शरद पवार तुमची छाती किती इंच?

गोष्ट आहे १९६२ सालची. चीनच्या आक्रमणाच्यावेळची. हिंदी चीनी भाई भाई म्हणत चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आपल्या सैन्याची तयारी म्हणावी तेव्हढी झाली नव्हती. पाकिस्तानच्या लगतच्या सीमेला भक्कम करण्याच्या नादात पूर्वेकडील चीनला लागून असलेल्या बोर्डरकडे आपले दुर्लक्ष झाले होते आणि त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागली होती.

लाखो जवान आपलं प्राण पणाला लावून चीनी आक्रमणाला परतवून लावत होते. रक्त सांडल जात होतं.

जवानाच्या हौतात्म्याच्या बातम्या ऐकून अख्खा देश रडत होता. लहान मुले आपल्या खाऊच्या पैशातून सैन्यासाठी निधी उभा करत होते. तरुणांनाच रक्त सळसळत होतं. या युद्धासाठी आपली काय मदत करता येईल याचाच प्रत्येकजण विचार करत होता.

पुण्यामध्ये ही काही विद्यार्थी संघटनांचे तरुण एकत्र आले. सांगली कोल्हापूर सातारा जळगाव अशा ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांची यात भरणा होती. यात मुख्य होते शरद पवार आणि श्रीनिवास पाटील. शरद पवार तेव्हा बीएमसीसी मध्ये तर श्रीनिवास पाटील स.प.महाविद्यालयात शिकायला होते. दोघांची घट्ट मैत्री होती. आपापल्या कॉलेजचे ते विद्यार्थी प्रतिनिधी होते.

शरद पवार त्याकाळात या सगळ्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत होते. पुण्याच्या युथ कॉंग्रेसची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 

तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणसाहेब होते. चीनशी होत असलेल्या पीछेहाटीमुळे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांची गच्छन्ति केली होती आणि परिस्थितीवर काबू मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाणांना मदतीसाठी दिल्लीला बोलवून घेतले होते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती,

“हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला.”

शरद पवार आणि श्रीनिवास पाटील हे दोघेही यशवंतराव चव्हाणाचे निस्सीम भक्त होते. या दोघांनीही ठरवलं की चीनविरुद्धच्या युद्धासाठी बळ मिळाव म्हणून पुण्यातल्या सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची एक चळवळ उभी करून त्यांचा प्रचंड मोर्चा काढायचा.

शनिवारवाड्या समोरच्या भव्य प्रांगणात या मोर्चाची सांगता करायची आणि त्या कार्यक्रमासाठी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूनां बोलावयाच अस ठरलं.

त्यांची परवानगी घेण्यासाठी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील विद्यापिठात गेले. दोघेही वीस बावीस वर्षाचे गावाकडून आलेले हे तरुण. तेव्हा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते महामोपाध्याय दत्तो वामन पोतदार. इतिहासाचे गाढे अभ्यासक, मराठी इंग्रजी अशा अनेक भाषांचे प्रकांड पंडीत असणाऱ्या दत्तो वामन पोतदार यांच्या समोर उभे राहताना सुद्धा अनेकांना घाम फुटायचा.

पवार आणि पाटील ही जोडगोळी सुद्धा दबकत दबकत कुलगुरूंकडे गेली. त्यांना विनंती केली की चीन युद्धासंदर्भातल्या मोर्चामध्ये आपण बोलला तर विद्यार्थ्यांना जोश येईल. हे बोलन पूर्ण ऐकून घेण्याच्या आधीच पोतदारांचा पारा चढला. त्यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना जाम खडसावल.

“कशाला करता असले नसते उद्योग. तुमची छाती  किती? २० इंच ! फुगून २२ इंच होत नाही आणि निघाले चीनशी युद्ध करायला !!”

दोघानाही आता काय बोलयचे सुचेना. तरी पवारांनी कसंबसं दत्तो वामन पोतदारांना आपण नेमकं काय करणार आहोत हे सांगितलं. अखेर बऱ्याच विनवण्यानंतर दत्तो वामन पोतदार शनिवारवाड्यावरच्या सभेला येण्यासाठी तयार झाले. 

मोर्चाच्या दिवशी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी जमले. शरद पवारांनी नेटके नियोजन केलेला हा शिस्तबद्ध मोर्चा शनिवारवाड्यावर आला. दिलेल्या शब्दाप्रमाणे कुलगुरू दत्तो वामन पोतदार विद्यार्थी मोर्चाला संबोधित करण्यासाठी हजर राहीले. एवढी प्रचंड गर्दी बघून तेही भारावून गेले. त्यांनी तिथे उत्तम भाषण दिल. ते म्हणाले,

“यशवंतराव चव्हाणांच्या रूपानं महाराष्ट्राचा सुपुत्र दिल्लीच्या मदतीला गेलेला आहे. आता हे युद्ध नक्की थांबणार आहे.”

शरद पवार यांची छाती किती इंच आहे हे त्यादिवशी अख्ख्या पुण्याने अनुभवलं.

त्या सभेनंतरच त्यांची दखल कॉंग्रेसमधल्या वरच्या वर्तुळात देखील घेतली जाऊ लागली. ते महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले. पुढच्या काही वर्षातच ते आमदारही झाले, महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री झाले. ज्या यशवंतरावानां आपला गुरु मानल, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला त्यांच्या पावलावर पाउल ठेवून भारताच्या संरक्षणमंत्री पदाच्या खुर्चीवरसुद्धा ते विराजमान झाले.

हा किस्सा साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.