मंदिरात हात जोडतांनाचे फोटोच नाही तर पवारांनी या तिर्थस्थळांचा विकास देखील केलाय

“शरद पवारांचा मंदिरात हात जोडतांना फोटो मिळणार नाहीत.  ते धर्म देव वेगैरे मानत नाहीत. शरद  पवार हे स्वतः नास्तिक असल्यामुळे ते नास्तिकतेच्याच दृष्टिकोनातून धर्माकडे पाहतात” 

अशी जबरी टीका राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर ठाण्यातील उत्तर सभेत केली… या टीकेला शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तरपणे प्रत्युत्तर दिलं.

“मी माझा धर्म आणि देव याचं प्रदर्शन करत नाही. मी आजपर्यंत १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो तेंव्हा प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोणत्या मंदिरातून फुटतो हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा. आम्ही कधीही त्याचा गाजावाजा केला नाही”, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. 

आता राज ठाकरे यांच्या ‘नास्तिक’ या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते शरद पवारांचे मंदिरात हात जोडलेले फोटो पोस्ट करतायेत..अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिला, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे दावे केले जात आहेत.

मात्र त्यांचे हे दावे कितपत खरे आहेत ? पवार यांनी खरंच मंदिरांच्या आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी कामं केली आहेत का ?

शरद पवार हे आस्तिक आहेत कि नास्तिक आहेत हा कायमच चर्चेतला विषय असतोय. पण या बाबत वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.

कारण शरद पवार म्हणाले तसं पवारांच्या प्रचाराचा पहिला नारळ फुटतो ते बारामती तालुक्यातील कन्हेरी मारुतीच्या मंदिरात. फक्त निवडणुकीपुरतंच नाही तर पवार कुटुंबीय अधे -मध्ये या मंदिरात येत असतात. 

यामागे असं सांगितलं जातं कि, डॉ.आप्पासाहेब पवार यांनी जन्म गावाचे ऋण फेडायचं म्हणून देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या या कन्हेरी मारुती तीर्थक्षेत्राचा विकास केला.

ही झाली कन्हेरी मारुती मंदिराची गोष्ट, उशिवाय मुख्यमंत्री असतांना पवारांनी सपत्निक विठ्ठल-रखुमाईची पूजा केली होती हेही झाकून नाहीये. 

शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात धार्मिक स्थळांचा केलेला विकास पाहायचा झाला तर…

यात पहिलं नाव येतं म्हणजे पैठणमधील संतपीठ –

गंमत म्हणजे, महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात पण या समृद्ध संत परंपरेचा अभ्यास करण्याची सोय महाराष्ट्रातच नव्हती…. पण मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी संतपीठाची घोषणा करून ही उणीव दूर केली. 

महाराष्ट्रामध्ये संतपीठाची स्थापना व्हावी, ही मागणी तशी जुनीच होती. संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली १९८० च्या सुमाराला सरकारला याबाबतच्या शिफारशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली गेली. 

मराठवाडा विकास ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत पैठणच्या संतपीठाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा १९८१ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री अंतुले यांनी केली..  

३१ जानेवारी १९९१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी समारोहात बोलतांना, पैठण येथेच संतपीठ उभारले जाईल, अशी घोषणा केली

त्याच दरम्यान त्यांनी पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानाशेजारची सुमारे १७ एकर जमीन संतपीठासाठी उपलब्ध करून दिली. इतकाच नाही तर १९९१-९२ अर्थसंकल्पात संतपीठासाठी शासनाने एक कोटीचा निधीही उपलब्ध करून दिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पसरलेल्या वारकरी संप्रदायाच्या या अभ्यासपीठासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला. आवश्यक ते सरकारी पाठबळही दिलं.

दुसरं नाव म्हणजे गणपतीपुळे – 

१९९३ मध्ये गणपतीपुळे देवस्थानचा पहिला विकास आराखडा शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मंजूर झाला होता. १९९३ मध्ये शरद पवार यांनी गणपतीपुळे येथील श्रीगणेश मंदिराला भेट दिली आणि विकास आराखड्याची माहिती घेतली होती. त्यानंतर पवार काहीच वर्षांपूर्वी गणपतीपुळेत आले होते,त्यावेळच्या आठवणींना पवार यांनी यावेळी उजाळा दिला.  तसेच या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमही पवारांच्याच उपस्थित झाला होता. 

तसेच शरद पवार यांनी देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राचा विकास  –

गणपतीपुळे आणि संतपीठाच्या उभारणीबरोबरच शरद पवार यांनी देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राचा विकासाचा निर्णयही घेतला होता. 

या तिन्ही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भाविक येत असतात. वारकऱ्यांची दिंडी आणि तीर्थक्षेत्रीचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना आवश्यक त्या सोई- सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने विकासयोजना तयार करण्यात आली होती. वारीसाठी १९९० मध्ये, १ कोटी ७५ लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. 

भुयारी गटारं, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, एस.टी. बस स्टॅण्ड, घाट बांधणी, पूरनियंत्रण, स्नानगृह स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते इत्यादी विकास काम त्यांनी केलीत. तसेच देहू इथे सरकारने धर्मशाळा बांधावी; पण त्या धर्मशाळेचं व्यवस्थापन देहू ग्रामपंचायतीने करावं, असा निर्णय देखील शरद पवार यांनीच त्यावेळी घेतला होता.  

इतकंच नाही तर राष्ट्रवादी युवकच कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी बोल भिडूशी बोलतांना अशी महिती दिली कि, 

शरद पवारांनी मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रातील सर्व अष्टविनायक गणपती मंदिरांचा विकास आराखडा तयार केला. गणपतीपुळे, तुळजाभवानी मंदिर, महालक्ष्मी, पंढरपूर असे तीर्थक्षेत्र प्राधिकरण  पवार यांच्याच आग्रहाने झाले. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये मंदिरांमध्ये सभा मंडपांची कामंही त्यांच्या कार्यकाळात झालीत आणि आजतागायत चालू असल्याचं देखील वर्पे यांनी सांगितलं आहे..

अशाप्रकारे शरद पवार यांच्यावर नास्तिक असल्याची कितीही टीका होऊ देत, पण त्यामागची वस्तुस्थिती दुर्लक्षित करून चालणार नाही हे मात्र नक्की.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.