शरद पवार अध्यक्ष होतील पण UPA ची ताकद पहिल्यासारखी राहिली आहे का..?
शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष बनवायचा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक कडून देण्यात आला. साहजिक परत एकदा शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार असल्याच्या बातम्यांनी वेग घेतला.
पण “UPA च्या अध्यक्षपदावर शरद पवार” अशा आशयाच्या बातम्या पहिल्यांदा आल्यात का? तर नाही. २०१४ नंतर कॉंग्रेसच्या प्रत्येक पराभवावेळी शरद पवारांचे नाव संभाव्य UPAचे अध्यक्ष म्हणून चर्चेत येतच गेलय..
पण सध्या UPA ची अवस्था काय आहे? किती घटकपक्ष आजही UPA टिकवून आहे? UPA च्या किती घटकपक्षांनी तिसऱ्या आघाडीचा रस्ता यापूर्वीच धरला आहे? खरच आजही UPA हा NDA साठी सक्षम विरोधक म्हणून उभारू शकतो का?
याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून पाहणार आहोत
NDA अर्थात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायंस तर दूसरीकडे UPA अर्थात युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायंस. NDA च्या आघाडीतील प्रमुख पक्ष हा भाजप तर UPA च्या आघाडीतील प्रमुख पक्ष हा कॉंग्रेस राहिलेला आहे.
सर्वात आधी हे समजून घेऊया कि, UPA म्हणजे काय ?
UPA म्हणजेच United progressive alliance ज्याचा मराठीत अर्थ होती संयुक्त पुरोगामी आघाडी”. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही पक्ष एकत्र येऊन या युपीए गटबंधनाची स्थापना करण्यात आली. या गटातील मुख्य पक्ष असणारा काँग्रेस या गटाचं नेतृत्व करतो. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तर उपाध्यक्ष राहुल गांधी आहेत.
काँग्रेस पक्षाने २००४ लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव केला आणि सत्तेवर आली.
काँग्रेस १४५ जागा घेऊन फक्त ७ जागांनी पुढे होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे धर्मनिरपेक्ष असलेल्या विरोधकांसाठी अत्यावश्यक बनले. कोणताही पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करण्याएवढा स्ट्रॉंग नव्हता, शेवटी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने स्वाभाविकच लीडर बनला आणि काँग्रेसने यूपीए नावाच्या युतीची स्थापना केली. २२ मे २००४ रोजी मनमोहन सिंग यांनी यूपीए सरकारचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
युपीए मध्ये कोण-कोणते पक्ष आहेत किंवा होते ?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC), द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके), जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (JKN) यांसारखे चार वेगवेगळ्या राज्यातील मोठी ताकद असलेले पक्ष आहेत. याशिवाय युपीए मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM).
रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, विदुथलाई चिरुथाईगल काची, गोवा फॉरवर्ड पार्टी, बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती पार्टी, रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेस केरळ, केरळ काँग्रेस (जेकब), स्वाभिमानी पक्ष, शेतकरी आणि भारतीय कामगार पक्ष, अपक्ष असे मिळून एकूण १९ घटकपक्ष आहेत.
पण या एकूण १९ घटक पक्षांपैकी किती पक्षांनी युपीए ची साथ सोडली ?
यात पहिला नंबर लागला टीआरएस पक्षाचा. २००६ मध्ये तेलंगणा राज्याच्या मागणीवरून आंध्र प्रदेशचे तत्कालीन कामगार मंत्री केसीआर यांनी यूपीएमधून काढता पाय घेतला.
त्यानंतर २००७ मध्ये युपीए चा कॉमन मिनिमम प्रोग्राम अंमलात आणला जात नाही म्हणून MDMK ने युती सोडली. २००८ मध्ये भारत-अमेरिका अणुकरारावरून झालेल्या मतभेदावरून चार डाव्या पक्षांनी CPM, CPI, RSP आणि फॉरवर्ड ब्लॉकने युपीए चा पाठिंबा काढून घेतला. याचदरम्यान पीडीपी आणि पीएमकेने देखील यूपीए सोडले आणि त्यामुळे युपीए सरकार अल्पमतात आले.
पण ऐनवेळेस मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष मदतीला धावून आला म्हणून अविश्वास प्रस्तावात युपीए टिकलं. विशेष म्हणजे काँग्रेसने २००४ मध्ये युपीए साठी सपाला आमंत्रणच दिले नव्हते.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत युपीए पुन्हा जिंकून आली, ज्याला UPA – II म्हणलं जातं.
UPA – II मध्ये युपीएत तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग हे ५ प्रमुख पक्ष होते.
याशिवाय एआयएमआयएम, व्हीसीके, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यासह अनेक पक्ष यूपीएचा भाग होते, जरी या पक्षांकडे कोणतेही मंत्रीपद नव्हते. यावेळेस युपीएला डाव्यांचा पाठिंबा नव्हता.
काँग्रेसने आरजेडीला सरकारचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले नाही तरी आरजेडी, सपा, बसपाने सरकारला पाठिंबा दिला. पण २०१० मध्ये राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याच्या निषेधार्थ लालूंनी पाठिंबा काढून घेतला.
२०१२ मध्ये तृणमूल काँग्रेस आणि DMK यूपीए सोडले. दरम्यान तामिळींच्या कथित मानवाधिकार उल्लंघनाबाबत श्रीलंकेविरुद्ध प्रस्तावित संयुक्त राष्ट्राच्या ठरावाच्या विरोधात DMK ने युपीएमधून आपले ५ मंत्री बाहेर काढले.
तर २००४ ते २०१४ या दरम्यान युपीएचा भाग असलेल्या ममता बॅनर्जी यांनी देखील मल्टी-ब्रँड रिटेलमध्ये एफडीआय लागू करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आपले ६ मंत्री युपीएतुन बाहेर काढले. याच मुद्द्यावरून या दरम्यान झारखंड विकास मोर्चा, MIM ने देखील यूपीएची साथ सोडली.
अशाप्रकारे मोठ्या ताकदीच्या पक्षांसह एकूण १९ घटक पक्षांपैकी १३- १४ पक्षांनी युपीए ची साथ सोडली..
२०१४ नंतर युपीए ची काय परिस्थिती राहीली आहे? आकडेवारी काय सांगते ?
२०१३ मध्ये मोदी लाट आली आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युपीएचा पराभव झाला होता. काँग्रेसला आत्तापर्यंतचे सर्वात कमी जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४४ आणि यूपीएच्या भागीदारांनी फक्त १६ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला २८२ आणि एनडीएच्या भागीदारांना ५४ जागा मिळून एनडीए ३३६ जागांवर पोहचली होती.
२०१४ ते २०१७ च्या दरम्यान UPA ने ३ च राज्यांच्या निवडणूक जिंकल्या. युपीएचे स्ट्रॉंग असलेले राज्ये देखील काँग्रेसने गमावले. २०१८ मध्ये युपीए ने बऱ्यापैकी यश मिळवलं. कर्नाटक, राजस्थान आणि इतर ठिकाणी महत्त्वपूर्ण विजय मिळवला.
….२०१९ मधील अपयश…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला केवळ ६० जागा मिळाल्या आणि काँग्रेसचा दुसऱ्यांदा पराभव झाला. यानंतर काँग्रेसला सतत धक्के सहन करावे लागले आहेत. गेल्या सात वर्षांत काँग्रेसला अनेक नेत्यांनी सोडलं.
२०१९ च्या दरम्यान झारखंडमध्ये यूपीए सत्तेत आलं. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि २५ वर्षे एनडीएची सदस्य असलेली शिवसेना बाहेर पडली आणि युपीएचा भाग असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीत सामील झाली.
विशेषतः काँग्रेसबद्दल बोलायचं तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास १३ राज्यात झालेल्या विधानसभेत काँग्रेस कुठेच स्वबळावर सत्तेत नाहीये.
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील काँग्रेसचा अंतर्गत असंतोष आणि नेतृत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास असमर्थता. या सगळ्या गोंधळामुळे विरोधी पक्षातील अनेकांचा असा विश्वास झाला आहे की, काँग्रेस स्वतःलाच नीट सांभाळू शकत नाही तर UPA चं नेतृत्व करूच शकत नाही.
त्यानंतर काय टेक्निकली युपीए काय उरलीच नाही. या युतीला यूपीए असं संबोधण्याऐवजी काँग्रेस नेते आता भाजपच्या विरोधी पक्षांसाठी ‘समविचारी पक्ष’ असा शब्द वापरतात…
त्यामुळे मध्यंतरी ममता बॅनर्जी यांचं “युपीए म्हणजे काय ? आता युपीए नाही” हे विधान एका अर्थी बरोबरच आहे असं म्हणायला लागेल…
कारण अनेक दिवसांपासून UPAचे नेते भेटलेले नाहीत. द्रमुक, राष्ट्रवादी आणि झारखंड मुक्ती मोर्चा सोडले तर काँग्रेसचे बहुतेकांसोबतचे संबंध आता ताणले गेलेले आहेत.
आत्ताच्या घडीला युपीए मध्ये कोणते घटक पक्ष आहेत ?
युपीएचा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तामिळनाडूमधील डीएमके, कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष), जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) आरएलएसपी, जेडीएस, एआययूडीएफ, जेएमएम, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट,बोडोलँड पीपल्स फ्रंट हे पक्ष सद्याच्या घडीला युपीएचा भाग आहेत.
पण या पक्षांची किती ताकद आहे ?
- काँग्रेसचे लोकसभेत ५२, राज्यसभेत ३४ खासदार आहेत.
- DMK चे लोकसभेत २४, राज्यसभेत १० खासदार आहेत.
- राष्ट्रवादीचे लोकसभेत ५, राज्यसभेत ४ खासदार आहेत.
- जेएमएमचे लोकसभा आणि राज्यसभा असे प्रत्येकी १-१ खासदार आहे.
- जम्मू -काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे लोकसभेत ३ खासदार आहेत.
- AIMIM चे लोकसभेत २ खासदार आहेत.
- एआययूडीएफचा लोकसभेत १ च खासदार आहे.
- व्हीसीके लोकसभेत एक खासदार
- ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट – लोकसभेत १ खासदार
आता युपीएची २०१४ नंतरच्या परिस्थितीचा, आत्ता युपीएच्या घटक पक्षांची ताकद पाहता युपीएचं गटबंधन भाजपसाठी पर्याय म्हणून मजबूत नाहीच आहे. थोडक्यात युपीए जवळपास संपुष्टात आली अशा ज्या चर्चा आहेत त्यावरचं उत्तर म्हणजे हा सगळा आढावा..
हे ही वाच भिडू :
- गुजरात फाईल्स समोर आणणाऱ्या “राणा अय्युब” यांचा हा इतिहास माहित आहे का..?
- ५०० वर्षांपासून एकत्र असणाऱ्या कोरियाचे दक्षिण आणि उत्तर कोरिया असे तुकडे कसे झाले ?
- लोकं म्हणतात, बुशरा बीबी काळी जादू करण्यात एक्स्पर्ट आहे…तिच्याकडे जिन्न आहे…