शेतकरी संघटनेच्या आंदोलनात राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ दिला नाही.

सत्तरच्या दशकातला काळ. पहिला आणीबाणीचा तडाखा आणि नंतर जनता पक्षाच्या कारभाराचा गोंधळ यामुळे संपूर्ण देशाची घडी विस्कटली गेली होती. लायसन्सरराज तेव्हा आपल्या चरमसीमेवर होता. याचा फटका उद्योगक्षेत्राबरोबर छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना देखील बसत होता. शेतकऱ्याची अवस्था अधिक खडतर बनत होती.

अशातच शरद जोशी नावाचं एक नवं नेतृत्व शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालं.

शरद जोशी म्हणजे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ. एकेकाळी प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्द सुरु केली. पुढे फ्रान्स व युरोपमध्ये काही काळ काम केलं. स्वित्झर्लंड येथे आंतरराष्ट्रीय पत्रव्ययव्हाराचे नियमन करणाऱ्या संस्थेत आठ वर्षे नोकरी केली. मात्र देशाच्या मातीच्या ओढीने परत आले.

नुसता परत आले नाहीत तर पुण्याजवळच्या आंबेठाण येथे जमीन घेऊन थेट शेतकरी बनले.  

शरद जोशी यांना या पूर्वी शेतीचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र गावकऱ्यांच्या मदतीने शिकत शिकत त्यांनी पिके घेण्यास सुरवात केली. या निमित्ताने त्यांचा आंबेठाण जवळच्या चाकण बाजारपेठेशी संपर्क यायचा. तिथे निरीक्षण केल्यावर त्यांना जाणवले की सध्याची व्यवस्था शेतकऱ्यांना लुटायच काम करत आहे.

चाकण मध्ये त्यांचा बाबुभाई शहा आणि मामा शिंदे यांच्याशी ओळख झाली. बाबूभाईंचं प्रिंटिंग प्रेस होतं तर मामा शिंदे राष्ट्र सेवा दलाची पार्श्वभूमी असणारे होते. मामा शिंदे याना चाकण परिसरात दुसरे साने गुरुजी म्हणून ओळखलं जायचं. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी केलेलं कार्य सुप्रसिद्ध होतं.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा चाकणच्या पोलिसांना देखील झेंडावंदन कसे करायचे हे ठाऊक नव्हते. तेव्हा राष्ट्र सेवा दलाची शाखा चालवणाऱ्या मामा शिंदे यांनी तिथल्या पोलीस ठाण्यात खांब उभारणे, दोरी लावून तो वर सरकवणे, तो फडकवणे याची पोलिसांना रंगीत तालीम दिली होती.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चाकण मध्ये पहिला झेंडावंदन पार पडला होता. मामा शिंदे म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे. शरद जोशी तर त्यांचे मोठे फॅन बनले होते. मामा शिंदे जेव्हा विधानसभा निवडणुकीला उतरले तेव्हा शरद जोशी स्वतः आपली जीप घेऊन त्यांच्या प्रचारात फिरले होते.

दुर्दैवाने मामा शिंदे यांचा निवडणुकीत पराभव झाला. मात्र या पराभवानंतरही जोशी यांना लोकांच्या एकजुटीमुळे किती फरक पडू शकतो याची ताकद लक्षात आली. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकांचे संघटन उभारण्यास सुरवात केली.

हीच शेतकरी संघटनेची सुरवात होती.

पहिला प्रश्न हाती घेतला तो म्हणजे चाकणचा कांदेबाजार. पूर्वीच्या काळापासून कांदे बाजारात भावाची अनिश्चितता हि कायमची होती. रक्त आटवून घेतलेले कांद्याचं पीक दलालांच्या मध्यस्तीमुळे  ऐनवेळी दर पाडून विकले जायचे. यातच केंद्र सरकारची धोरणे देखील कांद्याच्या पिकाला मार्क होती. ज्यावेळी कांद्याचा दर वाढला आणि शेतकऱ्यांना हातात पैसे येण्याची चिन्हे दिसू लागली कि लगेच निर्यात बंदी करून हे दर पाडले जायचे.

विशेषतः १९७७ पासून ते १९८० या तीन वर्षांच्या कालावधी मध्ये याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. सरकार आणि दलालांच्या संगनमताने कांद्याचे दर पाडले गेले. एकदा कांदा गोदामात गेला की निर्यातबंदी उठवून पुन्हा दर वाढवले जायचे. संपूर्ण देशात सर्वप्रथम शरद जोशींनी या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली.

सुरवातीला चाकणच्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी एक मोर्चा नेला आणि रास्ता रोकोचा इशारा दिला. याची दखल थेट केंद्रात मंत्री असणाऱ्या मोहन धारिया यांना घ्यावी लागली. त्यांनी निर्यातबंदी मागे घेतली आणि नाफेडला कांदा विकत घेण्याचे आदेश देण्यात आले. हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी घटना होती.

फॉरेन रिटर्न्ड जोशीला शेतीतल काय कळत असं म्हणणारे लोक सुद्धा शरद जोशींकडे शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता म्हणून पाहू लागले.

आता शरद जोशी आणि त्यांचे सहकारी दररोज सकाळी लवकर जाऊन चाकणच्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट होते का यावर लक्ष ठेवू लागले.कृषी उत्पन्न बाजार समिती हा चांगल्या हेतूने सुरु झाली संस्था मात्र राजकारणी दलाल अडते या संस्थेचे व्यवहार आपल्या हातात ठेवून असतात याची त्यांना जाणीव झाली.

जीन्स टी-शर्ट मध्ये असणारे शरद जोशी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊ लागले.

जगाच्या पाठीवर शेतीत कोणते बदल होत आहेत याची शेतकऱ्यांना जाणीव करून देऊ लागले.  प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी बाबुभाई यांच्या मदतीने वारकरी नावाचे साप्ताहिक सुरु केले. यातून अगदी सोप्या भाषेत आंतरराष्ट्रीय घडामोडीपासून ते शेतकरी समस्या उपाय यावर चे लेख प्रकशित होऊ लागले.

कितीही चर्चा बोलणी केली तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमचे मिटले जात नाहीत याची जोशींना जाणीव झाली. यातूनच शेतकरी आंदोलन आकार घेऊ लागले.

नव्याने स्थापन झालेल्या शेतकरी संघटनेच्या वतीने चाकण येथे पहिल्या कांदा उत्पादक शेतकरी लॉन्ग मार्चचे आयोजन करण्यात आले. सरकारला सारा द्यायचा नाही हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.

२४ जानेवारी १९८० रोजी वांद्रे येथून सुरु करून ६४ किलोमीटरचा प्रवास करून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी चाकण येथे आंदोलनाची समाप्ती केली जाणार होती. शरद जोशी आणि त्यांच्या सहकाऱयांनी दोन महिने आधीच या आंदोलनाची तयारी सुरु केली होती. प्रत्येक गावात जाहीर सभा घेतल्या जाऊ लागल्या.

“शक्य असूनही जे शेतकरी मोर्चात सहभागी होत नाहीत त्यांना आपल्या शेतकरी बांधवांशी द्रोह केल्याचा दोष लागेल”असे भावपूर्ण आवाहन करण्यात आले.

सुरवातीला तत्कालीन राजकीय नेत्यांनी या आंदोलनाचा उपहास केला. मात्र अनपेक्षितपणे शरद जोशींच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळू   कार्यकर्ते त्यांना जोडले जाऊ लागले. फक्त पुरुषच नाहीत तर महिला देखील त्यात सहभागी होऊ लागल्या. अनेक वर्षांपूर्वी बार्डोली येथे सरदार वल्लभभाई पटेलांनी बाराबंदी सत्याग्रह केला होता याची आठवण करून देणारा हा मोर्चा उभा राहत होता.

बघता बघता शेतकरी आंदोलनाचा वणवा पेट घेऊ लागला. काही अतिउत्साही तरुण कार्यकर्त्यांनी २६ जानेवारीला होणाऱ्या सांगता सभेमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रध्वज जाळायचा निर्धार केला. यावरून शेतकरी संघटनेमध्येच दोन प्रवाह निर्माण झाले. असे आंदोलन करणे योग्यकी अयोग्य याची चर्चा सुरु झाली.

सर्वप्रथम या विषयावर जागृती करण्यासाठी वारकरी साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर मामा शिंदे यांचे पत्र प्रकाशित झाले. मामा शिंदे म्हणाले होते,

“जो राष्ट्रध्वज अनेक राष्ट्रभक्तांच्या त्यागातून व रक्तातून निर्माण झाला त्याच्यासाठी कितीतरी ज्ञात अज्ञात राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हि आपली जबाबदारी आहे. आमच्या सरकारचा राग आम्ही राष्ट्रध्वजावर का काढावा ? राष्ट्रध्वज जाळून सत्याग्रह करू नका. अन्य मार्गाचा अवलंन व्हावा. त्यात सर्वजण तुमच्या पाठीशी राहतील. “

मामा शिंदे स्वतः जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते व मागे सांगितल्याप्रमाणे चाकण मधील पहिले झेंडावंदन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होते. पत्रातील त्यांची भावना समजण्यासारखी होती. शरद जोशींनी त्यांच्या पत्राखाली आपली प्रतिक्रिया देखील प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी कोणत्याही थराला जाण्याचे उद्दिष्ट बोलून दाखवले. ते म्हणले होते,

“राष्ट्रध्वजावर काव्य म्हणणे सोपे आहे, पण ज्यांच्या जीवनात काव्य कधी शिरलेच नाही, त्या शेतकऱ्यांना त्याचे काय हो! हा गंभीर कायदे भंग आहे आणि त्याचे परिणाम भोगण्याची सत्याग्रहींची तयारी आहे. त्यांची वेदनाही तितकीच मोठी आहे. “

शरद जोशींनी अप्रत्यक्षपणे तरुण कार्यकर्त्यांच्या भावनेचे समर्थनच केले होते. मात्र प्रत्यक्ष मोर्चामध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान केला गेला नाही. मामा शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांनी ते होऊ दिले नाही. हजारो स्त्रीपुरुषांना काढलेल्या लॉन्ग मार्च मध्ये शेतकरी संघटनेने शपथ घेऊन मोर्चाला सुरवात केली. कोणतेही वेडेवाकडे वळण लागता शेतकऱ्यांचे पहिले आंदोलन प्रचंड यशस्वी ठरले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.