म्हणून शरद पवारांनी ११ च्या ऐवजी १२ बॉम्बस्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती…

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलले…

त्याचं निमित्त ठरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याक संमेलन.  या संमेलनात शरद पवार बोलतांना म्हणाले, “देशात सांप्रदायिक शक्तींचा जोर वाढतोय. या सर्व शक्तींच्या विरोधात लढणं आता गरजेचं बनलं आहे. मुळात काश्मीर फाईल्स या चित्रपटाला परवानगी देण्याची आवश्यकता नव्हतीच..कारण या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगंडा राबवण्याचा प्रयत्न होतोय. असंच सुरु राहिलं तर देशात सामाजिक सलोखा, एकता राहणार नाही”.

आता ‘द काश्मीर फाईल्स’  निमित्ताने पवार सामाजिक एकतेच्या बाबतीत बोलल्यानंतर त्यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर केलेल्या एका कृतीमुळे त्यांच्यावर टीका जातेय.  ती कृती म्हणजे शरद पवारांनी ११ च्या ऐवजी १२ बॉम्बस्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती…पण त्यांनी ही चुकीची माहिती का दिली होती ?

तर विषय असाय….

१२ मार्च १९९३ साली मुंबई शहर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. रात्री उशीरा अंतीम आकडा समजला तेव्हा १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली होती.

मात्र ज्या क्षणी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता तेव्हा ११ ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पोलीसांनी दिली होती.

तरिही शरद पवारांनी १ बॉम्बस्फोट अधिकचा झाल्याचा आकडा सांगितला होता. मुंबईच्या दंगलीबाबत नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगाने देखील त्यांना चुकीचा माहिती का दिली होती हा प्रश्न विचारला होता

याचा खुलासा खुद्द शरद पवारांनी लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

शरद पवार लिहतात,

१२ मार्च. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून सहाच दिवस झाले होते. सहाव्या मजल्यावरच्या मुख्यमंत्री कार्यालयात मी कामकाजात गर्क होतो. बाराच्या सुमारास अचानक धडाम् दिशी आवाज आला.

मी खिडकीपाशी धावलो, पाहतो तर एअर इंडियाच्या इमारतीतून लोक सैरावैरा पळताना दिसत होते. तो आवाज बॉम्बस्फोटाचाच आहे याची मला खात्री होती. मी कार्यालयातून घटनास्थळी जाणार एवढ्यात मुंबईचे पोलीस आयुक्त अमरजितसिंग सामरा मला म्हणाले,

आम्ही स्थितीची पहाणी करतो आणि तुम्हाला माहिती देतो.

थोड्याच वेळात समजलं की शिवसेना भवन, शेअर बाजार, सेंच्युरी बाजार, एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंटार, झवेरी बाझार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस वरळी, काथा बझार वरळी, हॉटेल सी रॉक, सहारा विमानतळ (आत्ताचे छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळ) या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत.

ही सारी ठिकाणं हिंदूबहूल होती. हिंदू समाजानं पेटून मुंबईत आणखी रंणकंदन व्हावं असा डाव स्फोटामागे असावा हे मी ताडलं.

एअर इंडियाच्या इमारतीतल्या स्फोटकांच मी बारकाईने निरिक्षण केलं. संरक्षण मंत्रालयात काम केलेलं असल्यामुळे ती साधी स्फोटकं नव्हती, हे ही माझ्या लक्षात आलं.

संरक्षण मंत्रालयात डॉक्टर अब्दुल कलाम माझे सल्लागार होते. त्यांना मी फोन केला आणि स्फोटकांच वर्णन केलं. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी ही स्फोटासाठी RDX चाच वापर झाल्याच्या माझ्या शंकेला दुजोरा दिला.

मी त्यांना विचारलं हे कुठं बनतं? तेव्हा त्यांनी सांगितलं देहू रोड आणि कराचीत.

आपल्याकडे फक्त देहू रोड इथल्या दारूगोळा कारखान्यात RDX तयार केलं जातं. तिथे त्वरीत फोन लावून आम्ही चौकशी केली. तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की गेल्या दोन वर्षात त्यांनी एका ग्रॅम एवढ्याही RDX ची निर्मीती केली नव्हती. RDX बनवण्याचा दूसरा दारूगोळा कारखाना म्हणजे कराची.

हे RDX कराचीतून म्हणजेच पाकिस्तानमधून मुंबईत आलं असावं. या बॉम्बस्फोटाच्या मागे आतंरराष्ट्रीय धागेदोरे आहेत. हे स्पष्ट होताच त्याच गांभीर्य हजार पटीने वाढलं होतं.

त्यावेळी कोणत्याही स्थितीत मुंबईत पुन्हा जातीय दंगली भडकणार नाहीत एवढी खबरदारी माझ्या दृष्टीने अग्रक्रमाची होती.

त्याक्षणी तातडीनं दूरदर्शनवरून आणि आकाशवाणी वरूनही जनतेला घटनेची माहिती दिली.

ही माहिती देत असताना जाणिवपुर्वक बॉम्बस्फोट ११ ठिकाणी झाले असूनही १२ ठिकाणी झाल्याचं जाणिवपुर्वक नमुद केलं. सर्व बॉम्बस्फोट हिंदू बहूल भागात झालेले होते. परंतु कोणतिही जातीय अनुचित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून मी मस्जिद बंदर या मुस्लीम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं.

ही घटना एका धर्मान दूसऱ्या धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान नसून भारताच्या विरोधात घडवून आणलेला कट आहे. अस सांगत परिस्थिती चिघळणार नाही आणि नियंत्रणात राहिल याची काळजी घेतली.

मुंबई दंगलीच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगापुढे मलाही पाचारण करण्यात आलं. अकरा ऐवजी बारा बॉम्बस्फोट झाल्याच्या माझ्या विधानासंदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी मला बोलवण्यात आलं होतं.

स्पष्टीकरण देताना मी सांगितलं,

माझ विधान असत्य होतं. पण पुढील संभाव्य हिंसा रोखण्यासाठी शहाणपणानं जाणिवपुर्वक घेतलेला तो निर्णय होता. श्रीकृष्ण आयोगान माझ्या या प्रसंगावधानाची विशेष दखल घेतली. या आयोगान आपल्या अहवालात, “this is the example of स्टेटसमनशीप”, अशा शब्दात त्याची वाखाणणी केली.

तर असं कारण होतं ज्यामुळे शरद पवारांनी एका ठिकाणी जास्तीचा बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं होतं.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.