पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या नेत्याच्या हाती आलं होतं.
सध्या देशभरात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. विशेषतः पंजाबमध्ये अकालीदलाने मोदी सरकारच्या कृषी विधयेकाविरुद्ध रान उठवलं आहे. २२ वर्षांची युती तोडून ते सरकारच्या बाहेर पडले आहेत. अकाली दलाचे कार्यकर्ते रेल्वे रुळावर झोपून आंदोलन करत आहेत.
चाळीस वर्षांपूर्वी असंच झालं होतं. मात्र त्यावेळच्या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रातल्या नेत्याने केलं होतं.
ते म्हणजे शरद पवार.
गोष्ट आहे १९८० ची. केंद्रात जनता पक्षाला हरवून इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या होत्या. महाराष्ट्रात शरद पवारांची पुलोद आघाडी देखील चारी मुंड्या चित झाली होती. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आले होते.
पवारांसोबत काँग्रेस सोडून आलेले सहकारी हळूहळू पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर जाऊ लागले.
एका दौऱ्यासाठी लंडनला गेलेल्या पवारांना कळले की त्यांच्या पक्षाच्या बहुतांश आमदारांनी पक्ष सोडला. ५४ मधले फक्त ६ आमदार उरले होते.
एक रात्रीत शरद पवार उघड्यावर आले.
सगळीकडची दारे बंद झाली होती. विरोधी पक्ष नेतेपद देखील गेलं होतं. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री असलेला हा नेता पण आता त्यांचं राजकारण संपल्याची चर्चा सुरू झाली.
पण जिद्द न हरलेल्या शरद पवारांनी शून्यातून सुरवात केली. राज्यभर दौरे केले.
आपल्या विरोधात क्षोभ का उसळला याची कारणे जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, त्यांची प्रश्ने जाणून घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अवघड वाटा तुडवत पोहचलेल्या शरद पवारांनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकून घेतला. त्यांच्याशी कायमच नातं दृढ झालं.
याच काळात शेतमालाच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले होते. हा प्रश्न धसास लावण्यासाठी पवारांनी जळगाव ते नागपूर अशी पायी दिंडी काढायचं ठरवलं.
७ डिसेंबर १९८० रोजी सुरू झालेल्या या दिंडीमध्ये हजारो शेतकरी शेतमजूर सामील झाले. भजन कीर्तन करत टाळम मृदुंगाच्या गजरात शेतकरी महाराज की जय घोषात सुरू निघालेल्या या दिंडीने राज्य हलवून सोडलं.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हानांच्या पासून ते कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या पर्यंत अनेकांनी घेतलेल्या सहभागामुळे हे शेतकरी आंदोलन तळागाळात पोहचले आहे, त्याला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला आहे हे कळत होते.
नागपूर मध्ये अधिवेशन सुरू होते. तिथे दिंडी पोहचल्यावर पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
अनेक नेत्यांना धरपकड झाली. या आंदोलनाने शरद पवार संपले नाहीत हे दाखवून दिलं.याच शेतकऱ्यांनी पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मध्यभागी आणले.
मीडियाने ही गोष्ट राष्ट्रीय पातळीवर नेली. जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना पवारांनी केलेलं हे आंदोलन भावलं. याच सुमारास त्यांनी दिल्लीला शेतकरी आंदोलन सुरू केले होते, त्याचे नेतृत्व शरद पवारांना देण्यात आले.
पवार तरुण होते. राष्ट्रीय पातळीवर त्यांना जास्त ओळखलं जातं नव्हतं.
उत्तरेतील राजकारणी अनुभवी व आक्रमक असतात. सहसा बाहेरील व्यक्तीला ते सामावून घेत नाहीत. तरीही महाराष्ट्रातून आलेल्या पवारांवर विश्वास दाखवण्यात आला होता.
आपापल्या राज्यात प्रचंड जनसमर्थन लाभलेले व अत्यंत जेष्ठ असलेल्या प्रकाशसिंग बादल व चौधरी देवीलाल या नेत्यांनी पवारांच्या हाती किसान रॅलीची कमान दिली.
दिल्लीत होणाऱ्या बोटक्लब इथल्या महारॅलीसाठी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे म्हणून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात खेडोपाडी जाऊन गाठीभेटी घेतल्या जाऊ लागल्या.
तिकडची पद्धत आपल्या पेक्षा वेगळी आहे. दोन गाड्यामध्ये कार्यकर्ते भरून नेते मंडळी गावात यायची. चावडी जवळ खाटा टाकल्या जायच्या. मग गावच्या चौधरीला बोलवलं जायचं. हुक्का ओढत ओढत चर्चा सुरू व्हायची.
देवीलाल विचारायचे,
“इस साल गंदक की किंमत कितनी मिली?”
शेतकरी सांगायचे की काही समाधानकारक दर यंदा भेटला नाही. हे उत्तर ऐकून देवीलाल यांची कळी खुलायची. ते लगेच पुढचा प्रश्न टाकायचे,
” ये तुम कब तक सहोगे? कुछ करोगे या नही? तय किया है की अब दिल्ली जाना है.जाना है की नहीं? किंमत चाहीए या नहीं?”
समोरच्या माना डोलायला लागायच्या. मग देवीलाल गावात ट्रॅक्टर किती आहेत हे चौकशी करायचे. सर्वच्या सर्व ट्रॅक्टर भरून शेतकरी दिल्लीला येण्याचे उत्साहात नियोजन व्हायचं. दुधाचा भला थोरला ग्लास संपवून सभेची सांगता व्हायची.
शरद पवारांसाठी हे राजकारणाचे धडेच होते. या जननेत्यांनी त्यांना शेतकऱ्यांची मने कशी जिंकायची याचा वस्तुपाठ घालून दिला होता.
प्रकाशसिंग बादल यांच्या सोबत पवार पंजाबमधल्या प्रत्येक गावात गेले. तिथल्या गुरुद्वारा प्रबंधक समितीला जाऊन भेटायचे. त्यांच्या मार्फत बैठका आयोजित व्हायच्या. प्रबंधक समितीचा आदेश हा शेवटचा आदेश ठरवायचा.
पवारांच्या या निमित्ताने पंजाबभर शेतकऱ्यांशी चांगल्याओळखी झाल्या. बादल यांच्या मुळे अकाली दलाशी जवळचे नाते निर्माण झाले. पंजाबमधून हजारो शेतकरी दिल्लीला आले.
रॅलीच्या दिवशी दिल्लीमध्ये बोटक्लबवर शेतकऱ्यांनी विराट शक्ती प्रदर्शन केले. इंडिया गेट ते संसदेच्या मार्गावर जिथे नजर जाईल तिथे शेतकरी होते. शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात की,
“देवीलाल व प्रकाशसिंग बादल यांनी माझ्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली मात्र हा मेळावा यशस्वी व्हावा म्हणून स्वतः देखील प्रचंड मेहनत घेतली. हे करताना आपण एका चाळिशीतल्या नेत्याला राष्ट्रीय लेव्हलवर मोठं करतोय हा क्षुद्र विचार न करता त्यांनी ताकद पणाला लावली. दिल्लीमध्ये येऊन राजकारण करण्याचा आत्मविश्वास मला या मेळाव्या मुळे आणि या नेत्यांमुळे मिळाला”
महाराष्ट्राच्या नेत्याचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाला होता.
पंजाबमध्ये पवारांचे जुळून आलेले ऋणानुबंध पुढे देखील कामी आले. पेटलेला पंजाब शांत करण्यासाठी अकाली दलाच्या नेत्यांशी मध्यस्ती करण्यासाठी राजीव गांधी यांनी शरद पवारांची मदत घेतली होती.
आजही मोदींच्या विरुद्ध सुरू झालेले शेतकरी आंदोलन आणि अकाली दलाची भाजपशी तुटलेली युती यामागे पवारांची चाणक्यनीती असल्याची चर्चा सुरू असते.
हे ही वाच भिडू.
- आणि लाखो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरलेल्या शरद पवारांचा पुनर्जन्म झाला !!
- वाजपेयी आणि शरद पवार एकत्र आले अन् NDRF च्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
- शंभरी पुर्ण केलेल्या अकाली दलाने भाजपाची २२ वर्षांची दोस्ती तोडली.