“पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो, तर राख फासून हिमालयात जाईन,” असं शरद पवार म्हणाले होते का..?

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली. या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावरुन अनेक नेत्यांनी टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही,

‘चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठवण्याचा बंदोबस्त कोल्हापूरकरांनीच केला,’

या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,

“पवार यांनी स्वतःचा इतिहास तपासावा. त्यांनी अनेकदा पक्ष बदलले. पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो, तर अंगाला राख फासून हिमालयात जाईन, असं पवार १९८४-८५ मध्ये पुण्यात वसंत व्याख्यानमालेत म्हणाले होते.

गेले का ते?”

चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेची बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे शरद पवारांवर अशी टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनीही,

‘शरद पवार जेव्हा एस काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा म्हणाले होते, मी पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, गेलो तर तोंडाला काळं फासून हिमालयात जाईल. लगेच ते काँग्रेसवासी झाले.’

अशी टिका केली होती तर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत

‘मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं पवार म्हणाले होते. मग कुठे गेला हिमालय? आणि कुठे गेले ते काळे तोंड?’

अशी टीका केली होती.

नेत्यांकडून टीका होत असल्यानं खरंच शरद पवार हिमालयात जाईन असं बोलले होते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण त्याआधी तेव्हाची राजकीय परिस्थिती जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे.

शरद पवार काँग्रेस पक्षातून फुटून काँग्रेस उर्समध्ये सामील झाले होते. पुढे या पक्षातून फुटून शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. १९७८ मध्ये पुलोदचं सरकार स्थापन करुन ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पवारांनी महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार पालटवून सत्ता मिळवलेली. साहजिकच १९८० मध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केलं.

इंदिरा गांधी यांची एकाधिकारशाही न आवडणाऱ्या आणि न पटणाऱ्या काँग्रेस नेत्यांपैकी शरद पवार होते, असं म्हणलं जातं. त्यात आता पुलोदचं सरकार बरखास्त झाल्यानं, पवार आणि इंदिरा गांधी यांच्यात संघर्ष होणं अटळ होतं.

१९८५ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर पवारांचा समाजवादी काँग्रेस पक्ष राज्यात विरोधी बाकांवर बसला होता. थोडक्यात पवार काँग्रेसच्या विरोधात रणधुमाळी गाजवत होते.

या पार्श्वभूमीवर शरद पवार खरंच, ‘पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो, तर राख फासून हिमालयात जाईन’ असं म्हणाले होते का?

हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं काही ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकांशी संवाद साधला.

बोलभिडू सोबत बोलताना पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले,

“माझ्या आठवणीनुसार बहुदा औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवार असं म्हणाले होते. वर्तमानपत्रात पवार असं म्हटल्याचं वाचनात आलं होतं हे स्मरतंय. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर अनेकदा टीका झालीय.

जसं नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावर काँग्रेसमध्ये गेलो तर काळे फासून हिमालयात जाईन पण गेले का? असं म्हणत शरसंधान साधलं.

तसंच या आधी पवार विरोधकांनी ज्यात भाजप सोबत काँग्रेस, शिवसेना नेते पण आले, त्यांनीही पवारांच्या या वक्तव्याचा दाखला दिलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणात पवारांचा समाचार घेतल्याचं नक्की आठवतंय.

काही ज्येष्ठ पत्रकार, संपादक पण पवारांच्या या विधानाचा संदर्भ देतात. अनेकदा हे वाचनात आलंय. मात्र पवार नेमकं हे कधी, कुठं म्हणाले आणि काय संदर्भ होता हे निश्चित पणे सांगता येणार नाही.”

तर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितलं की,

”म्हणलं असू शकेल, पण मला शंभर टक्के आठवत नाही. हे वक्तव्य नाकारताही येत नाही. पण या सगळ्यात चंद्रकांत पाटील आणि शरद पवार यांच्या वक्तव्यातला फरक जाणून घेणंही गरजेचं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यात हरलो तर हिमालयात जाईल, असा आत्मविश्वास होता.

पण शरद पवार बोलले असतील, तर तेव्हा इंदिरा गांधी हयात असाव्यात. इंदिरा गांधींनी ८० मध्ये पुलोद सरकार बरखास्त केलं. त्यानंतर शरद पवार विरोधी पक्षात होते. त्यामुळे ते सातत्यानं काँग्रेसवर टीका करत होतेच. पुढे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी नेतृत्व करत असताना पवार काँग्रेसमध्ये गेले.

जर इंदिरा गांधींच्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले असते, तर या वक्तव्यावरुन अधिक ठळकपणे बोलता आलं असतं. राजीव गांधींच्या काळात राजकारण बदललेलं, पवारही तुलनेनं तरुण होते. त्यामुळे वक्तव्यानंतर संदर्भ बदलले असतील, तर टीका करण्यात फारसा अर्थ नाही.”

बोल भिडूनं ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्याशीही संपर्क साधला असता शरद पवार अस कधीच म्हणाले नाहीत असा काही संदर्भ नाही अस त्यांनी सांगितलं. 

तर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारेंना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं,

“मी या संदर्भात कुठंतरी वाचलं आहे, पण मी त्या काळाचा किंवा वक्तव्याचा साक्षीदार आहे असं म्हणता येणार नाही. माझ्या मते १९८०-८२ च्या काळातलं हे वक्तव्य असू शकतं. पण मला नेमकं सांगता येणार नाही.

अपुऱ्या माहितीआधारे वक्तव्याबद्दल बोलणं योग्य नाही. पण चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य असेल किंवा शरद पवारांचं, अशी विधानं सातत्यानं होत असतात. सभेच्या वातावरणात केलेल्या वक्तव्यांना फार गांभीर्यानं आणि शब्दश: घ्यायचं नसतं.”

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याशी बोल भिडूनं संपर्क साधला,

तेव्हा त्यांनी सांगितलं की,

”वसंत व्याख्यानमालेत शरद पवार असं म्हणाले होते. त्याबाबतीत मी युट्युब व्हिडीओही बनवला आहे.”

अनेक जेष्ठ पत्रकारांसोबत बोलल्यानंतरही ठामपणे सांगता येत नव्हतं. अखेर आम्ही केसरी वर्तमानपत्राचे जूने लेख चाळण्यास सुरवात केली. कारण चंद्रकांतदादा पाटील यांनी टिका करत असताना शरद पवार अस पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत बोलले होते असं सांगितलं होतं. तेव्हा आम्हाला त्यावेळी छापून आलेल्या बातमीचं कात्रण मिळालं.

ते कात्रण खालीलप्रमाणे,

मात्र यात देखील शरद पवार अस म्हणाल्याचा पुरावा सापडला नाही. काही जुन्या जाणत्या पत्रकारांच्या मते शरद पवार असे म्हणाले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे अशा नेत्यांनी या वाक्यावरून त्यांच्यावर टिका केल्याचा इतिहास सापडतो मात्र नक्की कधी म्हणाले होते ते ठामपणे सांगता येत नाही हे देखील तितकच खरं..

शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात राजीव गांधींच्या आग्रहामुळं आपण पुन्हा काँग्रेस पक्षात आलो आणि औरंगाबाद येथे झालेल्या सभेत समाजवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं, असं नमूद केलं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.