शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री देखील शरद पवारांनी ठरवला होता..

साल १९९५. शिवसेना आणि भाजपच्या युतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळावर भगवा फडकवला होता. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस सरकारचा पराभव करण्याचा चमत्कार त्यांनी केला होता. याचे सर्वाधिक श्रेय जात होतं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना.

हिंदुत्वाची शाल ओढलेल्या बाळासाहेबांनी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिवसेना पोहचवली. त्यांच्या भाषणांनी तरुणाई भारावून जात होती. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारात पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोपांनी रान उठवून दिलं होतं. त्यांच्या बळावरच शिवसेना भाजप युतीने विधानसभेचा विजय खेचून आणला. भाजप पेक्षा ८ जागा जास्त निवडून आणणाऱ्या सेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री अशी वाटणी देखील झाली होती.

आता प्रश्न उरला होता की सेनेचा मुख्यमंत्री कोण होणार. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर आधीच जाहीर केलं होतं,

“मी मुख्यमंत्री होणार नाही पण मला उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं कि बसणारा मुख्यमंत्री हवाय. पदावर कोणीही बसो सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात राहील. “

बाळासाहेबांच्या या वक्तव्यातच सत्ताग्रहणांतच्या संघर्षाचे बीज होते. ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होणार नाहीत म्हटल्यावर सेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसाठी हि जागा खुली झाली होती. या सगळ्यात शेवटी दोन नावे उरली होती,

मनोहर जोशी आणि सुधीर जोशी.

हि सख्ख्या मामा भाच्याची जोडी. शिवसेनेच्या  स्थापनेच्या काळापासून ते बाळासाहेबांच्या सोबत होते. हे दोघे एकेकाळी आपल्या मोटारी भाड्याने द्यायचे. त्यातूनच त्यांची आणि बाळासाहेबांची ओळख झाली. बऱ्याचदा खुद्द मनोहर जोशींनी देखील बाळासाहेबांसाठी ड्रायव्हरचं काम केलं होतं. ठाकरे गंमतीने माझा ड्रायव्हर एलएलबी आहे असं म्हणायचे.

या भेटीतूनच ते नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेकडे ओढले गेले.

वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी सुधीर जोशी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक निवडून देखील आले. कमी वयातच त्यांनी शिवसेनेत आपली छाप पाडायला सुरवात केली. विशेषतः महापालिका बैठकीत त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणं जबरदस्त रंगू लागली. दादरच्या भागात सुधीर भाऊंचा मित्रपरिवार मोठा होता.

१९७१ साली शिवसेनेला पहिल्यांदाच मुंबईचे महापौरपद मिळालं. डॉ.हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे महापौर बनले. त्यांच्यानंतर जेव्हा पुन्हा शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता आली तेव्हा महापौर कोण याची स्पर्धा निर्माण झाली. मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे वयाने थोरले असणारे नेते या पदासाठी उत्सुक होते पण बाळासाहेबांनी मुंबईचा प्रथम नागरिक होण्याचा मान तरुण सुधीरभाऊ जोशी यांना दिला.

त्यांची महापौर म्हणून कारकीर्द प्रचंड गाजली. शिवसेनेची सत्ता आली तर कारभार कसा चोख होईल याच आदर्श म्हणून सुधीर जोशींकडे बघितलं गेलं.

महापालिकेतील आणि विधिमंडळातील कामगिरी सोबतच त्यांनी आणखी एक केलेलं काम म्हणजे स्थानीय लोकाधिकार समिती. शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसाच्या अस्मितेतून झाली होती. पण खऱ्या अर्थाने हा विषय विधायक रीतीने हाताळला तो सुधीरभाऊंच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या नेतृत्वाखाली.

एअर इंडिया पासून ते रिझर्व्ह बँक, एलआयसी, ऑइल कंपन्या यांमध्ये मराठी माणूस चमकू लागला तो याच स्थानिक लोकाधिकार समिती मुळे. सुधीरभाऊ जोशी सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले. 

मनोहर जोशींचं नेतृत्व देखील याच काळात आकार घेत होतं. बाळासाहेबांच्या विश्वासातले म्हणून त्यांना ओळखलं जायचं. शिवसेनेचा तडफदार आवाज असलेले छगन भुजबळ जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा त्यांची जागा मनोहर जोशींनी घेतली. बाळासाहेबांनी त्यांना विधानसभेचा विरोधी पक्ष नेता देखील बनवलं.

१९९५ सालच्या निवडणूकाचे जेव्हा निकाल लागले तेव्हा अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने वळवायचं मुख्य काम त्यांनी व उद्धव ठाकरे यांनीच केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची जेव्हा चर्चा सुरु झाली तेव्हा त्यांचं नाव पुढं आलं.

पण शिवसैनिकांची इच्छा होती की मुख्यमंत्री सुधीरभाऊ जोशीचं बनावेत. वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर लोकांची गर्दी झाली होती. कुठल्याही क्षणी मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होणार होती. वातावरण तर सुधीर जोशीचंच होतं.

खुद्द बाळासाहेबांनी त्यांचं नाव जवळपास निश्चित केलं होतं.  रात्री अचानक त्यांना शरद पवारांचा फोन आला. त्यांनी सहज मुख्यमंत्रीपदाची  चौकशी केली. जेव्हा बाळासाहेबांनी भावी मुख्यमंत्री म्हणून सुधीर जोशींचं नाव सांगितलं तेव्हा ते म्हणाले,

“आडनाव जोशींचं राहू द्या, पण नाव बदला. “

बाळासाहेबांचा पवारांवर प्रचंड विश्वास होता. अपक्षांच्या टेकूने स्थापन झालेलं युतीचं सरकार साधे सरळ सुधीर जोशी  चालवू शकतील का हाप्र्श्न बाळासाहेबांच्या समोर पडला. त्यांच्या ऐवजी धूर्त व मुत्सद्देगिरीमध्ये प्रवीण असलेल्या मनोहर जोशी यांचे नाव शिवसेना प्रमुखांनी जाहीर केले. या सगळ्या निर्णयामागे शरद पवार आहेत हे नंतर समोर आलं.

निवडणुकीच्या रिंगणात कितीही टोकाची टीका केली असली तरी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे जुने दोस्त होते. म्हणूनच युतीची सत्ता आल्यावर बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.