तेव्हासुद्धा सत्ता स्थापन करू म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गंडवल होतं

२०१९ च्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र्राच्या कोणत्याही व्यक्तीला वाटलं नव्हतं कि,

शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस + काँग्रेस = महाविकास आघाडी 

सत्तेत येईल म्हणून. म्हणजे त्याआधीची पार्श्वभूमी बघता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाआघाडी सत्तेत येणार की भाजप काही चमत्कार करणार, हा तिढा सुटला नव्हता. त्याचवेळी सत्ता आमचीच येणार, असे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील ठणकावून सांगत असल्याने सत्तासंभ्रम वाढला होता. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हा राग संजय राऊत आळवतच होते. त्याच वेळी सत्तास्थापनेला वेळ लागू शकतो, असं शरद पवार सांगत होते. 

मुंबईत जी मंडळी या आघाडीच्या जन्मकळा सोसत होते, त्यांचेच गावोगावचे समर्थक व बव्हंशी आमदार वा नेतेमंडळी मात्र स्थानिक राजकारणात आता हे कसे जमवून घ्यायचे या विचाराने त्रस्त होते. पण राज्यात सत्तांतर झालेच. 

पण हि आघाडी याआधीच अस्तित्वात आली असती. म्हणजे २००९ सालीच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले असते मात्र युती करूया म्हणत म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना टोलवल होत. आणि हा किस्सा सांगितला होता दस्तुरखुद्द मनोहर जोशींनी. 

त्याच झालं असं होत कि, २००९ सालात महाराष्ट्राचं राजकारण एका अपरिहार्य परिस्थितीतून जात होत. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप हे चार प्रमुख प्रवाह. परंतु या चार पक्षांपैकी कोणत्याही एका पक्षाचा राज्यभर प्रभाव नसल्याने आघाडी-युतीची आवश्यकता स्पष्ट होती. आघाडी किंवा युती करताना स्थानिक नेतृत्व, स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही आणि आघाडी-युतीचा निर्णय हा केंद्रीय, राज्यस्तरीय नेतृत्वाकडून लादल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांत दिसून यायला लागली होती. 

त्यामुळेच एकमेकांविषयी अविश्वासाच्या वातावरणातच आघाडी-युती निवडणुकीत उतरलेली दिसली. २००९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजपा युती असा सामना होत असला तरी राष्ट्रवादीची शिवसेनेशी जवळीक, पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिक जागांची मागणी अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीविषयी एकप्रकारे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. 

यातूनच काँग्रेसमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात दबाव वाढत गेला. शिवाय राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, राज्यात काँग्रेसची ताकद कमी करण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांत असल्याने काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीविषयी नाराजी दिसून आली होती. 

याच काळात शरद पवार शिवसेनेशी युती होऊ शकते का ? याविषयी चाचपणी करत होते. 

त्याबद्दल मनोहर जोशी सांगतात कि,

२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-राष्ट्रवादी युती करून लढण्याची कल्पना पवार यांनी मांडली. मी स्वत: त्याचा साक्षीदार होतो. मी व उद्धव यांनी चर्चा केली आणि एकत्र लढण्याचे ठरवलेही. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पेडररोड येथील त्यांच्या एका मराठी उद्योजक मित्राच्या घरी गेलो असताना, ‘या वेळी एकत्र लढणे कठीण दिसते’ असे सांगून त्यांनीच पाठ फिरवली. आयत्या वेळी त्यांनी आपला शब्द फिरवला. 

पुढे पवारांनी स्वबळावर लढण्याच्या पर्यायाचा पण विचार करून पाहिला. 

पण दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्यास मतविभागणीचा फायदा सेना-भाजपला होतो म्हणून शेवटी दोन्ही काँग्रेसने आघाडी कायम ठेवली. परंतु जागा वाटपाचा पेच सुटण्यास महिना लागला. २००४ नंतरच्या पाच वर्षांत राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने राष्ट्रवादीने अधिक जागांची मागणी केली तर काँग्रेस २००४ सालच्या लोकसभा निवडणुकी प्रमाणेच जागावाटप करण्यावर ठाम राहिली.

तर दुसरीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करणार असल्याच्या चर्चेमुळे भाजपात अस्वस्थता पसरली होती, पण राष्ट्रवादीने काँग्रेसशीच आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने भाजप आणि काँग्रेसवाल्यांनाही दिलासा मिळाला होता. शिवसेनेने ही चर्चा बाहेर येऊच दिली नव्हती. 

आयत्या वेळी शरद पवारांनी आपला शब्द फिरवला म्हणून नाराज होऊन मनोहर जोशी म्हंटले होते की,  

अशा पवारांवर किती विश्वास ठेवायचा हे मी कशाला सांगायला हवे. संधीचा फायदा अचूकपणे कसा घ्यायचा हे पवारांना चांगलेच कळते. 

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.