर्स ११७ रुपये प्रति शेअर्स मोजून खरेदी केले.

तसेच डोकोमो टाटा टेलिसर्व्हिसेमधून ५ वर्षांमध्ये बाहेर पडले तर कराराच्या ५० टक्के रक्कम तिला देण्यात येईल. ही अट मान्य झाली आणि करार पुर्ण झाला,

हा सगळा करार रतन टाटांच्या विश्वासावर झाला होता.

२०१३-२०१४ पर्यंत टेलिकम्युनिकेशन व्यवसायातल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे, सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे टाटा इंडिकॉमला कधीच अपेक्षेएवढं यश मिळालं नाही.

कंपनी दिवसेंदिवस तोट्यात जात होती. अशावेळी कराराप्रमाणे ७ हजार २०० कोटी रुपयांची मागणी केली.

मात्र, सायरस यांचा कायद्याचा जबरदस्त अभ्यास असल्यामुळे टाटा समूहानं आरबीआयच्या एका कायद्याचा हवाला देत डोकोमोला प्रति समभाग २३.३४ रुपये देऊ केले. यामुळे डोकोमोने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादापुढे नेले.

लवादामध्ये हा निकाल टाटांच्या विरोधात लागला. आणि टाटा समुहानं डोकोमोला नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं.

यावेळी दिल्ली न्यायालयात दोन्ही कंपन्यांनी अटी व शर्थी मान्य करत समेट घडवून आणला. पण या सगळ्या प्रकरणामुळे टाटा आणि मिस्त्री यांनी कायद्याचा आधार घेऊन डोकोमोला धोका देत आहेत अशी प्रतिमा होवून टाटांच्या नावाला आणि विश्वाला तडा जाणार हे रतन टाटांनी गृहीत धरलं.

त्याचसोबत टाटा ग्रुपची हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी अंतर्गत चालत असलेल्या हॉटेल्समधील भागीदारी त्यांनी कमी केली किंवा विकली. तसेच ताज बॉस्टन हॉटेल, ब्लु सिडनी हॉटेल यांची विक्री केली. टाटा केमिकल्सने आपला युरियाचा व्यापार नॉर्वेच्या एका कंपनी विकला. मिस्त्रींच्या या निर्णयाने संचालक मंडळातील बरेचसे जण खूश नव्हते.

तसेच रतन टाटांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या टाटा नॅनोचं उत्पादन देखील मिस्त्री बंद करु इच्छित होते.

मात्र मिस्त्री या सर्व आरोपांच खंडन केले. डोकोमोच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले गेले ते सर्व संचालक मंडळाच्या संमत्तीनेच घेतले असल्याचं मिस्त्रींनी सांगितलं. या सर्व कारणांमुळे व्यवस्थापन आणि मिस्त्री यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानं २४ ऑक्‍टोबर २०१६ रोजी मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली.

इथं वरचं न थांबता अध्यक्षपद गेल्यानंतरही मिस्त्री हे टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते.

यानंतर या सर्व कंपन्यांच्या विशेष सर्वसाधारण सभा बोलावून मिस्त्री यांना काढण्याचा रतन टाटा यांनी सपाटाच लावला. टाटा इंडस्ट्रीज, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, इंडियन हॉटेल्स, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा पॉवर अँड स्टील यांनीही अशा सगळ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावरुन त्यांना हटवलं गेलं.

२०१७ ला वाद कोर्टात :

या हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्याकडून गैरव्यवस्थापन आणि दुराचार झाल्याचा त्यांनी याचिकेत केलेल्या आरोपातही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती.

दोन सदस्यीय अपील न्यायाधिकरणानं जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि रतन टाटा यांचं मिस्त्री यांच्याशी वर्तन अन्यायकारक असल्याचं १८ डिसेंबरला अंतिम निकाल दिला.

टाटा सन्सचे सार्वजनिक कंपनी ते खासगी मर्यादित कंपनीत रूपांतरणही बेकायदेशीर ठरविताना, तिला पुन्हा सार्वजनिक कंपनीचे मूळ रूप प्रदान केले जावे, असे अपील न्यायाधिकरणानं आदेशात म्हटलं.

मात्र राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. ती मान्य झाली. आणि मिस्त्रींच्या जागी आलेले नटराजन चंद्रशेखरन कायम राहिले.

२२ तारखेला काय झालं ?

शापूरजी-पालनजी समूह कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सध्या आर्थिक संकटात आहे. आम्हाला रोख चणचण जाणवत असून निधी उभारणीसाठी त्यांनी टाटा समूहाचे शेअर गहाण ठेवण्याचा प्रस्ताव न्यायालयात दाखल केल्याचं मिस्त्री यांच्या वकिलांनी सांगितलं.

मात्र टाटा समूहाचे शेअर गहाण ठेवलयास ते इतर गुंतवणूकदारांच्या हाती जातील. जे लोक भविष्यात टाटा समूहाला हानी पोहचवू शकतात. शेअर गहाण ठेवणं टाटा समूहासाठी जोखमीचं आहे, असा युक्तिवाद टाटा समूहाच्या वकिलानी केला.

तसेच मिस्त्री कुटुंबीयांची सर्व १८ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची तयारी टाटा समुहानं दर्शवली.

त्याचवेळी शापूरजी पालनजी समुहानं स्पष्ट केलं की आता टाटा ग्रुपमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

आणि काल अखेर हा निर्णय झाला.

तसेच आता जर हे १८.३७ टक्के शेअर्स (सध्याच्या भावानुसार १ लाख ८० हजार कोटी रुपये) विकण्यासाठी पहिली ऑफर टाटा समुहालाच द्यावी लागणार आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.