१९६८ साली सांगलीचा माणूस बनवला ठाण्याचा नगराध्यक्ष, शरद पवारांची अशीही एक करामत.

आपल्या राजकीय जीवनाच्या तब्बल ५६ वर्षांनी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजीनाम्याचा निर्णय घोषित केला. पवारांच्या राजकीय जीवनात त्यांनी केलेल्या अनेक गोष्टींना आता उजाळा दिला जातोय.

चाणक्य म्हणल्यानंतर शरद पवारांचेच नाव घेतले जाते. काही वर्षांपूर्वी अमित शहांचा उल्लेख चाणक्य म्हणून होवू लागलेला पण महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे त्यास ब्रेक लागला आणि पुन्हा एकदा शरद पवारच चाणक्य म्हणून गणले जावू लागले.

थोडक्यात काय तर, राजकारणातले डावपेच व तेल लावलेला पहिलवान म्हणून पवारांच स्थान तस अबाधितच आहे म्हणता येईल.

पण तुम्हाला माहित आहे का शरद पवारांचं नाव कोणत्या घटनेमुळं प्रसिद्ध झालं. कोणत्या शहराची ती निवडणुक होती ?

हि सुरवात होती ती ठाण्यातून.

ठाणे नगरपालिकेची निवडणुक व त्या निवडणुकीतला हा किस्सा तुम्हाला शरद पवारांच्या पहिल्या ॲडजेस्टमेंन्ट बद्दल सांगण्यास पुरेसा आहे. या घटनेचं वर्णन खुद्द शरद पवारांनी २००३ साली बारामती येथील गदिमा सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी केलं होतं.

पी. सावळाराम उर्फ निवृत्ती रावजी पाटील हे मराठीतले मोठ्ठे गीतकार. गीतकाराबरोबर ते राजकारणी देखील होते. ठाणे नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते. त्यांच मुळ गाव सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी.

येडेमच्छिंद्र , येडेनिपाणी अशी भल्लमोठ्ठी नावं वापरण्याऐवजी “येड्याची माणसं” असा सर्वसाधारण उल्लेख या गावांतील माणसांच्या बाबतीत केला जातो. अस असलं तरी क्रांन्तीसिंह नाना पाटील, पी. सावळाराम यांच्यासारखी माणसं अशाच गावांनी महाराष्ट्राच्या मातीला दिली.

तर तेव्हा पी. सावळाराम यांना ठाण्याचे नगराध्यक्ष करायचे होते.

१९६८ साल होतं ते. तेव्हा पी. सावळाराम नगरसेवक होते. शरद पवार हे नुकतेच विधानसभेत निवडून आले होते तर गदिमा हे विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्य होते.

पी. सावळाराम आणि गदिमा यांच चांगलच स्नेह होतं. त्यामुळेच आपणाला नगराध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी त्यांनी गदिमांच्याजवळ व्यक्त केली. झाले गदिमांनी पी. सावळाराम यांची मागणी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याजवळ पोहचवली.

वसंतराव नाईकपुढे गदिमांचा शब्द मोडण्याचं कारण देखील नव्हतं. लागलीच वसंतराव नाईकांनी हि जबाबदारी तेव्हाचे कॉंग्रेस सेक्रेटरी आणि आमदार असणाऱ्या शरद पवार यांच्या खांद्यावर सोपवली. शरद पवारांनी देखील वसंतराव नाईकांचा शब्द म्हणल्यानंतर तात्काळ होकार दिला.

पण मुद्दा होता तो संख्याबळाचा.

हि जबाबदारी आली होती ती शरद पवारांच्या खांद्यावर. शरद पवार तेव्हा विधानसभेत नवखेच होते पण त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख केलीच होती. ती ओळख म्हणजे मते कमी पडत असतील तर याला हाताशी धरा पण ती ओळख स्थानिक पातळीवरच्या किंवा पंक्षातर्गत राजकारणातली होती. हि पहिली वेळ होती जेव्हा ठाण्यासारख्या नगरपालिकेत शरद पवारांना स्वत:च्या कर्तृत्वाची छाप पाडायची होती.

शरद पवारांनी अंदाज घेतला तेव्हा लक्षात आलं की, नगराध्यक्ष पदासाठी मतं कमी पडणार. त्यानंतर शरद पवार स्वत: ठाण्यामध्ये दोन दिवस जावून राहिले.

दोन दिवसानंतर नगराध्यक्ष पदाची निवडणुक झाली.

पी. सावळाराम निवडुन आले.शरद पवारांनी त्यांना आपल्या गाडीमध्ये घातलं आणि थेट वर्षा बंगल्यावर घेवून गेले. तिथे गदिमा, वसंतराव नाईक त्यांचीच वाट पाहत बसले होते. काय झालं याचा अंदाज त्यांना नव्हता.

शरद पवार आत आले आणि वसंतरावांना म्हणाले, पी. सावळाराम नगराध्यक्ष झाले. निवडुन आले. हे ऐकताच जवळ असणारे गदिमा उठले आणि शरद पवारांकडे कौतुकाने धावतं येत म्हणाले,

“ बहाद्दरा काय काम केलस ! येड्याचा पाटील ठाण्याचा महापौर केलास !!

तेव्हा ठाण्याचं मेंन्टल हॉस्पीटल प्रसिद्ध होतं तर पी. सावळाराम येडेनिपाणीचे म्हणून येड्याचे प्रसिद्ध होते. त्यांच्या या त्या काळातल्या शाब्दिक कोटीवर शरद पवारांनी दाद दिली.

या घटनेतून शरद पवारांच देखील वेगळं कौतुक झालंच पण त्यातूनच त्यांना राजकारणातलं चाणक्य म्हणून ओळखलं देखील जावू लागलं ते कायंमचं !

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.