आणि लाखो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरलेल्या शरद पवारांचा पुनर्जन्म झाला !!

इंदिरा गांधीच्या मार्फत देशात आणिबाणी लावण्यात आली. आणिबाणीचा परिणाम म्हणजे आजवर एकछत्री अंमल असणारी कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर आली. आणिबाणी नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये देशात जनता पक्ष बहुमताने निवडून आला. त्यानंतर म्हणजेच १९७८ मध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनात कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. इंदिरा गांधीच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस (आय) अर्थात इंदिरा कॉंग्रेस म्हणून ओळखली जावू लागली तर दूसरीकडे समाजवादी कॉंग्रेस या नावाने दूसरा गट ओळखला जावू लागला.

महाराष्ट्रात समाजवादी कॉंग्रेसचं महत्वाचं नेतृत्व होतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार.

नंतरच्या काळात जनता पक्षातले हेवेदावे लोकांच्या समोर येवू लागले. जनता पक्षाच सरकार गडगडलं आणि देशात निवडणूका लागल्या. पुन्हा इंदिरा गांधींची लाट निर्माण झाली. या निवडणुकीत जनता पक्ष तर कोलमडलाच पण कॉंग्रेसमधून फूट पडलेल्या समाजवादी गटाची अवस्था देखील वाईट झाली. देशभरातून फक्त दहा खासदारच समाजवादी पक्षामार्फत निवडून आले होते. यात महाराष्ट्रातून फक्त एकच खासदार निवडून आले ते म्हणजे शरद पवार.

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदच सरकार होतं. इंदिरा गांधी यांनी सत्तेत येताच त्यांनी पुलोद सरकार बरखास्त करून टाकले. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. जनता पक्षात फुट पडलीच होती. जनता पक्षावर लोक नाराज होते त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर पडणार हे निश्चित होते.

निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसने बाजी मारली.186 आमदारांसह (कॉंग्रेस आय) महाराष्ट्रात. तर कॉंग्रेस एस फक्त 47 आमदार निवडून येवू शकले.

47 आमदारांच्या बळावर शरद पवार विरोधी पक्षनेता बनले. याच काळात इंदिरा कॉंग्रेसकडे वाढला कल पाहून समाजवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली होती. अशातच यशवंतराव चव्हाण यांनी एक विधान केले. ते विधान असे होते की,

जनतेचा कौल पाहून लोकांना खरी कॉंग्रेस कोणती हे कळलं आहे.

यशवंतराव चव्हाण यांच हे विधान सरळसरळ इंदिरा कॉंग्रेसच नेतृत्व मान्य करणार होतं. या नंतर देशपातळीवर तर समाजवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता वाढलीच पण राज्यातलं वातावरण देखील समाजवादी कॉंग्रेसच्या विरोधात गेलं.

शरद पवार कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेले होते.

संधीचा फायदा घेवून एक एक आमदार समाजवादी कॉंग्रेस सोडून जावू लागला. एकूण 47 आमदार निवडून आणणाऱ्या समाजवादी कॉंग्रेसचे फक्त सहाच आमदार सोबत राहिले होते. शरद पवार लंडनच्या दौऱ्यावरुन आले तेव्हा त्यांच्यासोबत कमलकिशोर कदम, पद्मसिंह पाटील, मालोजीराव मोगल यांच्यासह अजून तीन आमदारच शरद पवार यांच्यासोबत होते.

या घडामोडींचा पहिला फटका म्हणजे शरद पवारांच विरोधी पक्षनेतेपद गेलं. शरद पवारांना आपले आमदार सोडून गेल्याची बातमी लंडन येथेच समजली होती. त्याच मानसिकतेत ते मुंबई विमानतळावर उतरले. आपल्या सोबतचे सहा आमदार सोडले तर शरद पवारांच्या सोबत होते ती मुंबई विमानतळावर आलेली प्रचंड मोठ्ठी गर्दी.राज्यभरातली शरद पवार आणि समाजवादी कॉंग्रेस मानणाऱ्या गटाने मुंबई विमानतळावर त्यांच स्वागत केलं.

हे एक प्रकारचं शक्तिप्रदर्शनच होतं. पहिल्याच झटक्यात शऱद पवार अपेक्षित परिमाण साधू शकले.

तो म्हणजे समाजवादी कॉंग्रेस संपलेली नाही.

शरद पवारांनी समाजवादी कॉंग्रेस पुन्हा नव्याने बांधायच ठरवलं. या काळात शरद पवारांनी नेमकं काय केलं तर त्यांनी स्वत:चा दिनक्रम आखून घेतला. विरोधी पक्षनेतेपद गेल्याने शरद पवारांना मुंबई बाहेर बराचसा वेळ देता येणार होता. आठवड्यातील पाच दिवस महाराष्ट्र दौरा असा कार्यक्रम पहिल्या टप्यात ठरलाय या भेटीत पवारांनी ठरवलं की प्रत्येक ठिकाणी जावून अनौपचारिक गप्पा करायच्या. मोठ्ठमोठ्ठे कार्यक्रम घ्यायचे नाहीत तर छोटे कार्यक्रम घेवून लोकांसोबत संवाद साधायचां.

या दौऱ्यात त्यांनी पुन्हा आपला गट बांधण्यास सुरवात केली. थेट लोकांमध्ये घुसल्यामुळे लोकांची मते त्यांना कळत होती.

महाराष्ट्र दौऱ्याचा योग्य तो परिणाम साधला गेला. बापूराव जगताप, मोतीराज राठोड, फ.मु. शिंदे अशा साहित्य  आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांशी पवारांचा आलेला संपर्क तो याच काळातला. गावागावातल्या प्रगतशील शेतकऱ्यांसोबत बोलणं, साहित्यिकाच्या भेटी घेणं, शेतकऱ्यांच्या बांधावर मैफिली रंगवण हे काम शरद पवारांनी केलं. यामुळेच शरद पवार लोकांशी थेट कनेक्ट झाले. समाजवादी कॉंग्रेस किंवा स्थानिक आमदार असा गट न राहता शरद पवारांनी स्वत:चा गट बांधण्यास प्राधान्य दिलं.

आजही एखाद्या दौऱ्यानिमित्त शरद पवार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील एखाद्या गावात जातात तेव्हा एखाद्या व्यक्तिला नावाने ओळखतात. तेव्हा हि ओळख त्याच काळातील असते.

त्या काळात रोजगार हमी योजना राबण्यात आली होती. रोजगार हमी योजनेसारख्या गोष्टींच मतात परिवर्तन झालं नव्हतं. त्यामुळे शासकिय यंत्रणा नेमकी कुठे चुकली. लोकांना रोजगार हमी योजनेकडून काय फायदा झाला हे स्वत: शरद पवार बैठका घेवून समजावून घेवू लागले. जिल्हा परिषदेच्या शाळेत जावून शिक्षकांसोबत भेटू लागले. त्यांनी शिक्षणविषयक योजना तयार करण्याचा संकल्प केला. डॉ. जे.पी.नाईक सारख्या शिक्षणतज्ञांसोबत शरद पवारांचे संबध देखील याच काळात दृढ झालेले.

ना.धो. महानोर यांच्यासाऱख्या कवी आणि शेतकरी असणाऱ्या लोकांच्या शेतात ते गेले. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. आणि त्यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात पहिला मुद्दा हातात घेतला तो,

“शेतीमालाचा”

शेतीमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी शेतकरी दिंडी काढण्याचं नियोजन करण्यात आलं.

आजवर दिंडी हि संकल्पना फक्त वारी आणि विठ्ठलाशी संबधित होती. पण राजकारणात आपल्या भूमिका मांडताना मोर्चा ऐवजी पहिल्यांदा दिंडी हा शब्द वापरण्यात आला. त्याचा अपेक्षित परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना हि थेट राजकिय कृती वाटली नाही. हजारो शेतकरी जळगाव ते नागपूर या शेतकरी दिंडीत सहभागी झाले.

शेकडो टाळकरी, भजन किर्तन करणारे यांच्यामुळे दिंडीत वेगळा उत्साह भिनला. राजाराम बापू पाटील, एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, मृणाल गोऱ्हे , ना.धो.महानोर अशी मातब्बर मंडळी दिंडीत सहभागी झाले त्यामुळे दिंडीची परिणामकारकता खूप वाढली. डॉ. श्रीराम लागू, नानासाहेब गोरे, गोदाताई परुळेकर यांच्यासारख्या लोकांनी दिंडीत सहभाग नोंदवला.

या दिंडीत यशवंतराव चव्हाण देखील सहभागी झाले. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना पोहरा येथे अटक करण्यात आली. मात्र दिंडी न थांबता नागपूरमध्ये पोहचली. एस.एम.जोशी, जॉर्ज फर्नांडिस, देवीलाल यांनी नागपूरात दिंडीच नेतृत्व केलं.

या घटनेचे राजकिय पडसाद महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पोहचले. शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला.

शरद पवारांच नेतृत्व पुन्हा एकदा ठळक होवू लागलं. या दिंडीमूळेच देशभरातील शेतकऱ्यांच नेतृत्व करण्यासाठी शरद पवारांना दिल्लीला बोलवण्यात आलं.

देवीलाल आणि प्रकाश सिंग बादल यांच्या मार्फत दिल्लीत किसान रॅली काढण्यात येणार होती. या दोन्ही नेत्यांनी किसान रॅलीची संपुर्ण जबाबदारी शरद पवारांकडे सोपवली. हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तरप्रदेश सारख्या राज्यात फिरून शरद पवारांनी जास्तीत जास्त लोक किसान रॅलीला येतील याच नियोजन केलं.

शरद पवारंच नियोजन परफेक्ट बसलं आणि दिल्लीत २० लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत किसान रॅली काढण्यात आली. इंडिया गेटवर जिथवर नजर जाईल तिथवर फक्त आणि फक्त शेतकरीच दिसत होते. किसान रॅलीच्या या विक्रमी आयोजनानंतर शरद पवारांच दिल्लीतलं प्रस्थ देखील वाढलं.

पण दूसरीकडे आपल्याकडे सहा ते सातच आमदार असल्याचं देखील चित्र होतं.

दरम्यान पाच वर्षाच्या काळात कॉंग्रेस नेतृत्वाने चार मुख्यमंत्री बदलले होते. कॉंग्रेसकडे आमदारांची संख्या प्रचंड असली तरी हायकमांड महाराष्ट्रातील नेतृत्वावरून अस्थिर आहे हे सिद्ध करणार हे चित्र होतं. याच दरम्यान ऑक्टोंबर 1984 रोजी इंदिरा गांधीची हत्या झाली. राजीव गांधी यांच्यावर कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी आली.

अंतीम दर्शनासाठी शरद पवार गेल्यानंतर राजीव गांधींनी आपण एकत्र काम करुया अस वक्तव्य केल्याच शऱद पवार ऐके ठिकाणी लिहतात.

लोकसभेच्या निवडणूका लागल्या. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे देशभरात प्रचंड सहानभुतीची लाट होती. झालं देखील तसच. राजीव गांधींच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाने 404 इतक्या जागा जिंकल्या. या निवडणूकीत देशभरातून सर्वाधिक लिड राजीव गांधींनी अमेठीतून मिळालं होतं. तर समाजवादी कॉंग्रेसचे फक्त चारच खासदार निवडून आले होते.

या चार खासदारामधून शरद पवार देशात दूसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले होते.

गेल्या काळात झालेल्या शेतकरी दिंडी आणि किसान रॅलीचा योग्य तो फायदा झाला होता. सभागृहातील समाजवादी कॉंग्रेसचे नेते म्हणून शरद पवारांना पहिल्या बाकावर बसायला मिळालं. पवारांचा हा राष्ट्रीय राजकारणातला प्रवेश होता.

याच दरम्यान म्हणजे 1985 साली महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका लागल्या.

शरद पवार राजकारणात सक्रिय झाले होते. ते आत्ता राष्ट्रीय राजकारणात होते पण इकडे समाजवादी कॉंग्रेसचे फक्त सहाच आमदार होते. अशा वेळी शरद पवारांनी गेल्या पाच वर्षातल्या संपर्काच्या जोरावर समाजवादी पक्षाचे पुन्हा त्याहून अधिक आमदार निवडून आणण्याचा संकल्प केला. राजीव गांधी 404 जागा घेवून आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं. अशा काळात राज्यात देखील कॉंग्रेसच्या विरोधात लढणं हा मुर्खपणाच होता.

या वेळी शरद पवारांनी तिकीट देताना पक्षाच पाच वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिली. गावागावात जावून शरद पवार फिरले असल्याने त्यांनी पक्षाचं काम करणाऱ्या लोकांची यादी पुर्वीच केली होती. पुर्वीच्या नेत्यांना तिकीट न दिल्याने लोकांमध्ये शरद पवारांबद्दल सहानभुती निर्माण झाली.

याचा अपेक्षित परिणाम म्हणजे जेव्हा राज्याचा निकाल लागला तेव्हा. राज्यात समाजवादी कॉंग्रेसचे 54 आमदार निवडून आले होते. कॉंग्रसचे 161 आमदार निवडून आले. आपल्या सहा आमदारांचे शरद पवारांनी या पाच वर्षात 54 आमदार करुन दाखवले होते.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Omkar ghodekar says

    Mla tuzya sarv aaj paryantache status have aahet ,yekach divsat yevdhe vachun nahi hot Ani lakshat pn nahi rahat

Leave A Reply

Your email address will not be published.