लक्ष्यासारख्या खोडकर मुलाचा कलंदर बाप म्हणून शरद तळवलकर शोभून दिसायचे

डोक्यावर तुरळक केस, गोलाकार चेहरा, अंगापिंडाने धष्टपुष्ट असं वेगळं व्यक्तिमत्त्व असलेला कलाकार म्हणजे शरद तळवलकर. विनोदाचं अफलातून टायमिंग शरद तळवलकर यांच्याकडे होतं. ‘मुंबईचा जावई’ सिनेमात अनोख्या पद्धतीने अगदी सहज जाता येता आपल्याही नकळत शरदराव विनोदी कोट्या करून जातात. नव्या पिढीला कदाचित या माणसाबद्दल ठाऊक नसेल.

‘धूमधडाका’ सिनेमात लक्ष्याच्या वडिलांची भूमिका ज्या कलाकाराने केलीय ते शरद तळवलकर.

याच सिनेमातील एक लोकप्रिय प्रसंग म्हणजे, लक्ष्या एक हॉरर गोष्ट सांगत असतो. आणि त्यावेळी शरद तळवलकर यांचा घाबरून पांढरा झालेला चेहरा पाहून एक वेगळीच धमाल उडते.

लक्ष्यासारख्या अवली मुलाचा कलंदर बाप म्हणून शरद तळवलकर शोभून दिसतात.

शरद तळवलकर यांना लहानपणापासून अभिनयाचं प्रचंड वेड होतं. पुण्यातील भावे शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेतील नाटकांमध्ये ते काम करत असत. पुढे कॉलेजला गेल्यावर स्वतःच्या अवलिया स्वभावामुळे शरदराव चांगलेच प्रसिद्ध होते.

कॉलेजला असताना एका कडक आणि शिस्तप्रिय शिक्षकाच्या मुलीवर शरदरावांचं प्रेम होतं. त्या मुलीलाही शरदराव आवडत होते. गोष्ट लग्नापर्यंत गेली. परंतु मुलीच्या वडिलांना कसं सांगायचं हा प्रश्न होता. कारण आधीच शरदरावांची प्रतिमा कॉलेजमध्ये वेगळी होती.

शरदराव जेव्हा जेव्हा मुलीच्या वडिलांना भेटायला जात तेव्हा एकतर ते कामात किंवा चिडलेले असत. अखेर मुलगी म्हणाली,

“माझे बाबा जेव्हा शांत असतील तेव्हा तू त्यांच्यासमोर लग्नाचा विषय काढ.”

शरदरावांनी हे वाक्य मनात ठेवलं. काही दिवसांनी मुलीची आई वारली. तेव्हा शरदराव सुद्धा स्मशानभूमीत गेले. बायको गेल्यामुळे मुलीचे वडील शांत उभे असलेले त्यांना दिसले. शरदराव हळूच त्या शिक्षकांजवळ गेले. आणि त्यांच्या कानात म्हणाले,

“मला तुमची मुलगी आवडते. आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असून आम्हाला लग्न करायचं आहे.”

यानंतर पुढे काय झालं ठाऊक नाही. पण स्मशानभूमीत मुलीच्या वडिलांजवळ मुलीचा हात मागणारे शरद तळवलकर पहिले आणि शेवटचे व्यक्ती असावेत.

व्ययक्तिक आयुष्यात हा माणूस इतका अवलिया असल्याने त्यांचा विनोदी अभिनय हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग वाटतो. कॉलेजला असताना अभिनयासोबत नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली. प्रख्यात अभिनेते केशवराव दाते यांनी शरदरावांजवळ असलेले कलागुण ओळखले. आणि केशवराव दातेंच्या मार्गदर्शनाखाली १९३८ साली ‘नाट्य विकास कंपनी’ मध्ये शरदराव दाखल झाले.

त्याकाळी बालगंधर्वांची संगीत नाटकं प्रेक्षकांची गर्दी खेचत होती. शरद तळवलकर हे फार मोठ्या काळाचे साक्षीदार आहेत. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना बालगंधर्व सारख्या मोठ्या कलाकारासोबत ‘एकच प्याला’ नाटकात काम करायला मिळाले. ‘एकच प्याला’ नाटकात शरद तळवलकर तळीराम रंगवायचे.

त्यांच्या अभिनयाने बालगंधर्व इतके प्रभावित झाले की त्यांनी शरदरावांना नाटक संपल्यावर शाबासकीची थाप दिली.

१९५२ साली राजा गोसावी आणि शरद तळवलकर या दोघांनी ‘अखेर जमलं’ या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

दोघांची जोडी प्रेक्षकांनी इतकी डोक्यावर घेतली की पुढे अनेक सिनेमांमध्ये दोघे एकत्र दिसले. शरद तळवलकर यांनी सिनेमा आणि नाटकांमध्ये मोजकंच तरीही दर्जेदार काम करून ठेवलं आहे. तसेच पुणे आकाशवाणी केंद्रावर त्यांनी निर्माते म्हणून अनेक नभोनाट्यांचं सादरीकरण केलं. रेडीओवर सादर होणाऱ्या नाटकांना नभोनाट्य म्हणतात.

जेव्हा मराठी सिनेसृष्टीची आणि रंगभूमीची जुनी पानं चाळली जातात, तेव्हा शरद तळवलकर यांच्यासारख्या कलाकारांमुळे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी मध्ये किती महान कलाकर होऊन गेले आहेत, याची जाणीव होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.