शेतकरी आंदोलनात धक्काबुक्की झाली आणि टीकैतांच्या स्टेजवरून शरद जोशींना खाली पाडले.

गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या दिल्लीतल्या किसान आंदोलनाची धग साऱ्या देशात पोहचली.

आपल्या भारताचा इतिहास जणू चळवळींनी भरलेला आहे त्यात स्वातंत्र्य चळवळीनंतर सर्वात मोठं आंदोलन ठरलं ते म्हणजे शेतकरी आंदोलन.

आणि  शेतकरी चळवळ म्हटलं की, शरद जोशी आठवतात आणि त्यानंतर नाव घेतलं जातं ते महेंद्रसिंग टिकैत यांचं.

टिकैत हे उत्तर प्रदेशातले होते आणि त्यांचा भाग म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशातील मिरज पासून ते मुजफ्फरनगर पर्यंतचा. हा भाग तसा खूप सुपीक होता. दिल्लीपासून जवळ असल्यामुळे तिकडच्या  बारीकश्या घटनेचा परिणाम लगेच दिल्लीत दिसायचा.. आणि त्यातल्या त्यात मिडिया आणि बहुतेक पत्रकार हे दिल्लीत असल्यामुळे टिकेत यांचे प्रत्येक आंदोलन देशभरात पोहोचले होते. 

मात्र महेंद्रसिंग टिकैत यांना जसा फायदा मिळाला तसा दिल्लीपासून दूर असलेल्या अन्य कोणत्याही शेतकरी नेत्याला मिळाला नाही, शिवाय शरद जोशींना देखील मिळाला नाही.

मात्र शेतकऱ्यांचे असलेले या दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद होते. 

 एकदा टिकैत आणि जोशी यांच्या मध्ये उघड-उघड फूट पडल्याचे एक घटना घडली. 1988 मध्ये दिल्लीला किसान समन्वय समितीची एक बैठक भरली होती. त्या बैठकीत टिकैत यांनी जोशींना म्हणाले,

“तुम्ही व्ही पी सिंग यांना सामील आहात, त्यामुळे मी तुमच्याबरोबर काम करू शकणार नाही” असे म्हणत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह त्यांनी सभात्याग केला.

टिकैत यांना शंका होती की, शरद जोशी हे व्यक्तीगत राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत व त्यासाठी ते आपला वापर करून घेतील.

असं म्हणणारया टिकैत यांनीच पुढे 2003 मध्ये काँग्रेस मध्ये व पुढे भाजपमध्ये प्रवेश केला होता, असो.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राष्ट्रीय पातळीवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या दोघांनी मिळून दिल्लीतील बोट क्लब वर शेतकऱ्यांचा एक विशाल मेळावा घ्यायचे ठरवले. आपापसातले मतभेद कायम ठेवून हे नेते या मेळाव्याच्या जय्यत तयारीला लागले. 

“एक नेता, एक झेंडा, एक नाव” हा आपला नेहमीचा मुद्दा टिकैत यांनी या ही मेळाव्यात रेटून धरला.

यामागे टिकैत यांची  अशी महत्वकांक्षा होती की, देशभरातील शेतकऱ्यांचे नेते आपणच बनावे.

पण शरद जोशींचं नेहमीप्रमाणे म्हणणं होतं की, आपली समिती ही एक स्वतंत्र संस्था नाही त्यामुळे तिचे नेतृत्व आहे सामुहिकच असावे, तसेच सध्या एक झेंडा एक नाव यांचा आग्रह न धरता काही काळ तरी असेच अनौपचारिकपणे एकत्र काम करावे ही आपली त्यांनी बाजू मांडली.

बाकी सदस्यांचाही जोशींच्या म्हणण्याला पाठिंबा होता त्यामुळे टिकैत यांनी आपला आग्रह बाजूला ठेवला आणि तयारीला लागले.. मेळाव्यासाठी 2 ऑक्टोबर 1989 ही तारीख ठरली.

मेळावा यशस्वी व्हावा म्हणून जोशीने आपले सगळे सामर्थ्य पणाला लावले होते. हा मेळावा म्हणजे एका अर्थी शक्तिप्रदर्शनच होतं.

‘चलो दिल्ली’ अशी घोषणा देत महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेने अनेक सभा घेतल्या, प्रचार केला. प्रत्यक्षात मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. खेड्यापाड्याचे शेतकरी आदल्याच दिवशी दिल्लीत येऊन दाखल झाले होते.

हा मेळावा काही शासनपुरस्कृत मेळावा नव्हता.  इथे ना कुणाला फुकट खायला दिले गेले ना दारूची बाटली दिली गेली,ना कुणाला पैसे पुरवले गेले. इतकेच नव्हे तर त्यांच्या राहण्याची आणि जाण्यायेण्याची सोय देखील केली गेली नव्हती. हे सर्व शेतकरी स्वतःच्या पैशाने दिल्लीला आले होते.

दिल्लीकरांनी एवढा विशाल मेळावा याआधी कधीही पाहिला नव्हता.

सभेच्या जागी साधारण चार ते पाच लाख शेतकरी जमले होते, ते सभा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. 

सगळे काही नियोजन टीकैत यांच्या पद्धतीने चालू होते, अगदी  स्टेजवर त्यांचा आवडता हुक्काही ठेवण्यात आला होता. परंतु तरीही टिकैत हे अस्वस्थ दिसत होते, त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते.

ही सभा उधळुनी लावायची असा त्यांचा कट चालू होता.

त्याचे कारण असे होते, की बोटक्लब वरील या सभेच्या पूर्वी सकाळी सकाळीच शरद जोशी राजीव गांधी यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले होते व त्यांच्यात काहीतरी गुप्त खलबते झाली असे कोणीतरी टिकैत यांना सांगून त्यांचे कान फुंकले होते.

आधीच टिकैत यांना जोशी यांचा मत्सर वाटला असेल, कारण शेतकरी चळवळीचा चेहरा म्हणून जोशी यांचेच नाव समोर होते, तसेच मेळाव्याचे वैचारिक नेतृत्व देखील जोशींकडे होते. त्यामुळे वृत्तपत्रे आणि माध्यमे जोशी यांच्याच भाषणाला प्रसिद्धी देणार हे त्यांना स्पष्टपणे जाणवले.

त्यादिवशी, त्यावेळी नेमकं काय काय घडलं हे सांगणं अवघड आहे परंतु एवढं खरं की, अचानक टिकैत आणि त्यांच्या सहकार्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. 

तीस फुटाचा असलेला हा स्टेज अचानक टिकैत यांच्या कार्यकर्त्यांनी  उखडून टाकायला सुरुवात केली. एक-एक करत स्टेज चे सगळे खांब काढून बाजूला फेकून देऊ लागले. मंचावर अचानक धक्काबुक्की सुरू झाली, सगळीकडे एकच गोंधळ माजला.

त्यात वाईट अशी घटना घडली की शरद जोशींना स्टेजवरून कोणीतरी मागून ढकलून दिलं आणि शरद जोशी खाली कोसळले. काय होते कोणालाच कळेना.

आपल्या नेत्याच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये याच याची जाणीव होऊन शरद जोशी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची कशीबशी मागच्या बाजूने सुटका केली.

स्टेजच्या बाजूला मैदानावर बद्रिनाथ देवकर व इतर काही निष्ठावान सहकारी उभे होते. त्यांनी हातांची झोळी करून जोशीला सुखरूप व्यासपीठापासून दूर नेले, त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना थेट हॉस्पिटल मध्ये न्यावे लागले, पुढचे काही दिवस ते हॉस्पिटलमध्येच होते. त्यांच्या सहकाऱ्यामुळेच त्या दिवशी त्यांचा जीव वाचला असे म्हणावे लागेल.

खरंतर हा मेळावा म्हणजे गेली दहा वर्ष जोशी लढत असलेल्या शेतकरी आंदोलनाचा एक कळस बिंदू होता. या मेळाव्याला माध्यमांमध्येही इतकी मोठी जागा मिळाली होती त्यामुळे महाराष्ट्रातले ही पत्रकार त्यांना टाळू शकत नव्हते. इंग्रजी माध्यमांनी देखील शरद जोशींना महत्व द्यायला सुरुवात केली होती.

शोभा डे तर शरद जोशींना कौतुकाने ‘जीन्स धारी’ गांधी असं म्हणायच्या.

या मेळाव्याच्या प्रसिद्धीमुळे कदाचित शरद जोशी हे देशाचे भावी पंतप्रधान होतील अशीही चर्चा तेव्हा सुरु झाली होती.

परंतु दुर्दैवाने अगदी हातातोंडाशी आलेली ही संधी हुकली. त्यानंतर जोशींचे नाव राजकीय वर्तुळात आणि मीडिया च्या दृष्टीने मागे पडले ते कायमचेच.

शेतकरी संघटनेने राष्ट्रीय पातळीवर एवढी उंची  या मेळाव्यानंतर कधीच घेतली नव्हती. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.