स्थानिक मुस्लिमांमुळे पाकव्याप्त काश्मीरमधल्या हिंदू मंदिराची यात्रा सुरु होतीय…

आपल्या भारतात अनेक मंदिरं आहेत. प्रत्येकाचा इतिहास वेगळा, प्रत्येकाची बांधकाम शैली वेगळी, प्रवेशाचे नियम वेगळे आणि पूजा करण्याची पद्धतही वेगळी. भारतातल्या मंदिरांची विविधता ही निश्चितच डोळे दिपवणारी आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातही अनेक हिंदू मंदिरं आहेत. साहजिकच याचं कारण म्हणजे, फाळणीआधी पाकिस्तान भारतातच होतं.

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांचा विध्वंस झाल्याच्या बातम्या अध्येमध्ये कानावर येत असतात, मात्र हिंदू मंदिरांचं रक्षण केल्याच्या किंवा पाकिस्तानात हिंदू सण साजरे झाल्याच्या बातम्याही दुर्लक्षून चालणार नाहीत. भारतातल्या नागरिकांना मात्र पाकिस्तानात देवदर्शनासाठी जाता येत नाही. मात्र आता यात बदल होऊ शकतोय.

पाकिस्तानात एक मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक इतिहास असलेलं मंदीर आहे. तेही ज्ञानाची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वतीचं. सरस्वतीला काश्मीरमध्ये शारदा म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात ख्रिस्तपूर्व २७३ मध्ये इथे विद्यापीठाची स्थापना झाली. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांपेक्षाही हे विद्यापीठ प्राचीन होतं. असंही मानलं जातं की, कुशान्सच्या काळात पहिल्या शतकात हे विद्यापीठ बांधलं गेलं.

भारत आणि पाकिस्तानमधली नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोलपासून हे मंदिर जवळ आहे. पाकव्याप्त काश्मीरमधलं हे मंदिर कुपवाडापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आहे. या विद्यापीठात पाणिनी आणि इतर पंडितांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आणि साहित्यसंपदेचा अभ्यास केला जायचा. जवळपास पाच हजार विद्यार्थी इथे शिकले असंही म्हणलं जातं.

या स्थानाचं आणखी एक महत्त्व म्हणजे, हिंदू धर्मग्रंथांमध्ये असलेल्या उल्लेखाप्रमाणं शंकराने आपली पत्नी सती जळत असतानाच तिला घेऊन प्रयाण केले होते. यावेळी सतीच्या शरीराचे काही भाग पृथ्वीवर पडले आणि त्या भागांना आता शक्तीपीठं म्हणून ओळखलं जातं. पाकव्याप्त काश्मीरमधल्या या मंदिरालाही शक्तीपीठ मानलं जातं. म्हणूनच याला शारदा पीठ असंही नाव पडलं.

महाराजा प्रताप सिंह आणि रणबीर सिंह यांच्या काळात इथली यात्राही प्रसिद्ध झाली होती. मात्र १९४७ मध्ये फाळणी झाली आणि शारदा पीठ पाकिस्तानात गेलं. साहजिकच यात्राही बंद पडली. त्यानंतर, मंदिराकडेही फारसं लक्ष दिलं गेलं नाही. सध्या शारदेचं हे पीठ तुलनेनं सुस्थितीत असलं, तरी तिथलं छप्पर आणि दरवाजा गायब आहे.

काही वर्षांपूर्वी या ठिकाणाला अतिक्रमणांनी विळखा घातला होता. तेव्हा टिटवल भागातल्या मुस्लिमांनी शारदा यात्रेच्या तळाची जुनी जागा शोधून काढली. त्यात भराव टाकण्यासही मदत केली, सोबतच शारदा पीठ बचाव समितीशीही त्यांनी संपर्क साधला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळं पाकिस्तानमधल्या न्यायालयानं शारदा पीठ भागातली अतिक्रमण रोखण्याचा आदेश देत, हिंदू धर्मियांसाठीचं हे पवित्र स्थळ तिथल्या पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली आणलं आहे.

शीख बांधवांसाठी नुकतंच कर्तारपूर कॉरिडॉर खुलं झालं. त्याच धर्तीवर शारदा पीठ कॉरिडॉर सुरू करावं अशी मागणी आता केली जात आहे. शारदा पीठ बचाव समितीचे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी पुढाकार घेऊन भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या दारक्सान अन्द्राबी यांच्या हस्ते नियंत्रण रेषेवर शिलान्यासही केला. पंडिता यांनी दोन्ही बाजूच्या लोकांची समावेश असलेली समितीही स्थापन केली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे शारदा पीठ यात्रेसाठी भाविकांना जात येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नुकताच कर्तारपूर कॉरिडॉरही खुला झालेला असल्यानं, त्याच धर्तीवर शारदा पीठ कॉरिडॉर खुला झाला, तर हिंदू धर्मीय पाकव्याप्त काश्मीरमधल्या शक्तीपिठाचं दर्शन घ्यायला नक्कीच उत्सुक असतील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.