पवारांनी राज्यपालांना फेक न्यूज दिली अन् एका रात्रीत गेम फिरवून दादांना मुख्यमंत्री केलं

राजकारणाच्या पटलावर शरद पवारांना अजूनही चाणक्य समजलं जातं. राज्यातल्या बंडखोरीच्या अभूतपुर्व महाघडामोडीनंतरही शरद पवारांच्या नेतृत्वगुणांना मानणाऱ्या लोकांना एक गोष्टीवरचा विश्वास ठाम आहे, अन् तो म्हणजे..

पवार काहीतरी करतील.. डाव फिरवतील..

सध्यातरी पवारांच्या चालीचा अंदाज बांधणं सुरूच आहे. शरद पवार काय करतील का हे येत्या काही दिवसात कळेलच पण पवार काय करू शकतात हे समजून घेण्यासाठी हा किस्सा देखील तितकाच महत्वाचा आहे..

साल होतं १९७८ चं..

आणीबाणी नंतरचा तो काळ होता.

केंद्रात जनता सरकारचे मोरारजी देसाई पंतप्रधान होते. काँग्रेसची फाळणी होऊन इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंह काँग्रेस असे दोन भाग झाले होते. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचीसुद्धा या दोन्ही पक्षात विभागणी झाली होती.

इंदिरा काँग्रेसचे नेते होते नासिकराव तिरपुडे आणि स्वर्णसिंह काँग्रेसचे नेते होते वसंतदादा पाटील. या शिवाय शंकरराव चव्हाणांचा महाराष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळाच पक्ष होता. 

निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा राज्यात पहिल्यांदाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. कधी नव्हे ते महाराष्ट्रात जनता पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून आले होते. त्यांची निवडणुकीपूर्व त्यांची शेकाप, कम्युनिस्ट पार्टी, रिपब्लिकन पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांची काँग्रेस यांची आघाडी होती.

या आघाडीचे सर्वात जास्त म्हणजे १३८ आमदार होते. २८८ आमदारांची विधानसभा असलेल्या महाराष्ट्रात बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता होती. जनता पक्ष आघाडी काहीच आमदारानी बहुमताच्या मागे होती. १२ अपक्ष आमदार निवडून आले होते. त्यांचा ज्यांना पाठिंबा तोच बनणार मुख्यमंत्री हे निश्चित होत.

दिल्लीहून मोरारजी देसाईनी जॉर्ज फर्नांडीस यांना जनतापक्ष तर्फे राज्यपालांना भेटण्यासाठी पाठवले. तेव्हा राज्यपाल सादिक अली हे होते.

जॉर्ज फर्नांडिस यांनी राज्यपालांना अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे त्यामुळे आमचे जेष्ठ नेते एस एम जोशी यांना मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापण्यास बोलवावे अशी विनंती केली. 

एस. एम. जोशी हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून लढवय्ये नेते म्हणून प्रसिद्ध होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणी विरुद्धचे आंदोलन अशा मोठमोठ्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नैतिक दबदब्यामुळे अपक्ष आमदार त्यांच्या नावाला ना नाही म्हणणार याची सर्वाना खात्री होती.

राज्यपाल सादिक अली एस एम जोशींना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवणार हे निश्चित झाले.

इकडे दोन्ही काँग्रेस मध्ये गुप्त वाटाघाटी सुरु होत्या. त्यांची नुकतीच फाटाफुट झाली असल्यामुळे ते एकत्र येऊ शकतील याची कोणाला शक्यता वाटत नव्हती पण बेरजेचे राजकारण करण्यात माहीर असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी आपआपसातील शत्रुत्व विसरून बोलणी सुरु केली होती. जनतापक्षाचे नेते याबाबतीत पूर्ण पणे अनभिज्ञ होते.

काँग्रेसच्या नेत्यांच्यात आघाडीची बोलणी सुरु होती पण त्यासाठी वेळ लागत होता. त्या दरम्यान एस एम जोशीना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी बोलावले तर सगळाच खेळ खल्लास होणार होता. कोणत्याही परिस्थितीत राज्यपालांना अडवणे गरजेचे होते. तेव्हा धावून आले धूर्त चाणक्य शरद पवार.

तरुण शरद पवार तेव्हा वसंतदादा पाटलांच्या काळजीवाहू सरकार मध्ये गृहराज्यमंत्री होते.

शरद पवारांनी पहाटे ३ वाजता एसआरपीएफ ची एक तुकडी राज्यपालांच्या राजभवनवर पाठवून दिली. त्या जवानांना पाहून गव्हर्नर हाउसमध्ये गोंधळ उडाला. पवारांना राज्यपालाचा फोन आला की काय नेमका प्रकार आहे. शरद पवार म्हणाले,

“सॉरी सर, विदर्भातील इंदिरा काँग्रेसची युवक मंडळी फार आक्रमक झाली आहेत. त्यांना वाटते जनता पक्षाकडे बहुमत नाही तरीही  आपण त्यांना सरकार स्थापनेसाठी बोलवणार आहात. यामुळे ते आपल्या तोंडाला काळे फासण्यासाठी राजभवनावर चालून येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. म्हणून आपल्या संरक्षणासाठी हे जवान पाठवून दिले आहेत.”

सादिक अली घाबरले. त्यांनी जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी लगेच बोलवायचे टाळले. दरम्यानच्या काळात दोन्ही काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला तयार झाला.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले. एसएम जोशी यांचा मुख्यमंत्री बनण्याचा चान्स हुकला.

हा किस्सा सांगितला आहे त्याकाळचे जनता पक्षाचे आमदार आणि युक्रांदचे नेते कुमार सप्तर्षी यांनीं.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.