लोकांना गंडवणाऱ्या आधुनिक शिक्षण सम्राटाची जाहिरात शाहरुखला महागात पडली होती..

स्वतःला किंग खान म्हणवणाऱ्या शाहरुख खानचा सध्या ग्रह फिरले आहेत असं म्हणतात. याला कारण ठरला आहे त्याचा लाडका मुलगा आर्यन खान. मागच्या आठवड्यात आर्यनला एका क्रूझवर ड्रग्जची पार्टी करताना एनसीबीने पकडले आणि संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. आरत्यांच्या बाबतीत सकृत्दर्शनी पुरावे मिळल्यामुळे त्याला अटक सुद्धा झाली.

शाहरुखच्या वैयक्तिक जीवनात आलेलं संकट त्याच्या प्रोफेशनल लाईफवर देखील परिणाम करत आहे. कारण ठरलं आहे बायजू नावाचं ऍप्लिकेशन. 

हे ऍप विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते पण शिक्षणाशी संबंधित असलेल्या या ऍपवर शाहरुखने येऊन ज्ञान पाजळणे पब्लिकला रुचलेलं नाही. विशेषतः आर्यन खान प्रकरणानंतर त्याची जाहिरात बंद करावी या मागणीने जोर पकडला आहे. बायजु चा ब्रँड अँबेसेडर असलेल्या शाहरुखच यामुळे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

पण हि पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील शाहरुखने एक शिक्षण क्षेत्रासाठीच जाहिरात केली होती आणि त्याबद्दलच्या केसेस अजूनही सुरु आहेत.   

अलिशान विद्यापीठाचा कॅम्पस, तिथे laptop घेऊन सुटाबुटात हसतखिदळत गप्पा मारत असलेले एकदम चिकने स्टुडंट, एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या तोंडात मारेल असे क्लास रूम, तिथे शिकवणारे तसेच चिकने मास्तर मास्तरनी. युनिव्हर्सिटीतच स्विमिंग पूलपासून ते बास्केटबॉल ग्राउंड पर्यंत सगळी सुविधा.

हे करण जोहरच्या पिक्चरच नाही तर दहा वर्षापूर्वी टीव्हीवर पेपर मध्ये झळकणाऱ्या जाहिराती बद्दल सांगतोय. या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट (IIPM)या अलिशान कॉलेजची स्वप्न दाखवलेली एका आधुनिक शिक्षण सम्राटाने,

त्याचं नाव “अरिंदम चौधरी”

अरिंदम चौधरी साधा सुद्धा शिक्षण सम्राट नव्हता तर तो एक ब्रांड होता. उंची कपडे, त्याची ती लांब बांधलेली पोनीटेल, तोंडभर पसरलेलं स्माईल यांनी त्याला यंग बिलीनीयर, मॅनेजमेंट गुरु, मोटिव्हेशनल स्पिकर, नशनल अवार्ड विनिंग फिल्म प्रोड्युसर, शाहरुख खानचा जिगरी अशी विविध प्रकारची ओळख मिळवून दिली होती.

एक काळ अरिंदमने गाजवला आणि अचानक तो गायब झाला. कुठल्याही गोष्टी अचानक होत नाहीत. त्यामागे देखील मोठा इतिहास असतो. अरिंदम आणि त्याच्या IIPM ला देखील आहे.

अरिंदम हा फक्त शिक्षण सम्राट नाही तर घराणेशाहीचा वारसदार आहे. त्याचे वडील म्हणजे मलयेन्द्रदास चौधरी यांनी नवी दिल्लीत १९७३ साली या IIPM या इंस्टीट्यूटची स्थापना केली. त्याचे वडील धूर्त होते. आयआयटी, आयआयएम या सरकारी विद्यालयांची तेव्हा चलती होती. तशीच आपली देखील हवा व्हावी म्हणून त्यांनी आपल्या इंस्टीट्यूटचं नाव आयआयपीएम असं दिलं.

त्यांच्या या मुलाला म्हणजेच अरिंदमला अमेरिकेत जाऊन शिकायची इच्छा होती.

बाप म्हणाला घरचं कॉलेज असताना बाहेर जाऊन पैसे खर्च करायची काय गरज?

पोराला गंडवणारा हा पहिला बाप असेल. अरिंदमचं शिक्षण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आयआयपीएम मध्येच झालं.

ते वर्ष १९९२. भारतात डॉ.मनमोहन सिंग यांच जागतिकीकरण लागू झालं होतं. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला होता. दूरदर्शन जाऊन केबल टीव्ही सुरु झाला. प्रत्येक गोष्ट ब्रँडेड पाहिजे म्हणून अनेकांचा आग्रह सुरु झाला.

अरिंदमची  IIPM Centre for Economic Research and Advanced Studies या संस्थेच्या डीनपदी निवड झाली. पण पोरग चालूपणात बापाच्याही दोन पावले पुढ होतं. त्याने एकापाठोपाठ एक उद्योग करण्यास सुरवात केली.

सगळ्यात आधी त्यांनी एक फर्म लोकांना नोकरी लावून देणारी फर्म सुरु केली. आपले ऑक्सफर्ड टाईप इंग्लिश, थोबाड भरून स्माईल आणि गोड गोड बोलणे यामुळे त्याने अनेकांना यात अडकवले. आणि इथून त्याला लक्षात आले की

भारत हा नोकरी साठी हपापलेल्या लोकांचा देश आहे. इथून त्याने लोकांना स्वप्ने विकायचा धंदा सुरु केला.

बघता बघता दोन हजार साल उजाडले होते. सॉफ्टवेअर बूम भारतात पोहचले होते,

कंप्युटर इंजिनियरिंग, एमबीए, बीबीए, बीसीए वगैरे वगैरेच्या कुत्र्याच्या छत्र्या जागोजागी उभ्या राहू लागल्या. प्रत्येकाला ऐटीत आयटीमध्ये नोकरी करायची होती. आखीव रेखीव flat मधलं पुण्या मुंबई च जीवन जगायचं होतं.

भारतीयांना मोटिव्हेशनल स्पिकर या नव्याने उदयास आलेल्या कीर्तनकारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायची घाण सवय आहे. अरिंदम चौधरीने याचा फायदा उठवला. त्याची भाषणे शाळा कॉलेज मध्ये होऊ लागली. मोठे मोठे सुविचार टाकून तो बोलू लागला, स्वतःच्या यशाच्या, आपल्या इंस्टीट्यूटच्या गप्पा हाणू लागला.

त्याच्या जाळ्यात लोक अडकू लागले. खुद्द शाहरुख खान सोबत तो दिसतोय, पेपर मध्ये पान भरून त्याची जाहिरात असते म्हणजे तो कोण तरी भारीच असणार असंच सगळ्यांच म्हणणं होतं.

शिवाय डिग्री फॉरेनची भेटणार हे आमिष वेगळच !

इथून सुरु झाला राडा. अरिंदम चौधरी नावाच्या या सेल्समनने आपलं आयआयपीएम भारतीय जनतेच्या गळ्यात बांधलं.

फक्त एवढ करून तो थांबला नाही. अरिंदमने अनेक एजंट नेमले. २५ विद्यार्थी घेऊन येणाऱ्या एजंटला प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७५ हजार रुपये कमिशन. त्याहून जास्त विद्यार्थी आणणाऱ्या एजंटला ९० हजार रुपये.

शिक्षणाचा बाजार काय असतो ते या वरून कळत होतं. फक्त शिक्षणाचा बाजार नाही तर सिनेमाचा बाजार, एचआर कंपनीचा बाजार, भाषणाचा बाजार, पुस्तक पब्लिकेशनचा बाजार या सगळ्यात अरिंदम उतरला होता. तो खोऱ्याने पैसे छापतोय हे देखील कळत होतं. मोठमोठ्या टीव्ही चॅनेलवर त्याच्या मुलाखती झळकत होत्या. बिझनेस मगझीनच्या कव्हर पेजवर त्याचे हसरे फोटो होते. दिग्गज नेते त्याच्या सोबत दिसायचे. कालिदास अवार्ड वगैरे पुरस्कार त्याला मिळाले होते.

लोकांना गंडवण्याचे मॅनेजमेंट स्कील यात त्याचा हात कोणी धरु शकत नव्हता. अधिकाऱ्यांच्या पासून ते कायद्यापर्यंत प्रत्येकजन मॅनेज होऊ शकतो हे सूत्र त्याला सापडलं होतं.

पण एवढ करत होता म्हटल्यावर कुछ तो गडबड है चा वास पत्रकारांना आल्या शिवाय राहणार नाही. सगळ्यांना एकत्र कोणी विकत घेऊ शकत नाही. असच झालं. दबक्या आवाजात त्याच्या विरुद्ध चर्चा सुरु झाल्या. झाकपाक कार्यक्रम घेऊन तो डिग्र्या वाटतोय त्याची बाजारात शून्य रुपये किंमत आहे अस म्हटल जात होतं. पण जो कोणी आवाज काढेल त्याच्या विरुद्ध अरिंदम मोठी केस टाकायचा.

गाढवाच्या नादी कोण लागणार म्हणून शहाणे गप्प बसत होते. त्याच्या IIPM इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेणारे असंही तसंही मोठे सायंटिस्ट होणारे नव्हते, ज्याला इतर कुठे प्रवेश मिळत नाही, घरात दोन नम्बरचे पैसे भरपूर आहेत अशीच मुले तिथून पास आउट होत होती.

त्यांनी मारलेली बोंब ऐकायलाही जगाला वेळ नव्हता.

२००३ साली आउटलुक मासिकाने या इंस्टीट्यूटला भारतात चौथे स्थान दिले. त्यावेळी काहीजणांनी दंगा केला. तेव्हा आउटलुकला जाहीर कराव लागल कि आम्हाला IIPMच्या प्लेसमेंट बद्दल मिळालेली माहिती चुकीची होती, त्यांचे पब्लिशर महेश्वर पेरी यांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी अरिंदम चौधरीची माहिती खणून काढण्यास सुरवात केली.

त्यांनी IIPM इंस्टीट्यूटकडे १००% प्लेसमेंटचे पुरावे मागितले. अरिंदम म्हणाला आमच्या पॉलिसीमध्ये हे बसत नाही.

एवढा सगळा गोंधळ सुरु होता पण IIPM च्या विद्यार्थ्यांचा ओघ कमी होत नव्हता.

२००८ साली आयआयपीएमने २०८ कोटी उत्पन्न कमवलं, तर त्यातले चक्क १२० कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले. यात शाहरुख सारख्या सेलिब्रिटीचा समावेश होता.

२००९ साली देहरादून मधल्या विद्यार्थ्यांना जाग आली. त्यांनी आंदोलन सुरु केलं. उत्तराखंड सरकारने अरिंदम चौधरीला नोटीस पाठवली. त्याने उलट उतर दिल कि आमची डिग्री भारतातली नाहीच आम्ही बेल्जियमची डिग्री विद्यार्थ्यांना देतो.

पुढे महेश्वर पेरी यांनी त्याला तुमचे इंस्टीट्यूट बेल्जियमची डिग्री देते हे सिद्ध करा म्हणून सांगितलं तर तो तेही देऊ शकला नाही. बेल्जियम नाही तर बकिंगहम विद्यापीठाची डिग्री आमच्या विद्यार्थ्यांना देतो अस तो सांगू लागला. ते देखील फेक आहे असं समोर आलं.

अरिंदम भडकला, महेश्वर पेरीला खुले आम धमक्या देऊ लागला. त्यांच्यावर मानहानीचे केस टाकू लागला. सरकारतर्फे देखील काही नेते मदतीला धावून येत होते. २०१३ साली अरिंदम चौधरीच्या विरोधात इंटरनेटवर जे लिखाण होत आहे ते डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशन्सने थेट डीलीट करून टाकले.

इतके होऊन हि व्यवस्थेचा निगरगट्टपणा भयंकर होता.

या सगळ्याची अखेर २०१४ साली झाली. थेट युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने (युजीसी)ने IIPM ला आमची मान्यता नाही याचा खुलासा केला. तिथून अरिंदम चौधरीचे दिवस फिरले.

कोर्टाने IIPM ला आदेश दिला कि त्यांनी आम्ही बीबीएम, एमबीएचे कॉलेज चालवतो, फॉरेनची डिग्री देतो वगैरे सगळा खेळ बंद करावा आणि आपल्या वेबसाईटवर थेट उल्लेख करावा की आमच्या संस्थेला कोणत्याही वैधानिक ऑथोरिटीची मान्यता नाही. थोडक्यात काय तर आता तुमचा बाजार गुंडाळा.

अगदी तसच घडलं.  IIPM चे देशभरातल्या कम्पसला कुलुपं लागली. अनेक पालकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर केसेस ठोकल्या आहेत, यातील अनेक केस अजूनही चालू आहेत.

फक्त अरिंदम चौधरीवरच नाही तर शाहरुख खानवर अनेक केसेस टाकण्यात आल्या आहेत. पब्लिकचं म्हणणं आहे कि शाहरुखची जाहिरात बघून आम्ही या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेतलं. या सगळ्या प्रकरणात शाहरुख सुद्धा तितकाच दोषी आहे. त्याची सुध्दा चौकशी झाली पाहिजे.

 एका वकिलाने तर शाहरुखचा सीबीआय तपास झाला पाहिजे म्हणून मागणी केलीय. 

शिक्षण सम्राट मॅनेजमेंट गुरु, फिल्म प्रोड्युसर, लेखक, मोटिव्हेशनल स्पिकर अरिंदम चौधरीच्या थोबाडावरच स्माईल गायब झालं, मिडीयाच्या चर्चेतून तो देखील गायब झाला. आता तर काय गेल्या काही महिन्यांपासून तो जेल मध्येच आहे. पापाचा घडा उशिरा का होईना भरतोच असे म्हणतात. अरिंदम चौधरीकडे बघून तरी हे पटते.

त्याच्या पापात सहभागी झाल्यामुळे आजही शाहरुख सुद्धा कोर्टाच्या चकरा मारतोय हे नक्की .

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.