राधाकृष्ण विखेंना ताकद देणं म्हणजे खरं टार्गेट शरद पवार आहेत, कसं तर असं…

मागच्या दिड महिन्यापासून रखडलेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे गटातील ९ आमदार आणि भाजपमधील ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.  यात पहिला नंबर लागला जे सर्वात ज्येष्ठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा !

काँग्रेसमध्ये हयात घालवलेल्या विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करत आज कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांना मंत्रिपद देणं जितकं महत्वाचं होतं तितकंच आणखी एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे,

राधाकृष्ण विखेंना मंत्री पदे देऊन त्यांना ताकद देण्यामागे खरं टार्गेट शरद पवार आहेत.

तुम्ही म्हणाल की, इथं विखेंना मंत्रिपद देऊन भाजप पवारांना का डिवचेल ? तर त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक मोठा संघर्षाचा इतिहास पाहावा लागेल.  

विखे विरुद्ध पवार…..

खूप खूप वर्षांपुर्वी आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहीला होता. या कारखान्यामध्ये रितसर अर्ज करून एक तरुण नोकरीस लागला होता. या तरुणाच नाव अप्पासाहेब पवार. अप्पासाहेब पवार हे शरद पवार यांचे थोरले बंधु. 

अप्पासाहेब पवार पुढे आपल्या कर्तृत्वावर याच कारखान्यात MD झाले. शरद पवार यांच शालेय शिक्षण देखील याच भागात असणाऱ्या कर्मवीरांच्या संस्थेत झालं. शरद पवारांनी शालेय वयात उभारलेला गोवा मुक्तीसाठी विद्यार्थांचा लढा याच ठिकाणी उभारलेला होता. थोडक्यात सांगायचं झालं तर विखे घराणं आणि पवार घराणं यांचे फार पुर्वीपासूनचे तसे चांगले संबध.

पण पण पण….

लक्षात घ्या मित्रांनो राजकारणात या पण ला खूप किंमत असते. एक घराणं असलं तरी अप्पासाहेब पवार हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. विठ्ठलराव विखे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार व्यक्तिगत होते. आपण जर अशी अपेक्षा व्यक्त करत असलो की हेच चांगले संबध त्याच घराण्यातील दूसऱ्या फळीतल्या व्यक्तींमध्ये असावेत तर तुम्ही राजकारणाच्या पातळीवर चुकत आहात.

तर आत्ता या ‘पण’ मधून मुद्दा सुरू होतो तो बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध शरद पवार या राजकारणाचा.

नेमका हा संघर्ष कधीचा? याबद्दल कोणालाच ठामपणे सांगता येत नसलं तरी बाळासाहेब विखे पाटील हे शंकरराव चव्हाण गटाचे आणि शरद पवार हे स्वत: शरद पवार गटाचे यातच एकमेकांच्या विरोधाची बीज असल्याचं दिसून येतं.

सुरवातीच्या काळात बाळासाहेब विखे पाटलांनी नगर जिल्ह्याच आणि पर्यायाने महाराष्ट्राच राजकारण करत असताना शिवराज पाटील, ए.आर.अंतुले, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विलासराव देशमुख, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, संभाजी काकडे अशी फळी उभा केली किंवा अशा फळीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहले. हि फळी कॉंग्रेसची होती, सेनेची होती, प्रसंगी भाजपची होती.

पण एक गोष्ट फिक्स होती हि सगळी फळी शरद पवारांना विरोध करणारी होती.

दूसरीकडे शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या राजकारणाला शह देण्याच्या राजकारणात अण्णासाहेब शिंदे, पी.बी. कडू पाटील, भाऊ साहेब थोरात, मारुतराव घुले, बाबुराव तनपुरे, शंकरराव काळे, माजी मंत्री गोविंदराव आदिक, चंद्रभान घोगरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, दादा पाटील शेळके, माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांना पाठबळ देत आणि प्रसंगी यांच पाठबळ घेत विखे विरोध जपला, किंवा या प्रसंगी यांचा पाठिंबा देखील घेतला.

पण मुद्दा असा की, बाळासाहेब विखे असोत की शरद पवार यांनी एकमेकांचा विरोध जपताना गटातटाच राजकारण जपलं, उलट ते जोर धरण्यासाठी प्रयत्न देखील केले. 

असही सांगितल जातं की शरद पवारांनी पुलोदचा कार्यक्रम केला तेव्हा बाळासाहेब विखे पाटलांना ऑफर दिली होती पण बाळासाहेबांनी कॉंग्रेस एकनिष्ठतेचे कारण सांगून वेळ मारून नेली. कारण काहीही असो बाळासाहेब विखे पुलोद कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत हे तर दिसणार वास्तव आहे आणि ते नाकारून चालत नाही. थोडक्यात काय तर हेवेदावे आणि राजकारण हे पहिल्यापासूनच होतं.

पण या सगळ्या प्रकारांना खरी ठिणगी पडली ती 1991 साली.

1991 सालची लोकसभा इलेक्शन. जागा होती ती नगर दक्षिणची. या मतदारसंघात बाळासाहेब विखे पाटलांना टाळून ती जागा कॉंग्रेसकडून यशवंतराव गडाख यांना देण्यात आली. शरद पवारांनी यशवंतराव गडाख यांच्या बाजूने जोर लावला होता तर विरोधात असणारे अपक्ष उमेदवार बाळासाहेब विखे या सगळ्या विरोधाला आपआपल्या परीने तोंड देत होते. निकालाचा दिवस उगवला. त्या दिवशी बाळासाहेब विखे यांचा पराभव झाला.

स्वत:च्या जिल्ह्यातला हा पराभव बाळासाहेब विखे पाटलांच्या जिव्हारी लागण्यासारखाच होता. पण शांत बसणाऱ्यातले बाळासाहेब देखील नव्हते.

तसही इथे एक इलेक्शनचा विखे पॅटर्न लोकांना परिचितच आहे. विरोधकांच्या सभा विरोधकांहून अधिक कान देवून विखेंची लोकं ऐकत असतात. झालं देखील तसच पराभवानंतर जातीचा आणि धर्माचा वापर करण्यात आला म्हणून एक एक पुरावा घेवून बाळासाहेब विखे पाटील कोर्टात गेले. गडाख यांना आरोपी करण्यात आलं तर सहआरोपी म्हणून शरद पवार यांच नाव होतं.

हि विखे विरुद्ध पवार राजकारणातली जाहिर ठिणगी होती. 

पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि शरद पवार कसलेल्या पैलवानासारखे यातून बाहेर पडले. सांगणारे असही सांगतात की इथे शरद पवार अडकले असते तर त्यांच राजकारण 1991 मध्येच संपल असत. इलेक्शमध्ये आचारसंहिता असावी हे शहाणपण देखील याच केसमधून मिळाल्याच सांगण्यात येतं. पण या सर्व प्रकरणात शरद पवार सुटले. खर सांगायचं झालं तर सुटलेच.

त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. कॉंग्रेस सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेवर सर्वात जहरी टिका कोणी केली असेल तर ते नाव होतं बाळासाहेब विखे पाटील यांच.

बाळासाहेब विखे पाटलांना केंद्रात मंत्रीपद हे फक्त आणि फक्त पवार विरोधामुळे मिळत नसल्याच सांगितलं जात आणि त्यामुळेच त्यांनी शिवसेना प्रवेश केला होता अस तात्कालिन कारण असल्याचं बोललं जातं.

पुढे हे राजकारण एकमेकांच्या विरोधावरच पोसलं गेलं. इतकं की 2008 साली शिर्डी मतदार संघ जेव्हा राखील झाला तेव्हा रामदास आठवले यांना शिर्डीतून उमेदवारी देण्यात आली. रामदास आठवले तेव्हा शरद पवारांचे होते. त्यांच्या विरोधात देखील काम करायचं नाही आणि समर्थनात देखील काम करायचं नाही असा कट्टर कॉंग्रेसी निर्णय बाळासाहेब विखेंनी घेतला.

त्याचाच परिणाम म्हणजे आठवलेंचा पराभव झाला. आठवलेंच्या पराभवामुळे पुढे काय झालं पहाण्यासाठी मतांची टक्केवारी पाहिली तर विखे पाटलांपासून कोणता गट तुटला याच्यातच सगळ दिसतं.

बाळासाहेब विखेंच्या सारख्या नेत्याला हा गट कायमचा जावू शकतो हे माहित असणारच तरिही त्यांनी धोका पत्करला कारण समोरचा पवारांचा माणूस होता. पुढे हा संघर्ष चालूच राहिला. इतका की बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर डोकं टेकण्यासाठी देखील शरद पवार फिरकले नाहीत.

आपल्याकडे सांगितलं जातं की माणूस गेल्यानंतर संघर्ष संपतो पण शरद पवारांनी राजकारण जपताना प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली. 

कदाचित त्याच संघर्षाची आठवण काढून देत भाजपने पवारांच्या कट्टर राजकीय विरोधकाला कॅबिनेट मंत्रिपद देऊन ताकद दिली. म्हणूनच राधाकृष्ण विखेंना ताकद देणं म्हणजे खरं टार्गेट शरद पवार आहेत ते या भल्या मोठ्या इतिहासानंतर कळून गेलंच असेल..

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.