चूर्णाला रामराम करून पुण्याचा शारंगधर ग्लोबल आयुर्वेदिक ब्रँड बनला.

अस म्हणतात की येणारं युग हे आयुर्वेद सारख्या नैसर्गिक औषधांच असणार आहे. हजारो वर्षांचे भारतीय ज्ञानशास्त्र सध्या अनेकांना आकर्षित करून घेत आहेत. अनेक भारतीय आयुर्वेदीक कंपन्या जगाच्या मार्केट नुसार स्वतःमध्ये बदल करून ग्लोबल होत आहेत.

पण पुण्याची शारंगधर फार्मास्युटिकल ३०वर्षांपासून जगात ओळखला जाणारा ब्रँड आहे.

शारंगधरची सुरवात केली डॉ.जयंत अभ्यंकर यांनी पण ही संकल्पना मूळ त्यांच्या वडिलांची.

त्यांचे आई वडील दोघेही आयुर्वेदिक करणारे डॉक्टर होते. पुण्यात त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस तशी चांगली सुरू होती. स्वतःचा आयुर्वेदिक औषधांचा उद्योग सुरू करायच त्यांच स्वप्न होतं.

काही वर्षांपूर्वी जयंत यांच्या वडिलांनी पुण्याच्या आयुर्वेदिक रसशाळेत प्रोडक्शनच काम पाहिलं होतं, त्याचा अनुभव सुद्धा होता. पण दोन्ही मुले वैद्यकीय व्यवसायाच्या अगदी दूर. मोठा मुकुंद सीए तर धाकटा जयंत भौतिकशास्त्रात पदवी घेऊन पुढे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर.

जयंत यांना सुद्धा आयुर्वेदात रस होता पण डॉक्टरी करायची नव्हती.

वडिलांची औषध तयार करणारी कंपनी सुरू करायची कल्पना त्यांना खूप आवडली. पण या साठी आयुर्वेदाचे ज्ञान घ्यावेच लागणार होते.

जयंत अभ्यंकर यांनी अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला.

त्याच वर्षी त्यांच्या वडिलांनी आपल्या घरातच सातशे फूट जागेत औषधांचे उत्पादन सुरू केले. जयंत अभ्यंकर आयुर्वेदिक डॉक्टर बनत होते मात्र त्यांचं इंजिनियरिंग विचार करण्याची पद्धत शाबूत होती.

आयुर्वेदातील काढे, चूर्ण हे गुणकारी असले तरी ते खाण्यासाठी सोयीचे नसतात. म्हणून अलोपॅथीच्या स्पर्धेत आयुर्वेद काहीसा मागे पडतो. जयंत यांनी त्यावर उपाय शोधून काढला,

आयुर्वेदिक औषधांचे टॅब्लेट्स बनवायचे.

ही अभिनव संकल्पना प्रचंड हिट ठरली. अगदी चार पाच वर्षात अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक आयुर्वेदिक दुकानात शारंगधरची औषधे मिळू लागली. एकेकाळी फक्त पुण्यात मिळणाऱ्या या औषधाला गुजरात, ओडिशा, मध्यप्रदेश, कर्नाटक येथूनही मागणी येऊ लागली.

शारंगधरचं पुढचं टार्गेट ग्लोबल होण्याचं होतं.

जयंत यांनी प्रचंड प्रयत्न करून जपानमधून एक ऑर्डर आणली. एअर इंडियाच्या विमानातून ही ऑर्डर जपानच्या ओसाकाला पाठवायचं होतं पण नेमकं तेव्हा एयर इंडियाचा संप सुरू झाला.

अभ्यंकर यांनी कसंबसं कॅथे पॅसिफिक या विमानाने आपली ऑर्डर पाठवली.

पण दुर्दैवाने दोन दिवस उशीर झाला. भारतीय प्रमाणवेळेनुसार याला उशीर म्हणत नाहीत पण जपानी कंपनीने अभ्यंकर यांना दीड लाखांचा दंड केला. खरं तर शारंगधरची यात कोणतीही चूक नव्हती, आपला माल त्यांनी वेळेत पाठवून दिला होता.

पण तरीही अभ्यंकर यांनी दंड भरला. त्यावेळी त्यांच्या साठी ही रक्कम खूप मोठी होती पण या वागण्याने त्यांनी जपानमध्ये भारतीय निर्यातदारांबद्दलचे गैरसमज मोडून काढले.

ती जापनीज कंपनी शारंगधरशी विश्वासाने जोडली गेली.

आज गेली तीस वर्षे जपान अमेरिकेसारख्या खडूस देशात कोणतेही विघ्न न येता शारंगधरची निर्यात जोरात सुरू आहे.

ते वर्ष होतं १९९१. भारतात जागतिकीकरणाने नुकताच प्रवेश केला होता. पण त्याच्या आधीच शारंगधर ग्लोबल झाला होता.

घरातल्या एका छोट्या खोलीत सुरू झालेली ही कंपनी आता कोंढाव्याला एका वीस हजार चौरस फुटांच्या कारखान्यात औषधांचे उत्पादन घेते.

अजूनही वेगवेगळे प्रयोग करून सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेदिक औषधे पोहचवण्याचा डॉ. जयंत अभ्यंकर यांचा प्रयत्न असतो.

आयुर्वेद औषधांमध्ये ‘एक्सपायरी डेट’ ही संकल्पना आणण्याचा मान त्यांनाच दिला जातो.

‘आयुर्वेदिक औषधे जेवढी जुनी तेवढी चांगली,’ अस मानलं जातं मात्र हे हा नियम सर्वच आयुर्वेदिक औषधांना लागू होत नाही, त्यामुळे ‘एक्सपायरी’ छापणे गरजेचे आहे, असा त्यांचा विचार होता.

शारंगधरला ग्लोबल ब्रँड बनवण्यामागे डॉ.जयंत अभ्यंकर यांनी मार्केटिंगसाठी घेतलेली मेहनत सुद्धा कारणीभूत आहे.

जर क्वालिटी असेल तर मार्केटिंगची गरज नाही हा पुणेरी विचार त्यांनी मागे टाकला होता. आयुर्वेदाची प्रदर्शने, रुग्णांना मार्गदर्शन करणारी वर्तमानपत्रातील घरचा वैद्य ही पुरवणी, साध्या आजारावर टेलिफोनवरून सल्ला देणारी ‘हेल्थलाईन’ सेवा अशा अनेक कल्पक योजना त्यांनी मार्केटिंग साठी आखल्या ज्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. शारंगधर’चे पुण्यात तीन दवाखाने आणि पंचकर्म केंद्रही आहे.

औषधांसाठी चांगला कच्चा माल मिळावा म्हणून त्यांनी चाळीस शेतकऱ्यांशी थेट करार केले आहेत.

शारंगधरकडून त्यांना आयुर्वेदिक वनस्पती, बी बियाणे पुरवली जातात, बदल्यात खात्रीचा गुणवत्तापूर्ण कच्चा माल त्यांना मिळतो.

टीव्हीवर राहुल सोलापूरकर यांची शारंगधर सुखसारख वटीची जाहिरात आपण नेहमी पाहतो. चूर्णाला रामराम करून आयुर्वेदाला आधुनिक बनवणारे शारंगधर ब्रँड आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.