त्याकाळात देखील चर्चा होत होती कि पवारांनी भाजपबरोबर युती केली आहे..

वर्ष १९९९. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून काँग्रेस फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांना एके काळी काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार समजलं जायचं. जेव्हा वाजपेयींचं सरकार १ मताने पडलं तेव्हा त्यांना हरवण्यात शरद पवार यांच्या चाणक्यनीतीचा मोठा वाटा होता. इतकं असूनही सोनिया गांधींनी पक्षाचं नेतृत्व आपल्या हातात घेतल्यामुळे पवारांनी काँग्रेस सोडली.

इतकं असूनही १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला चमकदार कामगिरी करता अली नाही. फक्त ८ खासदार निवडून आलेल्या पवारांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न तेव्हाच सोडून दिल आणि आपलं लक्ष राज्यात सत्ता आणण्याकडे दिलं.

१९९९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा निकाल देखील त्रिशंकू लागला होता.

सत्तेत असलेल्या शिवसेना भाजप युतीच्या जागा घेतल्या होत्या. अशातच त्यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी वाद सुरु होते. प्रमोद महाजन हे गोपीनाथराव मुंडेंना मुख्यमंत्री करायचंच म्हणून विडा उचलले होते. काँग्रेसशी भांडून सवता सुभा मांडणारे शरद पवार कोणाला पाठिंबा देणार यावर मुख्यमंत्रीपद ठरणार होते.

त्याकाळात अशा अफवा पसरत होत्या की पवारांच्या भाजपशी बोलणी सुरु आहेत. नारायण राणे आणि गोपीनाथ  मुंडे यांच्यातील संघर्ष वाढत चालला होता इतक्यात बातमी आली कि राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर आघाडी केली असून काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनणार आहेत.

पवारांच्या पॉवरनीतीने पुन्हा एकदा सगळ्यांना चकवा दिला होता.

राज्यात अपक्षांच्या टेकूवर विलासराव देखमुख व छगन भुजबळ यांचं सरकार स्थापन झालं. यानंतरही युतीने त्यांचं सरकार पाडण्यासाठी पाच वर्षे आकाश पाताळ एक केलं, अनेकदा आमदार फोडले, अविश्वास प्रस्ताव आणला मात्र आघाडी मोडू शकली नाही.

हे चाललं होतं राज्यपातळीवर मात्र केंद्रात पवारांची तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी चांगली मैत्री होती. २००१ साली जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला तेव्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी वाजपेयींनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली. तेव्हा झालेल्या चर्चेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला.

किल्लारी भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट अशा संकटाच्या वेळी प्रशासन व मदतकार्य सक्षमपणे सांभाळल्या पवारांना ते विरोधी पक्षात असूनही या समितीची मोठी जबाबदारी देण्यात आली. हा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता. स्वतःच्या पक्षाकडे मोठे बहुमत असूनही छोट्याशा विरोधी पक्षातल्या नेत्याकडे हे पद सोपवण्यामागे वाजपेयींची काही तरी खेळी असावी असा राजकीय पंडितांचा अंदाज होता.

याकाळात शरद पवार हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जवळ गेले. ते आपल्या आत्मचरित्रात त्याकाळचा एक किस्सा सांगतात.

एकदा केंद्रीय दक्षता आयोगाच्या प्रमुखाची नेमणूक करण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आली होती. गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, संरक्षणमंत्री जसवंतसिंह, शरद पवार  आणि खुद्द पंतप्रधान वाजपेयी हजर राहणार होते.

बैठक सुरु झाली. वाजपेयी नेहमीच्या स्टाईलने डोळे बंद करून म्हणाले,

आज के मिलने का क्या प्रयोजन है?

जसवंत सिंह यांनी मीटिंगचा अजेंडा सांगितला व केंद्रीय दक्षता आयोगाच्या प्रमुखपदाची निवड करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं सांगितलं. खरं तर लालकृष्ण अडवाणी यांच्यात व शरद पवार यांच्यात या पदावर कोणाची निवड करायची यावरून वाद सुरु होता. अडवाणी तेव्हा फक्त गृहमंत्रीच नाही तर देशाचे उपपंतप्रधान देखील होते. आपली सत्ता असल्यामुळे केंद्रीय दक्षता आयोगाचा प्रमुख आपल्या म्हणण्यानुसार व्हावा असा त्यांचा आग्रह होता. दोघांच्यातील चर्चा तापली.

वाद वाढणार याच लक्षण दिसल्यावर वाजपेयींनी वातावरण शांत करण्यासाठी बैठकीत चहा मागवला आणि अडवाणींना म्हणाले,

“लालजी, आपण सरकार चालवण्याबाबत नवखे आहोत. शरदजींना प्रशासन आणि सरकारचा आपल्यापेक्षाही जास्त अनुभव आहे. त्यांनी सुचवलेलं नाव आपण केंद्रीय दक्षता आयोगाच्या प्रमुखपदी निवडूया.”

अखेर वाजपेयींच्या आग्रहाखातर लालकृष्ण अडवाणींनी माघार घेतली आणि पवारांनी सुचवलेल्या विठ्ठल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हा प्रसंग तसा छोटा होता मात्र शरद पवार यांचं वाजपेयींच्या दरबारातील महत्व अधोरेखित करणारा होता. २००४ सालच्या लोकसभा निवडणुका आल्या तेव्हा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होण्यास काही खासदार कमी पडले तर पवारांच्या चाणक्यनीतीचा उपयोग करून घेता येईल असं वाजपेयींना वाटत असावं.

२००४ साली शरद पवार काँग्रेससोबतची आघाडी मोडून भाजपच्या बरोबर येतील असाच अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पवारांचे फक्त ९च खासदार निवडून आले. भाजपच्या तब्बल ४४ जागा कमी झाल्या व वाजपेयींच्या जागी मनमोहन सिंग यांचं सरकार स्थापन झालं. आपल्या बद्दलच्या वावड्या मिटवून शरद पवार त्यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून सामील झाले.

पवार भाजप बरोबर जाणार याच्या अफवा पुन्हा खोट्याच ठरल्या.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.