या उपमुख्यमंत्र्यामुळे पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला.
आणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. कॉंग्रेसमधल्या देखील जुन्या नेत्यांचे इंदिराजींनी राजकारणात अनुनभवी असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली असे मत बनले होते. या दोन्ही गटात वाद झाल्यामुळे कॉंग्रेसची फाळणी झाली व इंदिरा गांधी कॉंग्रेसपासून वेगळ्या झाल्या.
हे दोन्ही कॉंग्रेस स्वतःला मूळ कॉंग्रेस म्हणवून घ्यायचे. तरी त्यांच्या अध्यक्षांच्या नावावरून ते ते पक्ष ओळखले जायचे. इंदिरा कॉंग्रेस आणि रेड्डी कॉंग्रेस.
यशवंतराव चव्हाण हे केंद्रातही सर्वात वरिष्ठ नेता म्हणून ओळखले जायचे. त्यांनी नेहरूंच्या व लालबहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्रीपद तर इंदिरा गांधी यांच्या मंत्री मंडळात गृह, अर्थ, परराष्ट्र अशी महत्वाची खाती संाभाळली होती. इंदिरा गांधी यांच्यानंतर कॉंग्रेसचे दोन नंबरचे नेते असच त्यांना ओळखल जायचं.
यापूर्वी जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींच्या विरोधात बंड झालं होतं तेव्हा त्यांनी इंदिराजींना साथ दिली होती. पण यावेळी मात्र त्यांनी ब्रम्हानंद रेड्डी, देवराज अर्स यांची साथ द्यायची ठरवली.
यशवंतराव चव्हाणांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातही कॉंग्रेस दुभंगली. अनेक मोठे नेते त्यांच्यासोबत रेड्डी कॉंग्रेसमध्ये आले. यशवंतरावांचे विरोधक समजले जाणारे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी स्वतःचा महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस नावाचा पक्ष काढला. इंदिरा कॉंग्रेसमध्ये वसंतराव साठे, रामराव आदिक व नासिकराव तिरपुडे असे मोजकेच नेते उरले होते.
एकेकाळी राजकीय संन्यास घेतलेले वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाणांना हटवून मुख्यमंत्री बनले होते.
१९७८च्या विधानसभा निवडणुका झाल्या. जनता दलाचे सर्वाधिक ९९ आमदार निवडून आले होत. राष्ट्रीय पातळीवर आलेल्या जनता दलाच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात देखील पडले होते. रेड्डी कॉंग्रेसचे ६९ तर इंदिरा कॉंग्रेसचे ६२ आमदार विजयी झाले होते. जनता दल चर्चेत अडकली होती तेव्हा वसंतदादांनी शरद पवारांच्या सारख्या धूर्त नेत्याच्या मदतीने दोन्ही कॉंग्रेस युतीचे सरकार बनवले.
रेड्डी कॉंग्रेसकडे मुख्यमंत्रीपद तर इंदिरा कॉंग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद अशी विभागणी करण्यात आली. वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री बनले.
यापूर्वी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद अस्तित्वात नव्हते पण पहिल्यांदाच आघाडी सरकार बनल्याने नव्याने उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. विदर्भातील दलित चळवळीतून आलेले इंदिरा कॉंग्रेसचे नेते नासिकराव तिरपुडे या पदावर बसले.
पण हे आघाडी सरकार अस्तित्वात आल्याच्या पहिल्या दिवसापासून नासिकराव तिरपुडेनी यशवंतराव चव्हाणांच्यावर टीका करण्यास सुरवात केली. नासिकराव तिरपुडे हे आधीपासून विदर्भवादी नेता म्हणून प्रसिद्ध होते, त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सहकार लॉबीच्या नेत्यांवर राग होता. हे नेते फक्त मराठा समाजाचच नेतृत्व करतात असा त्यांचा आरोप असायचा.
इंदिरा गांधीना देखील यशवंतराव चव्हाणांनी आपली साथ दिली नाही याचा राग होता.
त्यांनी नासिकराव तिरपुडेनां बळ दिले. आक्रमक राजकारण केले नाही तर महाराष्ट्रात आपले अस्तित्व राहणार नाही ही त्यांची व संजय गांधी यांची समजूत झाली होती, यशवंतराव चव्हाणांचे पंख महाराष्ट्रातच कापले पाहिजेत असे त्यांचे धोरण होते.
नासिकराव तिरपुडे यांना मोकळीक देण्यात आली. याचा त्यांनी फायदा उचलला.
दादांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करून स्वतःच मुख्यमंत्री असल्याच्या थाटात प्रतिसरकार चालवण्यास सुरवात केली. मुख्यमंत्र्यांकडे जाणारी प्रत्येक फाईल आधी माझ्याजवळ आली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. पत्रकार परिषदासुद्धा वेगळ्याच घेतल्या जाई. इंदिरा कॉंग्रेसचे आमदार वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते.
एकदा पत्रकारांनी नासिकराव तिरपुडे यांना आघाडीचे सरकार कसे चालू आहे हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी वसंतदादांच्या काठी टेकीत चालण्यावरून असंस्कृत टिप्पणी केली की,
” काठी टेकीत टेकीत चालू आहे.”
दोन्ही कॉंग्रेसमध्ये दुरावा वाढत चालला होता. रेड्डी कॉंग्रेसचे नेते आपल्या जेष्ठ नेत्यांवर रोज होणार्या टिकेमुळे चिडून होते.
खुद्द वसंतदादांनी एका आमदारांच्या बैठकीत हे सरकार गेल गाढवाच्या *** असा ग्राम्य भाषेत उद्धार केला होता. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानस पुत्र म्हणून ओळखले जायचे. दादांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री देखील होते. दादांनी त्यांना थेट सांगितलं ही होतं,
“शरद, या नाशिकरावचे बघा काय तरी, नाही तर मीच राज्यपालांकडे राजीनामा देऊन आपल्या सगळ्यांचीच नाशिकरावच्या जाचातून सुटका करून घेतो.”
इंदिरा कॉंग्रेसच्या ऐवजी जनतापक्षाचा पाठींबा घेऊ असा विश्वास वसंतदादांना होता. त्यांची केंद्रात नेते असणाऱ्या चंद्रशेखर यांच्याशी मैत्री होती. पण जेव्हा खरोखरीस राजीनाम्याची वेळ आली तेव्हा दादांनी धाडस दाखवले नाही. मात्र इतर यशवंतराव चव्हाण समर्थक नेते आक्रमक झाले होते. त्यांनी हे सरकार पडायची तयारी सुरु केली.
जेष्ठ संपादक गोविंदराव तळवळकर यांनी अग्रलेख लिहिला की
हे सरकार पडावे ही तर श्रींची इच्छा.
या अग्रलेखानंतर सरकार पाडण्याच्या गतीविधी वेगवान झाल्या. दादांना कुणकुण लागली होती. मात्र त्यांच्या हातातून सर्व गोष्टी निसटत चालल्या होत्या. उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे हे अवघड जागेचे दुखणे बनले होते. त्यांच्यामुळे वसंतदादांची फरफट होत होती.
अखेर १२ जून १९७८ रोजी शरद पवार, सुंदरराव सोळंकी, सुशीलकुमार शिंदे व दत्ता मेघे या चार मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यांना ३८ आमदारांचा पाठींबा होता. यशवंतरावांचे कट्टर मित्र व जेष्ठ नेते आबासाहेब कुलकर्णी खेबुडकर व किसन वीर हे त्यांच्या बरोबर होते.
खुद्द यशवंतराव चव्हाण राज्यात सरकार अस्थिर करण्याच्या बाजूने नव्हते. त्यांनी तसा फोन शरद पवारांना केला देखील पण किसन वीर यांनी पवारांच्या हातातून फोन हिसकावून घेऊन यशवंतरावाना सांगितले,
“तरुण मुलांनी निर्णय घेतला आहे, त्यात बदल होणार नाही. पोरांचं राजकीय आयुष्य बरबाद होईल अस काही करायला सांगू नका. “
आबासाहेब कुलकर्णी यांनी चंद्रशेखर यांना फोन करून जनता पक्षाच्या पाठिंब्याची व्यवस्था केली. रेड्डी कॉंग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट सरकारमधून बाहेर पडला व नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली. राज्यात एसएम जोशी यांनी सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून पवारांना पसंती दिली. जवळपास एक महिन्याच्या घडामोडीनंतर १८ जुलै १९७८ रोजी वसंतदादांनी राजीनामा दिला.
आणि पुरोगामी लोकशाही दलाचे शरद पवार मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात ही घटना पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून प्रसिद्ध झाली.
पुढे वसंतदादा पाटील इंदिरा कॉंग्रेसमध्ये परतले. परत मुख्यमंत्री झाले, शरद पवार देखील परत कॉंग्रेसमध्ये आले. वेगळ्या कॉंग्रेसच अस्तित्वच मिटल. ज्या नासिकराव तिरपुडे यांच्यामुळे हे घडले ते मात्र काही वर्षांनी जनता पक्षात गेले. राजकीय पटलावर त्यांचं महत्व कमी कमी होत गेल.
१९८६ साली वेगळा विदर्भ मागून त्यांनी खळबळ करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही, पुढे त्यांनी अखिल भारतीय इंदिरा कॉंग्रेस नावाचा पक्ष स्थापन करून अखेर पर्यंत त्याचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राहिले.
हे ही वाच भिडू.
- म्हणून इंदिरा गांधींनी पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली.
- एका रात्रीत खेळ झाला आणि एस.एम. जोशींच संभाव्य मुख्यमंत्रीपद गेलं.
- सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य.