बाळासाहेब विखेंनी शरद पवारांना कोर्टाची पायरी चढायला लावली होती.
राजकारणात एकही गोष्ट विसरायची नसते. भले ती चांगली गोष्ट असो की वाईट गोष्ट पण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला हवी तरच पुढच्या गोष्टी ठरवता येतात. बर इतका चांगला डॉयलॉग तुमच्या आमच्या सारखी लोकं कट्यावर बसून मारू शकतात पण दूसऱ्याला शिकवू शकत नाहीत. आणि समोर शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती असेल तर अजिबातच नाही. शरद पवार यांच्यावर अनेक आरोप झाले. प्रत्येक व्यक्तीने शरद पवारांबद्दल वेगवेगळे अंदाज लावले पण एक गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही ती म्हणजे राजकारणाच्या केंद्रस्थानी पवारच राहतात.
शरद पवारांचा आजतागायत निवडणुकीच्या मैदानात पराभव झालेला नाही. शरद पवार हे कायम जिंकणारे व्यक्ती राहिले आहेत. साहजिक राजकारणात काही विसरायचं नसतं असलं तुफान खपणारं वाक्य शरद पवारांना सांगता येवू शकणार नाही, ते त्यांनी तोंडपाठच केलं असावं म्हणून तरी कोणत्याही परिस्थिती नगर दक्षिणची जागा शरद पवार सोडायला तयार नाही.
सुजय विखे ऊर्फ डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण नगरच्या जागेवरुन खासदार होण्यासाठी कंबर कसली आहे. आघाडी, युतीच्या जागावाटपा बरोबरीने राज्यभर चर्चेत असणारा दूसरा मुद्दा हा खास नगर दक्षिणचा राहिला आहे. गेले तीन-चार वर्ष सुजय विखे या जागेसाठी प्रयत्न करत आहेत. पण कोणत्याही स्वरुपात राष्ट्रवादीकडे असणारी हि जागा कॉंग्रेसला न सोडण्याचा निर्धार शरद पवारांनी घेतला आहे.
नाही म्हणायला अगदी कालपरवा शरद पवार म्हणाले, ती जागा कॉंग्रेसला पण त्यानंतर लगेचच जयंत पाटलांना याचा खुलासा करावा लागला. त्यानंतर सुजय विखे भाजपकडून लढणार अशी चर्चा सुरू झाली. काल पुन्हा सुजय विखे राष्ट्रवादी कडून लढणार अशी चर्चा सुरू झाली आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या डोक्याचा पुन्हा एकदा भुगा झाला.
आघाडीत बिघाडी होण्याची वेळ आली तरी शरद पवार कोणत्याही स्वरुपात ही जागा सोडण्यास तयार नाहीत म्हणल्यावर साहजिक लोक विचारू लागले नक्की काय भानगड.
आत्ता जिथे भानगड आहे ती गोष्ट बोलभिडू सांगणार नाही तर दूसरं कोण सांगणार. तर आत्ता गोष्ट सुरू होते फ्लॅशबॅक मध्ये. खूप खूप वर्षांपुर्वी आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहीला होता. या कारखान्यामध्ये रितसर अर्ज करून एक तरुण नोकरीस लागला होता. या तरुणाच नाव अप्पासाहेब पवार. अप्पासाहेब पवार हे शरद पवार यांचे थोरले बंधु. अप्पासाहेब पवार पुढे आपल्या कर्तृत्वावर याच कारखान्यात MD झाले. शरद पवार यांच शालेय शिक्षण देखील याच भागात असणाऱ्या कर्मवीरांच्या संस्थेत झालं. शरद पवारांनी शालेय वयात उभारलेला गोवा मुक्तीसाठी विद्यार्थांचा लढा याच ठिकाणी उभारलेला होता. थोडक्यात सांगायचं झालं तर विखे घराणं आणि पवार घराणं यांचे फार पुर्वीपासूनचे तसे चांगले संबध.
पण पण पण….
लक्षात घ्या मित्रांनो राजकारणात या पण ला खूप किंमत असते. एक घराणं असलं तरी अप्पासाहेब पवार हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. विठ्ठलराव विखे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. त्यांचे विचार व्यक्तिगत होते. आपण जर अशी अपेक्षा व्यक्त करत असलो की हेच चांगले संबध त्याच घराण्यातील दूसऱ्या फळीतल्या व्यक्तींमध्ये असावेत तर तुम्ही राजकारणाच्या पातळीवर चुकत आहात.
तर आत्ता या पण मधून मुद्दा सुरू होतो तो बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध शरद पवार या राजकारणाचा.
नेमका हा संघर्ष कधीचा? याबद्दल कोणालाच ठामपणे सांगता येत नसलं तरी बाळासाहेब विखे पाटील हे शंकरराव चव्हाण गटाचे आणि शरद पवार हे स्वत: शरद पवार गटाचे यातच एकमेकांच्या विरोधाची बीज असल्याचं दिसून येतं. सुरवातीच्या काळात बाळासाहेब विखे पाटलांनी नगर जिल्ह्याच आणि पर्यायाने महाराष्ट्राच राजकारण करत असताना शिवराज पाटील, ए.आर.अंतुले, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विलासराव देशमुख, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, संभाजी काकडे अशी फळी उभा केली किंवा अशा फळीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहले. हि फळी कॉंग्रेसची होती, सेनेची होती, प्रसंगी भाजपची होती. पण एक गोष्ट फिक्स होती हि सगळी फळी शरद पवारांना विरोध करणारी होती.
दूसरीकडे शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या राजकारणाला शह देण्याच्या राजकारणात अण्णासाहेब शिंदे, पी.बी. कडू पाटील, भाऊ साहेब थोरात, मारुतराव घुले, बाबुराव तनपुरे, शंकरराव काळे, माजी मंत्री गोविंदराव आदिक, चंद्रभान घोगरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, दादा पाटील शेळके, माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांना पाठबळ देत आणि प्रसंगी यांच पाठबळ घेत विखे विरोध जपला, किंवा या प्रसंगी यांचा पाठिंबा देखील घेतला.
पण मुद्दा असा की, बाळासाहेब विखे असोत की शरद पवार यांनी एकमेकांचा विरोध जपताना गटातटाच राजकारण जपलं, उलट ते जोर धरण्यासाठी प्रयत्न देखील केले.
असही सांगितल जातं की शरद पवारांनी पुलोदचा कार्यक्रम केला तेव्हा बाळासाहेब विखे पाटलांना ऑफर दिली होती पण बाळासाहेबांनी कॉंग्रेस एकनिष्ठतेचे कारण सांगून वेळ मारून नेली. कारण काहीही असो बाळासाहेब विखे पुलोद कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत हे तर दिसणार वास्तव आहे आणि ते नाकारून चालत नाही. थोडक्यात काय तर हेवेदावे आणि राजकारण हे पहिल्यापासूनच होतं.
पण या सगळ्या प्रकारांना खरी ठिणगी पडली ती 1991 साली.
1991 सालची लोकसभा इलेक्शन. जागा होती ती नगर दक्षिणची. या मतदारसंघात बाळासाहेब विखे पाटलांना टाळून ती जागा कॉंग्रेसकडून यशवंतराव गडाख यांना देण्यात आली. शरद पवारांनी यशवंतराव गडाख यांच्या बाजूने जोर लावला होता तर विरोधात असणारे अपक्ष उमेदवार बाळासाहेब विखे या सगळ्या विरोधाला आपआपल्या परीने तोंड देत होते. निकालाचा दिवस उगवला. त्या दिवशी बाळासाहेब विखे यांचा पराभव झाला. स्वत:च्या जिल्ह्यातला हा पराभव बाळासाहेब विखे पाटलांच्या जिव्हारी लागण्यासारखाच होता. पण शांत बसणाऱ्यातले बाळासाहेब देखील नव्हते. तसही इथे एक इलेक्शनचा विखे पॅटर्न लोकांना परिचितच आहे. विरोधकांच्या सभा विरोधकांहून अधिक कान देवून विखेंची लोकं ऐकत असतात. झालं देखील तसच पराभवानंतर जातीचा आणि धर्माचा वापर करण्यात आला म्हणून एक एक पुरावा घेवून बाळासाहेब विखे पाटील कोर्टात गेले. गडाख यांना आरोपी करण्यात आलं तर सहआरोपी म्हणून शरद पवार यांच नाव होतं.
हि विखे विरुद्ध पवार राजकारणातली जाहिर ठिणगी होती. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि शरद पवार कसलेल्या पैलवानासारखे यातून बाहेर पडले. सांगणारे असही सांगतात की इथे शरद पवार अडकले असते तर त्यांच राजकारण 1991 मध्येच संपल असत. इलेक्शमध्ये आचारसंहिता असावी हे शहाणपण देखील याच केसमधून मिळाल्याच सांगण्यात येतं. पण या सर्व प्रकरणात शरद पवार सुटले. खर सांगायचं झालं तर सुटलेच.
त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. कॉंग्रेस सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेवर सर्वात जहरी टिका कोणी केली असेल तर ते नाव होतं बाळासाहेब विखे पाटील यांच. बाळासाहेब विखे पाटलांना केंद्रात मंत्रीपद हे फक्त आणि फक्त पवार विरोधामुळे मिळत नसल्याच सांगितलं जात आणि त्यामुळेच त्यांनी शिवसेना प्रवेश केला होता अस तात्कालिन कारण असल्याचं बोललं जातं.
पुढे हे राजकारण एकमेकांच्या विरोधावरच पोसलं गेलं. इतकं की 2008 साली शिर्डी मतदार संघ जेव्हा राखील झाला तेव्हा रामदास आठवले यांना शिर्डीतून उमेदवारी देण्यात आली. रामदास आठवले तेव्हा शरद पवारांचे होते. त्यांच्या विरोधात देखील काम करायचं नाही आणि समर्थनात देखील काम करायचं नाही असा कट्टर कॉंग्रेसी निर्णय बाळासाहेब विखेंनी घेतला. त्याचाच परिणाम म्हणजे आठवलेंचा पराभव झाला. आठवलेंच्या पराभवामुळे पुढे काय झालं पहाण्यासाठी मतांची टक्केवारी पाहिली तर विखे पाटलांपासून कोणता गट तुटला याच्यातच सगळ दिसतं. बाळासाहेब विखेंच्या सारख्या नेत्याला हा गट कायमचा जावू शकतो हे माहित असणारच तरिही त्यांनी धोका पत्करला कारण समोरचा पवारांचा माणूस होता. पुढे हा संघर्ष चालूच राहिला. इतका की बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर डोकं टेकण्यासाठी देखील शरद पवार फिरकले नाहीत.
आपल्याकडे सांगितलं जात की माणूस गेल्यानंतर संघर्ष संपतो पण शरद पवारांनी राजकारण जपताना प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली. कदाचित याच कारणामुळे शरद पवारांच्या हातातून शक्य असताना देखील नगर दक्षिण सुटत नसावा. अस म्हणतात, वेळ उत्तर देते पण राजकारणात वेळ दक्षिण देवू शकत नाही हेच खरं.
हे ही वाचा.
- अहमदनगरची तत्वशुन्य राजकारणाच्या दिशेने होत चाललेली वाटचाल !
- महाराष्ट्राच्या मातीत फॉरेनचा नांगर फिरवणारे, अप्पासाहेब पवार.
- म्हणून शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देत नाहीत…