अखेरच्या क्षणी वसंतदादा का म्हणाले होते, शरद पवारांचे नेतृत्व कॉंग्रेसवाल्यांनी स्वीकारावं.. 

महाराष्ट्राच्या राजकारणात काही गोष्टी एकदम पक्क्या आहेत. यामधली एक गोष्ट म्हणजे खंजीर. जेव्हा कधी दगाबाजीचा विषय येतो तेव्हा शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खुपसलेल्या खंजीराची चर्चा होते.

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीवरची ही एक जखमच म्हणता येईल. कारण त्यानंतर त्यांनी अनेक सत्तापदे भोगली मात्र चर्चेतून खंजीर कधी गेला नाही. 

मात्र या गोष्टीवरून शरद पवारांना वसंतदादांनी माफ केलं होता, तर त्याचं उत्तर ठामपणे हो किंवा नाही अस देता येणार नाही, पण एक निश्चित वसंतदादांनी अगदी शेवटच्या काळात त्यांनी विधान केलं होतं की, 

शरद पवारांचे नेतृत्त्व कॉंग्रेसवाल्यांनी स्वीकारावं.. 

त्यांनी हे विधान केल्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला होता. नेमकं ते अस का म्हणाले होते व वसंतदादा आणि शरद पवारांच्या नातेसंबंधाचा पुर्वांध काय होता.. 

महाराष्ट्रात पुलोदचा कार्यक्रम केल्यानंतर दादांच्या मनात एक गोष्ट प्रकर्षाने खुपली होती अन् ती म्हणजे साहेब माझ्याशी अस का वागले.. 

वसंतदादांच म्हणणं होतं की, यशवंतराव चव्हाण साहेब माझ्याशी अस का वागले. साहेबांनी सांगितल्याशिवाय शरद माझ्याशी गद्दारी करूच शकत नव्हता. साहेबांनी माझ्याकडे राजीनामा मागितला असता तर मी क्षणाचाही विलंब न लावता तो दिला असता. मी त्यांना नेता मानलं होतं ना, ते हक्कानं मला राजीनामा द्यायला सांगू शकले असते. विधानसभेच्या सभागृहात सरकार पाडून शरद मार्फत माझ्या पाठीत खंजीर का खुपसला?… 

सरकार पडल्यानंतर वसंतदादा विधानभवनात यायचे का? याच उत्तर कुमार सप्तर्षी यांनी दिलेलं आहे. ते म्हणतात, 

सरकार पडल्यानंतर दादा रोज विधानसभेत येत. बाहेरच्या लॉबीत बसून राहत. पुलोदच्या मंत्रीमंडळाची प्रक्रिया सुरू होती. मुख्यमंत्री आणि पक्षनेते यांचाच शपथविधी झाला होता. दादांसोबत बोलताना पाहिले आणि शरद पवारांनी ते पाहिले तर आपला पत्ता कट होईल म्हणून दादांसोबत बोलण्यास कोणीच तयार होत नसे.

कॉंग्रेसमधील कोण्या आमदाराला दादा जवळ येवून बसा असे म्हणाले तर लगेच तो आमदारा पाणी पिवून येतो म्हणून सांगे आणि परत येत नसे. जे आमदार कालपर्यन्त दादांनी बोलवल्यानंतर स्वत:ला धन्य मानायचे ते आत्ता दादांना टाळायचे.. 

दादांच्या अखेरच्या काळात मात्र दादांनी एक विधान केलं, 

ते म्हणाले की शरद पवारांचे नेतृत्व सर्व कॉंग्रेसवाल्यांनी मानावे.. 

याबाबतचा खुलासा कुमार सप्तर्षी यांनीच आपल्या व्यक्तिरंग पुस्तकात खुलासा केला आहे. ते सांगतात, 

एका रात्री निवांतपणे आमदार निवासस्थानासमोरच्या बी१ या बैठ्या बंगल्यात मी दादांना भेटलो. दादा मालीश करून घेत होते. ती आमची शेवटची भेट. खूप गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात त्यांना विचारले, दादा तुम्ही नुकतेच केलेले स्टेटमेंट वाचले. त्याचा अर्थ कळला नाही. शरद पवारांचे नेतृत्व सर्व कॉंग्रेसवाल्यांनी मानावे असे का? 

यावर दादा म्हणाले, अरे मला कळतय ना. माझ्या आयुष्याचा अस्त जवळ आलाय. मला मानणारी मंडळी माझ्यामागे उगाच माझा वारसा म्हणून दादा गट चालू ठेवतील आणि शरदशी भांडत बसतील.

राजकारणात गटबाजी आणि मतभेद मर्यादेबाहेर वाढले की नोकरशहा बेलगाम बनतात. मला ते नकोय. नोकरशहा एकदा मालक बनले की जनतेचे अतोनात हाल होतात. म्हणून माझ्यामागे आमचा गट विसर्जित व्हावा आणि त्यांनी शरदच्या मागं उभं राहून जनतेची कामे त्याच्याकडून करून घ्यावीत अशी माझी इच्छा आहे. 

सप्तर्षी सांगतात त्या भेटीनंतर काही महिन्यातच दादा हे जग सोडून निघून गेले.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.