एका रुपायासाठी शरद पवारांची चाणक्यनिती पणाला लागली होती

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. महाराष्ट्रात तेव्हा कॉंग्रेसच सरकार होतं. शरद पवार मुख्यमंत्री होते. पवारांची सलग दुसरी टर्म होती. नुकताच झालेल्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसला विजयी करून आणल होतं.

विधानसभेत कॉंग्रेसचे १४१ आमदार होते. पण त्यावेळच्या विधानसभेची खासियत म्हणजे पहिल्यांदाच शिवसेनेने ५२ आमदार निवडणून आणून जोरदार मुसंडी मारली होती.

बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली होती. अनेक आमदार नवीन होते. तरी शिवसेनेच्या वाघांच्या डरकाळीने विधानसभा थरारत होती. नेहमीपेक्षा आक्रमक विरोधी पक्ष महाराष्ट्राला पाहायला मिळत होता.

अशाच शिवसेनेच्या आक्रमकतेचा किस्सा माजी मंत्री सुभाष देसाई यांनी एकेठिकाणी सांगितला आहे.

तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं. अर्थमंत्र्यांनी राज्याचं बजेट मांडल्यावर त्यावर चर्चा सुरु होती. दुपारची वेळ असावी. सभागृहात आमदारांच प्रमाण कमी होतं. अर्थसंकल्पावरच्या गंभीर चर्चा अनेकदा कन्टाळवाण्या असतात यामुळे बरेच आमदार सभागृहातून बाहेर वगैरे फिरत असावेत. यात कॉंग्रेसच्या आमदारांच प्रमाण जास्त होतं.

ही संधी आहे हे शिवसेनेचे बीडचे तरुण आमदार सुरेश नवले यांच्या लक्षात आलं. त्यांनी आयडिया लढवली. अवघ्या १ रुपया कपातीचा प्रस्ताव मांडला. जर हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला तर सरकार कोसळणार होते.

गाफील असलेले शरद पवारांचे सरकार अचानक हादरले. एकएक आमदार धरून आणायला धावाधाव सुरु झाली. इकडे शिवसेनेच्या मनोहर जोशींनी भाजप, जनता दल अशा पक्षांची मोट बांधून मोर्चाबांधणी केली होती. शिवसेनेचे पक्ष प्रतोद असणाऱ्या सुभाष देसाई आणि गजानन कीर्तीकर यांनी विरोधी बाकावरील आमदारांचा गड समर्थपणे सांभाळला होता.

आता फक्त मतदान घेणे बाकी होतं.

१४१ आमदारांच बहुमत असणारे शरद पवार चांगलेच अडचणीत आले होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील सगळी चाणक्यनीति पणास लावली होती. पण शिवसेनेच्या डावावर उपाय त्यांना सापडत नव्हता. फक्त १ रुपया कपाती पायी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाण्याची नामुष्की सहन करावी लागेल की या विचाराने त्यांना घाम फुटला होता.

शिवसेना आमदारांनी सभापतींकडे मतदानाची मागणी केली. जोरदार गोंधळ सुरु झाला. सत्ताधारी बाकांवर जेव्हढे आमदार असतील त्यांनी व विरोधी बाकांवरच्या आमदारांची खडाजंगी सुरु झाली. पीठासीन अधिकारी असलेल्या मधुकरराव चौधरी यांनी काहीही ऐकू येत नाही या कारणाने सभा तहकूब केली. शिवसेनेचे आमदार मतदान घ्या मतदान घ्या म्हणून ओरडत राहिले पण सभापतीनां ते ऐकूच गेले नाही.

सुभाष देसाई म्हणतात,

“त्या दिवशी मतदान न घेऊन सभापतींनी पवारांचं सरकार वाचवले. पण या तासाभराच्या नाट्यात मुख्यमंत्री शरद पवारांची जी धावपळ उडालेली पाहिली ती परत अनुभवायला मिळाली नाही.”

या सगळ्या नाट्यास कारणीभूत ठरलेले सुरेश नवले सलग दोन वेळा बीड मधून आमदार बनले. पुढे युतीच सरकार आल्यावर त्यांना आरोग्य राज्यमंत्री मिळाले. २००३ साली मात्र नारायण राणेंच्या सोबत त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.