त्यादिवशी बेळगावमध्ये पवारांच्या पाठीवर वळ उठेपर्यन्त कर्नाटक पोलीसांनी मारलं… 

पवारांना पोलीसांनी मारलं होतं. तेही त्यांची पाठ काळीनिळी होईपर्यन्त. संपुर्ण माहिती नसणाऱ्यांना ही गोष्ट सहजासहजी पटणं अशक्य वाटतं. काही जणांच असही मत असेल की तेव्हा पवारांचा सुरवातीचा काळ असेल. तर ते देखील चूक. पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवून गेले होते. अशा माणसावर हात उचलण्यात आला होता.

ही गोष्ट कोणती तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची.

संपुर्ण महाराष्ट्र आजही जे स्वप्न पहातोय त्या बेळगाव बिदर कागवाड धारवाडसहित संयुक्त महाराष्ट्राची. सीमावासीय बांधवाच्या लढ्याला आज ६७ वर्ष पुर्ण होत आहेत. आजही बेळगावात काळा दिवस पाळण्यात येत आहे. आजही पोलीसांची दडपशाही सुरू आहे. तिसऱ्या, चौथ्या पिढीकडे या आंदोलनाची सुत्रे आलेत. तरिही हा लढा संपत नाही. जगातले कित्येक मोठ्ठे आंदोलन चिरडून टाकण्यात येत असताना एक लढा मात्र त्यांच जोशात आजही उभा आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कोणी काय केलं विचारून राजकारण करण्याचा हा विषय नाही प्रबोधनकार, एस.एम.जोशी, एन.डी.पाटील यांच्यापासून ते अगदी बाळासाहेब, शरद पवार असा प्रत्येक मोठ्ठा नेता या लढ्यात उभा राहिला आहे.

अशाच एका लढ्यात शरद पवारांना मारहाण झाली होती, त्याचीच ही गोष्ट.. 

१९८०-८१ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी महाराष्ट्रात एक समिती स्थापन करण्यात आली होती. थोर स्वातंत्रसेनानी एस.एम. जोशी यांच्याकडे या समितीच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली होती. 

१९८६ च्या सुमारास कर्नाटकने संपुर्ण कर्नाटकात शालेय अभ्यासक्रमात कन्नड सक्तीचे करण्याची घोषणा केली. सीमाभागात राहणाऱ्या मराठी लोकांना सक्तीने कन्नड शिकवण्यासाठीच हा घाट कर्नाटक सरकारने घातला होता. या विरोधात प्रखर आंदोलन उभा करण्याचं ठरवण्यात आलं. 

समितीची बैठक भरवण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष असणाऱ्या एस.एम.जोशींना आंदोलनाची दिशा ठरवली. एकाच दिवशी प्रखर आंदोलन न उभा करता. आज, उद्या, परवा असे आंदोलन उभा करत न्यायचे असे ठरवण्यात आले.महाराष्ट्रातले नेते बेळगावात जातील आणि रोज नव्या जोषाने आंदोलन उभा राहिल असे ठरवण्यात आले. त्यासाठी पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचे नेतृत्त्व एस.एम जोशींच्या मार्फत शरद पवारांकडे देण्यात आले. 

आंदोलन पेटण्याची चिन्हे कर्नाटक सरकारला दिसताच कर्नाटक सरकारने दडपशाही करण्यास सुरवात केली. महाराष्ट्रातील एकही व्यक्ती सहजासहजी कर्नाटकात येणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर बंदोबस्त ठेवण्यात आला. मुंगी सुद्धा तपास करुनच आत जाईल याची काळजी घेण्यास कर्नाटक सरकारने सुरवात केली. बेळगावात बाहेरच्या माणसाने शिरणं देखील अवघड होवून गेलं. 

अशा वेळी बेळगावात जाणं आणि आंदोलन करण अशक्य होतं. अशा वेळी पवारांना कर्नाटकात प्रवेश करणं अशक्य कोटीतली गोष्ट होती. 

शरद पवार पहिल्यांदा कोल्हापूरात गेले. कोल्हापूरात आपल्या मित्राची एक फियाट गाडी घेतली. पवारांनी इथे एक युक्ती केली. स्वत: वेषांतर करुन त्या गाडीचे ते ड्रायव्हर झाले आणि गाडीच्या ड्रायव्हरला त्यांनी साहेबांचे कपडे घालून पाठीमागे बसवले. आपल्या सोबत त्यांनी बाबासाहेब कुपेकरांना देखील घेतलं. 

ड्रायव्हरच्या वेषात असणारे शरद पवार, पाठीमागे मालकाच्या वेशात बसलेला गाडीचा खराखुरा ड्रायव्हर आणि सहाय्यक म्हणून बाबासाहेब कुपेकर अशा अवस्थेत शरद पवारांची गाडी कर्नाटकच्या सीमेवर आली. पोलीसांनी ड्रायव्हरच्या वेषात असणाऱ्या मालकाची चौकशी केली आणि गाडी सोडून देण्यात आली. 

अगदी बिनबोभाटपणे शरद पवार बेळगावात दाखल झाले.

आत्ता पुढची जबाबदारी होती ती आंदोलन यशस्वी करण्याचे. कर्नाटक सरकारने जमावबंदीचे आदेश दिले होते. एका ठिकाणाहून मोर्चा सुरू झाला असता तर कर्नाटक सरकारने मोर्चा सुरू होण्याअगोदरच सर्वांना अटक केली असती व हे आंदोलन अयशस्वी झाले असते. 

म्हणून १ जून १९८६ च्या सकाळी ११ वाजता सर्व दबा धरून बसलेल्या नागरिकांनी एकाच फटक्यात चौकात जमा व्हायचं अस ठरवण्यात आलं. 

शरद पवारांना अजित खन्नुकर यांनी अरविंद गोगटेंच्या घरी नेलं होतं. दोन दिवसांपासून शरद पवारांचा मुक्काम अरविंद गोगटेंच्या घरीच होता. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत बेळगावात पोहचत होता. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मराठी लोक बेळगावात दाखल झाले होते. 

राणी चन्नमा चौकाच्या जवळवळ वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून सर्वजण अकरा वाजण्याची वाट पहात होते. 

अकरा वाजले आणि पुढच्याच मिनिटाला हजारों लोक चौकात जमू लागले. रस्त्यावर चालणारे लोढेंच्या लोढें पाहून कर्नाटक पोलीस चक्रावून गेले. इतका बंदोबस्त लावला असताना देखील ही माणसं कुठून आली हा एकच प्रश्न होता. पोलींसाची अब्रु चव्हाट्यावर मांडणारा हा विषय होता. साहजिक पोलीस संतापले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यास सुरवात केली. अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या लाठीहल्यातून शरद पवार देखील वाचू शकले नाहीत, त्यांच्यासह उपस्थित असणाऱ्या बाबासाहेब कुपेकर, एच.डी पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली. पोलीसांनी जादा कुमक मागवून या शरद पवारांना व साथीदारांना जेरबंद केलं. 

तिथून पुढे पवारांना ताब्यात घेवून बेळगावपासून २०-२५ किलोमीटवर असणाऱ्या हिडकल डॅमच्या रेस्टहाऊसवर घेवून जाण्यात आलं. कर्नाटक पोलीसांनी सर्वांवर खटले भरण्याची तयारी सुरू केली. पवारांना पहिला प्रश्न विचारण्यात आला तूम्ही बेळगावात कुठे राहिला होता? 

पवारांनी कर्नाटकचे तत्कालीन मंत्री बी. शंकरानंद यांचे नाव ठोकून दिले. बेळगावात शरद पवारांवर पोलीसांनी केलेल्या हल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्ठा जमाव हिडकल डॅमच्या परिसरात गोळा होवू लागला.महाराष्ट्रात ही बातमी एस.एम. जोशींना समजली आणि त्या वयात एस.एम.जोशी पत्रकारांना सोबत घेवूनच बेळगावात दाखल झाले. पत्रकार सोबत असल्याने आत्ता पोलिसांना थेट कारवाई करणे अवघड होवून बसले होते. 

एस. एम.जोशींनी हिडकल डॅमच्या रेस्टहाऊसला आले. तिथे पवारांची भेट घेतली. पवारांना त्यांनी जवळ बोलवले आणि शर्ट काढायला लावलां. शरद पवारांचे पाठीवरचे वळ पाहून एस.एम. जोशी देखील हळहळले.

ही आठवण सांगताना शरद पवार सांगतात, 

माझ्या पाठीवर लाठ्यांच्या प्रहारांमुळं उमटलेले वळ बघून ते प्रचंड भावनाविवश झाले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले! अत्यंत मायेनं त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी संघर्ष केलेल्या, अनेक अन्यायांना सामोऱ्या गेलेल्या एसेम यांच्यासारख्या अशा ऋषितुल्य नेत्याचं एक वेगळं रूप त्या दिवशी मला अनुभवायला मिळालं. सहृदयी, सहकाऱ्यांवर व कार्यकर्त्यांवर कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तीसारखं प्रेम करणारा, आम्ही भोगलेल्या यातना आपल्याशा करणारा संवेदनशील नेता. चळवळीशी एवढा एकरूप झालेला माणूस मी क्वचितच पाहिला आहे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.