त्याने ५० वर्षापूर्वी MRF चे १२० शेअर्स विकत घेतले होते, त्याच आज काय झालय माहितय का?

परवा आम्ही असच शेअर मार्केट पडला कसा यावर लेख लिहायचा म्हणून अभ्यास करत होतो. एखाद्या शेअरने आम्हालाही भुरळ घातली होती. नुकताच पगार झालेला, आपण पण शेअरखान व्हाव का असा विचार आम्ही सहकाऱ्याला बोलून दाखवला. तेव्हा आमच्या सोसायटीतले पांढरी टोपी वाले काका नेहमी प्रमाणे खिडकीत राहून आमची चर्चा ऐकत होते. त्यांनी आम्हाला खिडकीतूनच चॅलेंज दिल.

“शेअर मार्केट म्हणजे जुगार !! त्यात पैसे कमावलेला एक माणूस दाखव काय समजले भिडू ??”

ही गोष्ट आमच्या मनाला लागली.

आपल्या मराठी माणसाच एकच ध्येय  ११ ते ५ नोकरी, सुंदरशी छोकरी, दसऱ्याला श्रीखंड पुरी, इंजीनियरिंग करायला लावायला दोन गोंडस मुल, दाराशी एक मारुती कार. गंगा न्हाली. याच्या पुढ आमच ध्येयच काही नसत. भारतातलं सगळ्यात मोठ शेअर मार्केट आपल्या मुंबईत आहे पण आपण त्याच्या पासून चार फुट लांब असतो.आमच आबाआज्जा चुकून जरी पैसा आला तर सातबारा वाढवण्यात आणि आयामाया गुंजगुंज सोनं वाढवण्यात गेले.

तरी एखादा तरी भिडू असेल ज्याने हा चमत्कार केला असेल या ध्येयाने आम्ही शोधपत्रकारिता पणाला लावली. शेवटी एकजन सापडलाच.

त्या भिडूचं नाव शरद बनवाडीकर!

तर या शरद बनवाडीकर यांची गोष्ट एकदम साधी सोपी आहे. त्यांनी १९६८ साली एमआरएफ कंपनीचे साडे सतरा रुपयाने १२० शेअर्स घेतले. खर तर त्यांच्या वडिलांनी त्यांना ते शेअर्स घेण्यासाठी प्रेरणा दिली.(असं वडील प्रत्येकाला मिळोत) साडे सतरा रुपयाने या शेअर्सची किंमत झाली ८७५ रुपये. शरदरावांच तेव्हा वय होतं २१ वर्ष.

मग काही नाही. त्यानंतर शरद रावांनी गुंतवणूक केली आणि वाट बघायचं ठरवलं. किती वर्ष तर गेली पन्नास वर्ष त्यांनी हे शेअर विकले नाहीत.

दरम्यानच्या काळात खूप काय काय गोष्टी घडल्या. इंदिरा गांधीनी आणीबाणी लावली, राजीव गांधीनी बाबरीच दार उघडल, नरसिंहरावांनी जागतिकीकरण आणलं, धोनी रनआउट झाला, मोदीनी नोटबंदी केली. प्रत्येक गोष्टीवेळी एखाद्या चंचल नर्तिकेप्रमाणे शेअरमार्केटने नृत्य केलं. कधी खाली कोसळली तर कधी रफाल विमानाप्रमाणे आकाशात भरारी घेतली. अनेक कंपन्या मातीमोल झाल्या, अनेक कंपन्यानी दुनिया मुठ्ठीमें काबीज केलं.

पण MRF चा चढता सुरज चढता ही रहा.

आज त्या साडे सतरा रुपयाच्या किंमतीच्या शेअरची किंमत काय आहे माहित आहे काय? साठ हजार रुपये. सहावर चार पूज्ज्य.

अब दिल थांबके सुनिये शरदरावांच्या साडे आठशे रुपयांच्या शेअर्सची किंमत दोन हजार पटीने वाढली. तिची किंमत झाली बाहत्तर लाख रुपये. शरदाच चांदण एकदम उजळूनच गेल की. हा एकप्रकारचा जागतिक विक्रम असेल. शरद नावाची माणस जरा गुंतवणुकीच्या बाबतीत लकीच म्हणायची.

पण बनवाडीकर साहेब यांच्या मते यात कोणतेही लक नाही. त्यांनी वडिलांनी सांगितलं म्हणून एमआरएफचे शेअर्स घेतले पण वर्षानुवर्षे त्याचा अभ्यास केला.

एमआरएफ म्हणजे मद्रास रबर कंपनी १९४६ मध्ये तामिळनाडूमध्ये स्थापन झाली. सुरवातीला फुगा खेळणी बनवणाऱ्या के.एल.मप्पीलाई यांनी स्वातंत्र्यानंतर टायर बनवण्याच्या उद्योगात उडी घेतली. १ एप्रिल १९६१ रोजी एमआरएफचे शेअर्स पब्लिक करण्यात आले. काहीच वर्षात अमेरिकेला टायर निर्यात करणारी ती पहिली भारतीय कंपनी बनली.
आज प्रत्येक लहानमोठ्याला टायर कंपनी म्हटल तर MRF चं नाव तोंडात येते.

अनेक वर्ष सचिनच्या बॅटवर आणि नंतर विराट कोहलीच्या बॅटवर झळकणाऱ्या एमआरएफचे शेअर्स सोन्यासारखे आहेत हे सांगायला कोणा पोपटवाल्या जोतिष्याची गरज नाही. 

शरदराव बनवाडीकरानी देखील अजूनही ते शेअर विकले नाहीत. वेळोवेळी MRF ने त्यांना बोनस शेअर दिले. त्यावरील डिव्हिडंड दिला. अजून सुद्धा त्यांचे हे शेअर विकण्याचा प्लॅन नाही.

तर आम्ही आमच्या सोसायटीवाल्या पांढरी टोपीवाल्या काकांना अभिमानाने ही मराठी माणसाच्या शेअर मार्केटच्या सक्सेसची स्टोरी सांगितली. तर ते खो खो हसले आणि म्हणाले,

“अरे लेका त्या बनवाडीकराच काय कौतुक सांगताय? आमच्या बापाने त्याच काळात चांगले दहा हजार रुपये मोजून हा विधी महाविद्यालयाजवळचा प्लॉट विकत घेतला होता. मी वीस वर्षापूर्वी तो बिल्डरला दोन कोटीला विकला. आता घाल बोटे आणि कर गणित. तुमच शेअर भारी की आमचा प्लॉट भारी?”

आमच कन्फ्युजन आणखी वाढल बाकी काही नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.