आपल्या ‘माती’मधली कबड्डी शरद पवारांनी आंतरराष्ट्रीय ‘मॅट’वर कशी नेली..?

इंडोनेशियातल्या जकार्ता येथे खेळविण्यात येत असलेल्या आशियायी स्पर्धांमध्ये कबड्डीत भारताचा इराणकडून पराभव झाला आणि १९९० पासून सुरु झालेली भारताची कबड्डीतील सुवर्णविजयाची ऐतिहासिक परंपरा खंडित झाली.

१९९० साली चीनमध्ये भरविण्यात आलेल्या आशियायी स्पर्धांमध्ये सर्वप्रथम कबड्डीचा समावेश करण्यात आला. या स्पर्धांमध्ये भारताने कबड्डीत सुवर्णपदक पटकावलं आणि तेव्हाचपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने या खेळावर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

तेव्हाचपासून दर ४ वर्षांनी वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या आशियायी स्पर्धांमधलं भारताचं कबड्डीमधलं सुवर्णपदक हे अगदी प्रत्येक स्पर्धेत गृहीत धरलेलंच. इतर संघांनी लढायचं तेच रौप्यपदकासाठी असा एक अलिखित नियमच जणू.

इराणविरुद्धच्या भारताच्या पराभवाने स्पर्धेतील भारताचं एक सुवर्णपदक कमी होणार असलं तरी या पराभवातही ‘कबड्डी’ या अस्सल भारतीय मातीतील खेळाचा मात्र विजय झाला आहे. यानिमित्ताने ‘कबड्डी’ हा भारतीय मातीतील खेळ खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय झाला आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि उत्पत्ती

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये ‘हुतुतू’, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये ‘चेडू-गुडू’, केरळात ‘वांडीकली’, पंजाबमध्ये ‘जबर गणना’, बंगालमध्ये ‘हाडूडू’ आणि उत्तर भारतात ‘कबड्डी’ अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अस्सल भारतीय मातीतल्या कबड्डीला मोठा इतिहास आहे.

कब्बडीच्या जन्मासंबंधी २ थेअरीज अभ्यासकांनी मांडल्या आहेत. पहिल्या थेअरीनुसार प्रागैतिहासिक काळात ज्यावेळी माणूस जंगली श्वापदांपासून स्वतःच संरक्षण करायचं शिकत होता, त्यातून कबड्डीचा जन्म झाला असावा, तर दुसरी थेअरी कबड्डीच्या जन्माचा संबंध महाभारताशी जोडते.

महाभारतातील चक्रव्युव्हात घूसलेल्या अभिमन्यूचा किस्सा तर आपल्या सगळ्यांनाच माहितेय. अनेक अभ्यासक या घटनेला कबड्डीची उत्पत्तीमागचं प्रेरणास्थान मानतात. चक्रव्युहातले योद्धे हा ‘प्रतिस्पर्धी संघ’ आणि चक्रव्युहात शिरलेला अभिमन्यू हा ‘रायडर’ अशी ही संकल्पना.

आजच्या काळातली कबड्डी

womens kabbadi

१९३८ सालापासून कबड्डीच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा नियमितपणे देशातील  वेगवेगळ्या भागात खेळवण्यात येऊ लागल्या. १९५२ सालापर्यंत कबड्डी हा फक्त पुरुषांचा खेळ म्हणून ओळखला जायचा. कबड्डीची दारे महिलांसाठी खुली करण्याचं श्रेय जातं महाराष्ट्राला. महाराष्ट्राच्या संघाने १९५२ सालच्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला उतरवलं आणि तिथुनच महिलांची कबड्डी देखील सुरु झाली.

राष्ट्रीय पातळीवर कबड्डीच्या विकासासाठी त्यावेळी अनेक माणसं झटत होती. भाई नेरूळकर असतील किंवा शंकरराव उर्फ बुवा साळवी आणि बाबुकाका गोडबोले असतील यांसारख्या अनेकांनी कबड्डीच्या विकासासाठी जीव तोडून प्रयत्न केले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे हा खेळ राष्ट्रीय पातळीवर टिकू शकला.

१९४५ साली ‘मुंबई राज्य कबड्डी संघटना’ स्थापन करण्यात आली होती. हीच संघटना पुढे १९६० साली महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ‘महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना’ म्हणून ओळखली जाऊ लागली. या संघटनेचे देखील कबड्डीच्या विकासात मोठं योगदान राहिलेलं आहे.

देशी कबड्डी आंतरराष्ट्रीय पातळीवर

बुवा
शरद पवार आणि कब्बडीमहर्षी बुवा साळवी

भारतातल्या मातीतल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचं श्रेय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि कब्बडीमहर्षी बुवा साळवी यांचं. बुवा साळवी यांनी आपलं आयुष्य कबड्डीसाठी वाहून घेतलं आणि त्याला शरद पवारांची भक्कम साथ मिळाली. त्यांच्याच प्रयत्नातून हा ‘देशी’ खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला. आशियायी स्पर्धांमध्ये कबड्डीला स्थान मिळवून देण्यात देखील या दोघाची निर्णायक भूमिका राहिली.

१९७३ साली शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ‘अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ या संघटनेची स्थापना करण्यात आली. शरद पवार हे संघटनेचे अध्यक्ष झाले तर टी. राजगोपालचारी यांच्यावर संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. याच संघटनेने कबड्डी संबंधीचे नियम तयार केले.

राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी  शरद पवार यांनीच १९७८ साली ‘एशिअन अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन’ची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून आशियायी देशांमध्ये कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न केले.

१९७९ साली बांगलादेशच्या कबड्डी संघाने भारताचा दौरा केला. त्यांना भारतीय दौऱ्यावर बोलावण्यात देखील शरद पवार यांचीच महत्वाची भूमिका होती. या दौऱ्यात बांगलादेशच्या संघाने भारताविरोधात ५ सामने खेळले होते. या दौऱ्यासंदर्भातील एक अतिशय रंजक किस्सा तत्कालीन भारतीय संघाचे कर्णधार शांताराम जाधव यांनी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितला होता.

शांताराम जाधव सांगतात की,

“ पवार साहेब त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मी भारतीय संघाचा कर्णधार. बांगलादेशविरुद्धचा सामना बघण्यासाठी साहेब मैदानात उपस्थित होते. सामना अतिशय एकतर्फी झाला होता. भारतीय संघ मोठ्या फरकाने सामना जिंकणार असं दिसत होतं आणि तेवढ्यात साहेबांकडून निरोप आला की सामना कमी फरकाने जिंका”

शरद पवारांकडून गेलेला हा निरोप खरं तर सर्वच खेळाडूंना चक्रावून टाकणारा होता. पण हा निरोप पाठविण्यामागची त्यांची भूमिका ही कबड्डीचा पालक देश म्हणून खेळाच्या विकासासाठीची होती. कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी होती.

बांगलादेश जर फार जास्त फरकाने सामना हरला आणि पुढेही तो तसाच हरत राहिला तर त्यांचा या खेळातला इंटरेस्टच निघून जायचा, अशी भीती त्यावेळी शरद पवारांना वाटत होती. कबड्डी देशाबाहेर न्यायची असेल तर देशाबाहेरील खेळाडूंना या खेळात इंटरेस्ट वाटला पाहिजे, हा खेळ त्यांना आपला वाटला पाहिजे, असं त्यांचं मत होतं.

kabbdi

आशियाई स्पर्धेत एखाद्या खेळाचा समावेश करायचा असेल, तर किमान पाच देशांत हा खेळ खेळला गेला पाहिजे, अशी अट आहे. त्यामुळे आशियामधल्या जपान आणि चीनसारख्या महत्वाच्या देशांमध्ये कबड्डी खेळवली जावीत अशी बुवा साळवी यांची इच्छा होती. त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी बुवा साळवी यांनी शरद पवारांना आग्रह धरला. बुवांच्या आग्रहावरून शरद पवारांनी या दोन्हीही देशात कबड्डीचे सामने खेळविले जाण्यासाठी प्रयत्न केले.

भारताचा संघ जपानमध्ये पाठवला आणि भारतीय खेळाडूंचा खेळ बघून जपानमध्ये कबड्डीला ओळख मिळाली. कबड्डीचे अनेक संघ तिथं स्थापन झाले. भारतातून कबड्डी शिकण्यासाठी प्रशिक्षक देखील मागवले गेले. याच गोष्टीची पुनरावृत्ती चीनमध्ये देखील झाली.

एखाद्या खेळाचा कुठल्याही अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग होण्यासाठी त्या खेळाचा प्रदर्शनीय सामना आधी त्या स्पर्धेत खेळवावा लागतो. पवारांच्या प्रयत्नाने १९८२ साली नवी दिल्ली इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा सामना खेळविण्यात आला. पुढे जवळपास ८ वर्षांनी म्हणजे १९९० साली चीनमध्ये झालेल्या आशियायी स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश झाला.

“हार-जीत हा खेळाचा भागच असतो. आशियायी  स्पर्धेत आपण  हरलो असलो तरी यावेळी खऱ्या अर्थाने कबड्डी जिंकली आहे. पवार साहेब आणि साळवी बुवांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आलेलं हे यश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कबड्डीमध्ये हरवणारा संघ तयार होणं, हे खऱ्या अर्थाने कबड्डीच्या जागतिक होण्याचं लक्षण म्हणून या ऐतिहासिक घटनेकडे बघितलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार शांताराम जाधव यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना नोंदवली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.