नथुरामच्या रोलमुळे फेमस झालेले शरद पोंक्षे गांधीजींच्या भूमिकेसाठी तेवढेच उत्साहाने तयार होते

टिपू सुलतान, नथुराम गोडसे, महात्मा गांधी, हिंदुत्व, मुस्लिम, जात, धर्म, भाषा अशा गोष्टींवरून वाद होणं भारताला काही नवं नाही. अशा वादांमध्ये गोची होती ती कलाकारांची. म्हणजे कलाकाराने एखादी वादग्रस्त भूमिका घ्यावी की घेऊ नये हे तो कलाकार न ठरवता आपला भारतीय समाज ठरवतो.

हे सांगण्याच कारण सातेक दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरुन नवा वाद रंगला होता. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली आणि वाद झाला. त्यावेळी भूमिकेवर आपलं स्पष्टीकरण देताना ते म्हंटले,

एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो.

असंच काहीसं घडलं होत शरद पोंक्षे यांच्या नथुरामाच्या भूमिकेसोबत

तर हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि वावटळ उठली.

तर बारावी झाल्यावर शरद पोंक्षे यांनी गव्हर्मेटचा डिप्लोमा केला आणि ते बी. ई.एस.टी. मध्येनोकरीला लागले. १९७८ ची ही गोष्ट. बी. ई. एस. टी. मध्येही काही चांगली कलाप्रेमी मंडळी होती. त्यांचे आकर्षण त्यांना होते. जेव्हाजेव्हा बी.ई.एस.टी. साठी एकांकिका, नाटक सादर व्हायचे असायचे त्यात त्यांना हमखास संधी मिळायची. यातूनच त्यांची हौशी रंगभूमीवरची वाटचाल सुरू झाली होती.

पण पोंक्षे यांना मनासारखं असं काही मिळत नव्हतं. प्र. ल. मयेकर, एकदा बेस्टच्याच एका कार्यक्रमात त्यांचा अभिनय पाहून नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला एका नाटकातून संधी द्यायचे नक्की केले. त्यांच्यामुळे पोंक्षे यांना पहिले नाटक मिळाले ते ‘वरून सगळे सारखे’.

या नाटकामुळे त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर हळूहळू नाटकं मिळत गेली. मग टीव्ही मालिका मिळायला लागल्या. दामिनी मालिकेतली त्यांची पत्रकार कारखानीसची भूमिका लक्षात राहाण्यासारखी होती. पण अद्याप म्हणावं तसं यश काही त्यांना मिळालेलं नव्हतं. दरम्यान अभिनेता दिग्दर्शक विनय आपटे “मी नथूराम गोडसे बोलतोय’ ह्या नाटकाची जुळवाजुळव करत होते. त्यांना योग्य असा नथुराम गोडसे काही सापडत नव्हता. बऱ्याच जणांना त्याने बघून झालं होतं. पण अद्याप कुणी पसंत पडत नव्हत.

बेस्टमध्ये प्रकाशयोजनाकार मुळीक एकदा शरदकडे आले. मुळीकांनी त्यांनी त्याला सांगितलं लवकर चल, उदय धुरत सध्या नथुराम गोडसेसाठी शोधाशोध करताहेत. त्यांना तू भेट. बघ काय जमतं का.” पोंक्षे लागलीच उठले आणि मुळीक ह्यांच्या बरोबर धुरत ह्यांच्यासमोर उभा राहिले. त्यांनी पोंक्षे यांना नथुराम गोडसे तसाच्या तसा मनोगताच्या सेटवर बोलायला दिला. त्यांना एकूण शरद पोंक्षे ठीकठाक वाटला. त्यांनी तस विनय आपटेला कळवलं. नंतर शरदला विनयसमोर उभं राहावं लागलं.

आपटेंनी नाटकातलं पहिलं पान वाचायला सांगितलं. त्यांनी कुठलीही उणीव काढली नाही. पण लगेचच काही प्रतिक्रिया दिली नाही. असाच येत रहा, म्हणून सांगितलं. नंतर रोज आठ दिवस पोंक्षे तिकडे जायचे. विनय आपटेसमोर ते सांगेल ते वाचून दाखवायचे. आपली निवड होणार आहे की नाही ह्याबद्दल त्यांना काही थांगपत्ता लागत नव्हता.

खरं तर विनयच्या मनाने पहिल्या झटक्यातच शरदच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं होतं. पण त्याच वेळी मंगेश भिडे हे आणखी एक नाव चर्चेत होतं. मंगेशला सुद्धा असंच वाचन करून दाखवावं लागत होत. पण त्याच्या नावाची शिफारस भक्ती बर्वे, प्रभाकर पणशीकर अशा दिग्गजांनी केली होती. पण विनय असा कुणाच्या शिफारशीने वहावत जाणारा नव्हता. त्याने ठामपणे निर्णय घेतला होता. माझा नथुराम गोडसे शरद पोंक्षेच करणार.

त्यांनी तसं मग पत्रकार परिषदेत जाहीर केलं आणि शरदला त्या अर्थाने पहिल्यांदा मध्यवर्ती भूमिका मिळाली. ह्या नाटकात सबकुछ तेच असणार होते. त्यांच्या सगळ्या गुणांना संधी देणार असे हे नाटक होतं. त्यांचे एकूण व्यक्तीमत्त्व, आवाज, उच्चार सगळं काही ह्या भूमिकेसाठी योग्य ठरणार होतं. शरदने होता येतील तितकी पुस्तकं वाचून काढली. नथुराम साकारायचा तर त्याची मनोभूमिका समजून घेतली पाहिजे ह्या उद्देशाने त्याने उपलब्ध अशी त्याच्यावरची पुस्तकं वाचली

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चा पहिला प्रयोग झाला आणि एकच वावटळ उठली. हे नाटक महात्मा गांधींच्या विरोधात आहे आणि ह्या नाटकामुळे हिंसेला खतपाणी मिळेल असा युक्तीवाद करत राजकारण्यांनी ह्या नाटकाच्या निमित्ताने एकच गहजब करायला सुरुवात केली.

त्यावेळी शरद पोंक्षे म्हणाले,

महात्मा गांधीजीचे अनुयायी म्हणवणारे बरोब्बर त्यांच्या शिकवणीच्या विरुद्ध असे वागत होते. गांधीजींचा हिंसेला विरोध होता आणि हे आमच्या नाटकाचा प्रयोग बंद पाडण्यासाठी हाणामाऱ्या मोड़तोड़ करत सुटले होते. पण त्यांच्या पैकी कोणीच ते नाटक वाचलं नव्हतं.

मी व्यावसायिक अभिनेता असल्याने मला नथुराम गोडसे साकार करण्यावर आक्षेप असायची गरज नव्हती. कुठल्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन आम्ही नाटक करायला घेतले नव्हते. आम्हांला कुठल्या पक्षाची, संघटनेची फूस नव्हती की मदत नव्हती.

उद्या मला गांधीजींची भूमिका करावी लागली तरी मी ती करणार. कारण मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. मी ती भूमिका म्हणजे नथुराम गोडसेची भूमिका नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

हे नाटक एवढं वादग्रस्त बनलं की त्याच्यावरून राज्यसभेत विधानसभेत यावर खडाजंगी चर्चा झाली. लोकसभा सुद्धा ह्या नाटकावरून गाजली. कामकाज बंद पडू लागले. चारचार दिवस जेव्हा कामकाज ठप्प झालं तेव्हा एका नाटकापेक्षा संसदेतलं कामकाज महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊन नाटकाच्या बाजूने असलेल्यांनीही समजूतदारपणा दाखवत प्रयोग बंद करायचे ठरवले. हे नाटक अवघ्या सात प्रयोगांनंतर थांबवावं लागलं. पण शरद पोंक्षे एक समर्थ अभिनेता असल्याचं सर्वांना जाणवलं होतं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.