जोशी शेतकऱ्यांचे आंदोलन करतोय आणि पाटील गप्प बसून राहतो.

गोष्ट आहे १९८० सालची. आणिबाणीच्या काळोख्याने भरलेलं दशक संपल होतं. इंदिरा गांधीच्या विरोधातील सर्व पक्ष एकत्र येऊन केलेला जनता सरकारचा प्रयोग सुद्धा फसला होता. जनतेने इंदिरा गांधी यांनाच परत पंतप्रधानपदी आणलं होतं.

अस्वस्थ संक्रमणाचा काळ. बेकारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला होता. साठेबाजी, महागाई हे प्रचंड प्रमाणात वाढले होते. सर्वात मोठा फटका बसला होता शेतकर्यांना. 

स्वातंत्र्याच्या काळापासून सरकारची धोरणे उद्योजक प्रेमी राहिले होते. शेतमालाच्या उत्पादनवाढीसाठी हरित क्रांती घडवून आणण्यात आली. पण तिचा फायदा फक्त पंजाब-हरियाना भागातल्या शेतकर्यांना झाला. संपूर्ण देशातील शेतकरी अजूनही हलाखीचे जीवन जगत होते. लालफितीचा कारभार शेतीच्या प्रगतीमध्ये आडकाठी बनून राहिला होता.

अशातच युनोमध्ये काम केलेला शरद जोशी नावाचा अर्थतज्ञ आपली नोकरी सोडून महाराष्ट्रात परत आला होता आणि शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे यावरून त्याने आंदोलने सुरु केली होती.

त्यांनी सुरु केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनपेक्षितपणे प्रचंड प्रतिसाद लाभला. हजारो शेतकरी त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरले. 

या आंदोलनापाठोपाठ सुरु केलेल्या ऊसदर आंदोलनाने तर महाराष्ट्राला पेटवले. गेल्या काही वर्षांपासून ऊस हे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे नगदी पीक बनले होते. फक्त शेतकरीच नाही तर अख्ख्या राज्याचे राजकारण या ऊसाभोवती फिरत होते. ऊस कारखानदार सहकार क्षेत्रावर पर्यायाने राज्यावर राज्य करत होते. अशावेळी शरद जोशींनी सुरु केलेल्या आंदोलनाला शेतकरी प्रतिसाद देत आहेत म्हटल्यावर या साखर सम्राटांची गोची झाली.

शरद जोशी नावाचा ‌शिकेलेला शहरी माणूस महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हातपाय पसरू लागल्याने प्रस्थापित राजकारणी अस्वस्थ होऊ लागले.

कांदा झाडावर लागतो की जमिनीखाली लागतो हे ठाऊक नाही त्याला शेतकऱ्यांचे प्रश्न काय कळणार अशी टिंगल केली त्या शरद जोशीच्या पाठीशी शेतकऱ्याचा वाढत चाललेला प्रतिसाद बघून संपूर्ण देशात खळबळ सुरु झाली.

ऊस दर आंदोलन चिघळल्यानंतर यातून तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं शिष्टमंडळ दिल्लीला आले.

त्यांची पहिली भेट कृषीमंत्री राव विरेंद्रसिंह यांच्याशी करून देण्यात आली. हे वीरेंद्रसिंह म्हणजे मुरलेले राजकारणी. एकेकाळी हरियानाचे मुख्यमंत्री राहिलेल्या वीरेंद्रसिंह यांचा महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा अभ्यास खूप मोठा होता. त्यांनी या शिष्टमंडळाला आल्या आल्या पहिलाच टोमणा मारला,

“कोणीतरी जोशी येतो, आंदोलन करतो आणि तुम्ही पाटील मात्र कसे काय गप्प बसून राहता?”

कृषीमंत्र्यांच्या मते उत्तरप्रदेश, हरयाणा पंजाब येथे आंदोलने होत नाहीत आणि फक्त  महाराष्ट्रात मोठी आंदोलने होत आहेत यामागे तिथल्या नेत्यांचा आपल्या जनतेशी सुटलेला संपर्क हे कारण आहे. कुठल्या तरी खासदाराने येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये या आंदोलनाचा कॉंग्रेसला फटका बसेल हे कारण देण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृषीमंत्री म्हणाले,

“महाराष्ट्रात पोटनिवडणूक आहे. त्यावर देशाचं शेतीविषयक धोरण ठरवावं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? भाताचा दर वाढवून दिला, ज्वारी-बाजरीचे भाव आपल्या सरकारने वाढवले. आता नगदी पिकांची भाववाढ केली तर देशात चलनवाढ होणार नाही का?”  

धडाधड आकडेवारी फेकून कृषीमंत्र्यांनी आपल्या खासदाराना निरुत्तर केले. राज्याच्या खासदारांच्या दिल्लीच्या श्रेष्ठींपुढे माना झुकवण्याच्या परंपरेमुळे शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यास ते कमी पडले.

आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत शरद जोशी शेतकऱ्यासाठी लढत राहिले. पण जातीच ओझ शेवटपर्यंत मानगुटीवर बसून राहिलं. त्यांचेच अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. पण मातीत राबणारा शेतकरी मात्र त्यांच्या पाठीशी प्रामाणिक राहिला. आज राज्यात शेतकर्यांना जे थोडेफार चांगले दिवस आले आहेत यात ऐंशीच्या दशकात शरद जोशींनी उभारलेल्या आंदोलनाचा खूप मोठा वाटा आहे.

हा किस्सा जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या राजधानीतून या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.