दुपारी प्रचाराला आले म्हणून अर्धा तास शिव्या खाल्ल्या, पुढे ५ वर्षांनी त्याच घरचे जावई झाले

गोष्ट आहे १९६२ सालची. संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत होत्या. पुण्यात शिवाजीनगर मतदारसंघातून पुण्याचेच माजी आयुक्त स.गो.बर्वे काँग्रेसकडून उभे होते. तर जनसंघाकडून रामभाऊ म्हाळगी उभे होते. जनसंघाला पुण्यात चांगला पाठिंबा होता शिवाय रामभाऊ म्हाळगी यांच्या अभ्यासूपणाबद्दल संपूर्ण शहरात आदर होता.

पण स.गो.बर्वे यांना थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा उमेदवार म्हणून ओळखलं जायचं. पानशेतच्या धरणफुटीनंतर दोघांनी मिळून पुणे शहराला सावरलं होतं. बर्वेनी तर मिलिटरी आणून उभी केली होती. त्यांचा विजय पक्काच मानला जाणला जात होता.

तरीही काँग्रेसने प्रचारात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. विशेषतः युवक काँग्रेसची मंडळी शिवाजीनगर भागाच्या गल्लीबोळात जाऊन स.गो.बर्वे यांचा प्रचार करत होती. यातच आघाडीवर होते शरद पवार. ते बीएमसीसी मध्ये शिकत असतानाच विद्यार्थी नेता म्हणून फेमस झाले होते. खुद्द यशवंतराव चव्हाणांच्या पर्यंत त्यांचं नाव पोहचलं होतं. त्यांनीच पवारांना युवक काँग्रेसचा पुणे जिल्हाध्यक्ष बनवलेलं.

स.गो.बर्वे यांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी शरद पवार पार पाडत होते. घरोघरी जाऊन प्रचार चालला होता. ऊन डोक्यावर आलं होतं. शरद पवार आणि त्यांचे कार्यकर्ते डेक्कन भागातल्या प्रभात रोडवर प्रचाराला पोहचले. हा भाग म्हणजे शांत निवांत उच्चमध्यमवर्गीयांची वस्ती. फारशी वर्दळ नसलेल्या या भागात दुपारी तर शुकशुकाटच असायचा.

साधारण दुपारचे दोन वाजले असतील. प्रभात रोडवरच्या तेराव्या गल्लीत हि प्रचार यात्रा पोहचली. 

पवारांनी तिथल्या एका टुमदार बंगल्याची बेल वाजवली. आतून एक वृद्ध व्यक्ती बाहेर आले. त्यांनी प्रचाराला आलेल्या या पोरांना बघितलं आणि त्यांचा पाराचं चढला.

एवढ्या दुपारी लोकांची झोपमोड करताय म्हणून त्यांनी या काँग्रेस कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढण्यास सुरवात केली. शरद पवार आणि मंडळींनी मान खाली घालून ऐकून घेतलं. साधारण अर्धा तास हे भाषण चाललं. आजोबा जेव्हा शांत झाले तेव्हा पवारांच्या सकट सगळ्यांनी पाबोरा केला. प्रचाराच्या वेळी एका पुणेकरांसोबत झालेली गंमतीशीर चकमक शरद पवारांच्या मनात कायम राहिली.

स.गो.बर्वे सहज निवडून आले. या निवडणुकीमुळे पवारांच्या राजकीय करियरला मोठा बूस्ट मिळाला. यशवंतराव चव्हाणांचा वरदहस्त तर होताच शिवाय अभ्यासू व चळवळ्या कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये फेमस झाले. पुढच्या टर्मला बारामती मधून त्यांना तिकीट मिळालं. अवघ्या २७ वर्षाच्या वयात ते आमदार म्हणून निवडून आले.

त्यांचे मोठे बंधू माधवराव उर्फ बापूसाहेब पवार हे एक कारखानदार होते. त्यांचा अरविंद राणे नावाचा एक इंजिनियर मित्र होता. त्याने बापूसाहेब पवारांच्या कडे आपल्या भाचीसाठी स्थळ सुचवा असं विचारलं.

बापूसाहेब चटकन म्हणाले,

”एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बी.कॉम. झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे.”

हे स्थळ म्हणजे बापूसाहेबांचा धाकटा भाऊ शरद आहे, हे कळल्यावर प्रश्नच मिटला. मुलगी बघायचा कार्यक्रम ठरला.

शरद पवार लग्नासाठी बिलकुल तयार नव्हते. मुलगी बघायचा कार्यक्रम ठरला तेव्हा या मुलीनेच आपल्याला नकार द्यावा, या उद्देशाने ते खादीचा जाडाभरडा गर्द गुलाबी बुशशर्ट आणि तसलीच पण हिरवीगार पँट घालून आले. पाहतात तर काय स्थळ त्याच घरातून आलं होतं जिथे पाच वर्षांपूर्वी दुपारी झोंपमोड केल्याबद्दल ओरडा खाल्ला होता.

प्रभात रोडवरच्या तेराव्या गल्लीतला तो बंगला होता ब्रिगेडियर मोरेश्वर हैबतराव राणे यांचा. त्यांच्या नातीच म्हणजेच सुप्रसिद्ध क्रिकेटर सदू शिंदे यांच्या मुलीचं प्रतिभा हीच ते स्थळ आलं होतं. 

सदू शिंदेंचं अकाली निधन झालं असल्यामुळे प्रतिभा या आपल्या आजोळी वाढल्या होत्या. बडोदा संस्थानमध्ये मोठ्या हुद्द्यावर नोकरी करून रिटायर झालेले मोरेश्वर राणे आपल्या करड्या शिस्तीसाठी ओळखले जायचे. त्यांनीच त्या दिवशी प्रचाराला आलेल्या पवारांना दुपारची झोपमोड केली म्हणून खरडपट्टी काढली होती.

ब्रिगेडियर राणेंनी पवारांना ओळखलं नाही पण शरद पवारांनी त्यांना ओळखलं. गंमत म्हणजे पवारांना मुलगी बघताना त्यांच्या शेजारीच बसवण्यात आलं. भेदरलेल्या शरद पवारांनी शेजारचे वर्तमानपत्र उघडून त्यात जे डोके घातले, ते शेवटपर्यंत वर काढले नाही. 

परंतु नजर तेज असल्यामुळे जे काही टिपायचे, ते नेमके टिपले. मुलगी पसंद पडली. १ ऑगस्ट १९६७ रोजी बारामतीमध्ये थाटामाटात लग्न झालं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.