कधीही न हारलेले पवार हारले.. निमित्त होतं “कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक..” 

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येतेय. यावरून बरीच टिका टिप्पणी सूरू आहे. काही जणांच्या मते ही निवडणूक म्हणजे पुन्हा एकदा फॉर्मेलिटीच असेल. तर काही जेष्ठ नेत्यांच्या मते कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकांच्या निमित्ताने का होईना. गांधी घराण्याच्या बाहेरचा पर्याय स्वीकारण्याची तयारी गांधी घराण्याला करावी लागेल हे दाखवून देईल..

थोडक्यात काय तर वरवरून दिसते तितकी सोप्पी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोप्पी नसते. ती किती अवघड असते, तर निवडणूकांच्या राजकारणात कधीही पराभव पहायला न लागलेले शरद पवार देखील या निवडणूकीत हारले होते.

तोच हा किस्सा..

तर १९९६ साली नरसिंहराव यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेली कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीत सिताराम केसरी, राजेश पायलट आणि शरद पवारांनी उमेदवारी जाहिर केली होती. त्यामध्ये शरद पवारांचा पराभव झाला होता.

१६ मे १९९६

लोकसभेचा निकाल लागला होता. कॉंग्रेस पडझडीच्या काळात होते. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजप व सहकारी पक्षांनी सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपचे १६१ खासदार निवडून आले होते तर त्याखालोखाल कॉंग्रेसचे १४० खासदार निवडून आले होते. भारतीय निवडणुकांच्या इतिहासात कॉंग्रेसची आत्तापर्यन्तची सर्वात निच्चांकी संख्या होती.

अशातच सर्वांधिक खासदार असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना अर्थात वाजपेयींना सत्तास्थापन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. वाजपेयी सरकार सत्तेत आले पण १६ दिवसातच वाजपेयी सरकार गडगडलं. त्यानंतर ४६ खासदार असणाऱ्या जनता दलाच्या एच.डी. देवेगौडा यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली. दक्षिणेतलेच असल्याकारणाने कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष नरसिंहराव यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला.

त्यानंतर घडामोडी सुरू झाल्या त्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या

राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहराव यांनी कॉंग्रेस पक्षाची धुरा संभाळली होती. सोनिया गांधी राजकारणाच्या मुख्यप्रवाहात यायच्या होत्या. १९९६ च्या निकालानंतर नरसिंहराव यांचा कार्यकाळ संपला आणि पक्षाला एका नव्या अध्यक्षाचे वेध लागले.

त्या काळात शरद पवार हे कॉंग्रेसचे पहिल्या फळीतले नेते होते. शरद पवारांच वजन कॉंग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत होतं. एकट्या शरद पवारांच्या धुर्त खेळीमुळेच वाजपेयी सरकार कोसळल्याची बातमी होती. अशा वेळी शरद पवारच कॉंग्रेसचे अध्यक्ष होवू शकतील अस सर्वांचच मत बनलं होतं.

अशा वेळी पक्षात एक सुप्त शक्तीचा प्रभाव जाणवत होता.

ती सुप्त शक्ती म्हणजे सोनिया गांधी. सोनिया गांधी यांच्याबद्दल सहानभुती बाळगळाणाऱ्या गटामार्फत ए.के. अॅन्टनी यांचे नाव समोर आणण्यात आले. केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात देखील अॅन्टनी दोन रुमच्या घरात राहत असल्याची चर्चा होती. त्यांच्या राजकिय महत्वकांक्षा फार कमी होत्या. भविष्यातील सोनिया गांधी यांच्या प्रवेशासाठी ए.के.अॅन्टनी हे सोयीस्कर नाव होतं. मात्र हिच गोष्ट अॅन्टनी यांच्यासाठी मागे जाणारी ठरली. गटातटाचे राजकारण अॅन्टनी यांच्या आवाक्याबाहेरचं होतं त्यामुळे त्यांच नाव या स्पर्धेतून बाहेर पडलं.

याच वेळी दूसऱ्या एका माणसांच नाव देखील चर्चेत होतं. राजकारणात त्यांना “द ओल्ड मॅन इन हरी” या नावाने ओळखले जात होते. सिताराम केसरी अस त्यांच नाव.

सिताराम केसरी हे आपल्या फटकळ स्वभावामुळे प्रसिद्ध होते. त्यांच्या राजकिय महत्वकांक्षा लपून राहिलेल्या नव्हत्या. २४ अकबर रोडच्या कॉंग्रेस मुख्यालयात १९७८ पासूनच केसरींच्या कुरघोडीच्या राजकारणास सुरवात झाली होती. कॉंग्रेस अध्यक्षाच्या खोलीच्या शेजारी कोषाध्यक्ष यांची खोली होती.

१९८० साली प्रणव मुखर्जी यांच्याकडून सिताराम केसरी यांच्याकडे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी आली होती. अध्यक्षपदाच्या शेजारची खोली मिळाल्यापासूनच सिताराम केसरी यांच्या महत्वकांक्षेने धुमारे घेतल्याच सांगण्यात येत. इतकं की भारताचा पंतप्रधान होवूनच शांत बसेल अशी त्यांची धमक तेव्हा पहायला मिळत असे.

केसरी हे हुशार राजकारणी नव्हते. त्यांच शिक्षण देखील जेमतेम होते. पण कुरघोडीच राजकारण करण्यात ते माहिर समजले जातं. कोणत्याही व्यक्तीला ते कधिही स्वत:सोबत घेवू शकत होते. ते स्वत:ला आम आदमी म्हणतं

केसरी यांच्यासोबत दूसरं नाव होतं ते राजेश पायलट यांच. राजेश पायलट यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणुक लढवणं हा त्यांनी घेतलेला सर्वात मोठ्ठा घास असल्याच सांगण्यात येतं. राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात काम केलं असल्याने कॉंग्रेसमधला “गांधी” गट आपल्यासोबत राहिलं असा त्यांना विश्वास असावा. या दोघांशिवाय तिसरं नाव होतं ते अर्थात शरद पवार.

पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असणारे कॉंग्रेसचे सर्वात मोठ्ठे नेते म्हणून शरद पवार परिचित होते. अशा वेळी शरद पवाराच कॉंग्रेसचे पुढचे अध्यक्ष होणार हे नक्की होतं

अध्यक्षपदासाठी प्रचार सुरू झाला.

या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे पदाधिकारी मतदान करणार होते. पेशाने पायलट असणाऱ्या राजेश पायलट यांनी स्वत: प्रायव्हेट जेट घेवून प्रचारास सुरवात केली होती. इकडे शरद पवार दिल्लीत तळ ठोकून राजकारण करत होते. वास्तविक पदाधिकाऱ्यांचं मत म्हणजे भारतभर असणाऱ्या कॉंग्रेसी श्रेष्ठींच गटातटाच राजकारण होतं. हे गटातटाच राजकारण भेदण्याच लक्ष्य शरद पवारांच्या समोर होतं. शरद पवारंच्या बैठकांनी वेग घेतला होता.

या दरम्यान सिताराम केसरी यांचा निवांत कारभार चालू होता. कोणत्याही परिस्थितीत हि निवडणुक जिंकायची हा चंग त्यांनी बांधलेला होता पण प्रचारादरम्यान तितकी आक्रमकता दिसत नव्हती. सोनिया आणि गांधी घराण्याच्या पुढे कॉंग्रेसचा आमआदमी हा त्यांचा USP होता. आम आदमी कष्टातून वर आलेला नेता यापलिकडे त्यांच्याकडे सांगण्यासारखं देखील काही नव्हतं.

निवडणुका पार पडल्या, निकाल लागला

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा निकाल लागला तेव्हा राजेश पायलट यांना ३५४ मते पडली होती. शरद पवारांना ८८२ मते मिळाली होती तर आम आदमी असणाऱ्या सिताराम केसरी यांना चक्क ६,२२४ इतकी प्रचंड मते पडली होती. हा फरक अकल्पित होता. सिताराम केसरी यांनी एकहाती बाजी मारली होती.

हि निवडणुक म्हणजे फक्त एक फार्स होता अस अनेकांच म्हणणं होतं. त्यानंतरच्या काळात पक्षात सोनिया गांधींच वजन वाढत गेलं. पंतप्रधानपदाच्या अपेक्षेने केसरींनी देवेगौडा सरकार पाडलं. गुजराल यांच सरकार पाडण्यासाठी देखील तेच कारणीभूत होते. पंतप्रधान बनण्यासाठी त्यांना घाई झाली होती.

त्यांच्या महत्वकांक्षा इतक्या वाढल्या की ते स्वत: म्हणू लागले की, 

ना खाता ना बही, जो केसरी कहें वहीं सहींपण इथे त्यांची डाळ शिजली नाही व ते न लाभलेले पंतप्रधान झाले. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.