चिडलेला शशी कपूर शबानाला म्हणाला, ‘याचा विचार हिरॉईन बनण्यापूर्वीच करायचा होता’

१९७५ साली जेंव्हा दिग्दर्शक सी पी दीक्षित यांनी जेव्हा शबाना आजमी ला ‘फकीरा’ या चित्रपटासाठी साइन केलं; त्यावेळी तिला खूप आनंद झाला. कारण तिच्यासाठी हा पहिला कमर्शियल सिनेमा होता.

त्यापूर्वी ती शाम बेनेगल यांच्या आर्ट फिल्ममधून प्रेक्षकांच्या समोर आली होती. नवकेतनच्या ‘इश्क इश्क इश्क’ मध्ये तिची भूमिका होती पण फारशी गाजली नाही. त्यामुळे ‘फकिरा’ हाच तिच्यासाठी पहिला कमर्शियल सिनेमा होता.

याच कारणाने  हा सिनेमा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. शबानाचा ‘आनंद’ त्या वेळी आणखी द्विगुणीत झाला ज्या वेळी सी. पी. दिक्षित यांनी तिला सांगितले, “या चित्रपटात तुझा नायक शशी कपूर आहे!” 

शबाना आजमी शशी कपूरची खूप मोठी फॅन होती. कॉलेजमध्ये असताना ती आपल्या पॉकेटमनी मधून काही पैसे वाचवून त्या पैशातून शशी कपूरचे फोटो असलेली मासिकं विकत घेत असे आणि पृथ्वी थिएटर मध्ये जाऊन त्यावर शशीची सही घेत असे!

‘फकीरा’ हा चित्रपट शबाना आजमीसाठी पहिला व्यावसायिक चित्रपट असला तरी या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान ती खूपच घाबरली होती. अक्षरशः सिनेमा सोडून द्यावा की काय या निर्णयापर्यंत ती आली होती. कारण कलात्मक सिनेमाच्या तुलनेत व्यावसायिक सिनेमाची गणितं खूपच वेगळी असतात. 

इथे नायक, नायिकांना आम पब्लिकवर छाप पाडायची असते. त्यांच्या पसंतीला उतरेल असा अभिनय करायचा असतो. शबानाची तोपर्यंतची कला प्रांतातील मुशाफिरी समांतर सिनेमा आणि थिएटर इतकीच होती. व्यावसायिक सिनेमातील नटीला अनेक गोष्टी याव्या लागतात. त्यातूनच हे प्रकरण घडले. 

काय होता हा किस्सा?

तर ‘फकीरा’ या सिनेमामध्ये एक गाणं होतं. ‘आधी सच्ची आधी झुटी तेरी प्रेम कहानी’ या गाण्याचं चित्रीकरण चालू होतं. यावेळी नृत्य दिग्दर्शक सत्यनारायण यांनी शबानाला काही स्टेप्स सांगितल्या आणि त्यानुसार नृत्याभिनय करायला सांगितला.

शबाना डान्स करण्यामध्ये एकदम कच्ची होती. तिने नृत्य हा प्रकार उभ्या आयुष्यात कधीच शिकला नव्हता आणि केलाही नव्हता. त्यामुळे ‘नाच’ म्हटलं की तिच्या पोटात गोळा येत असे. 

इथे सेटवर नेमकं तेच झालं. सत्यनारायण तिला वारंवार स्टेप्स समजून सांगत होते आणि प्रत्येक वेळेला ती चुकत होती. सहकलाकार देखील वैतागत होते. कोरीयोग्राफर सत्यनारायण तर डोक्याला हात लावून बसले होते. दिग्दर्शकालाही काय करावं कळत नव्हतं. सर्व शूटिंग खोळंबलं होतं. 

शबानाला काही केल्या स्टेप्स जमत नव्हत्या. शेवटी आपल्यामुळे शूटिंगला उशीर होत आहे म्हणून शबानाला दुःख अनावर झालं आणि ती आपल्या मेकअप रूममध्ये रडत रडत गेली आणि तिथे जोरात हुंदके देऊन रडू लागली.

या गाण्यांमध्ये तिच्यासोबत शशी कपूर देखील होता तो देखील सेटवर उपस्थित होता. तो तिच्या पाठोपाठ तिच्या मेकअप रूम मध्ये गेला. ती दार बंद करून रडत होती. शशि कपूरने तिला पहिल्यांदा दार उघडायला सांगितले. शशिला पाहून ती आणखी जोर जोरात रडू लागली आणि “ मी नृत्य करू शकणार नाही, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो आहे मीच याला जबाबदार आहे!” असे म्हणून ती अधिक जास्त गोंधळ घालू लागली. 

त्यावर शशी कपूर भयंकर चिडला आणि रागात म्हणाला, “याचा विचार तू हिरोइन बनतानाच करायला हवा होतास. आता रडून काय फायदा? त्यावेळी काय डोकं गहाण ठेवलं होतं का?”  सुरुवातीला  शबानाला वाटले शशी कपूर हळुवार तिची समजूत काढेल. पण इथे प्रकार उलटाच झाला.

शशी कपूरच्या रागाचा पारा वाढतच होता आणि तो म्हणाला, “ते काही नाही, डोके शांत ठेव , आधी डोळे पूस, डोन्ट क्राय. डोन्ट डिस्टर्ब एनी वन. लगेच सेटवर ये, आपल्याला गाणं शूट करायचा आहे!” 

शबाना एकदम शांत झाली तिच्या तोंडाला जणू कुलूपच लागले. मग शशी कपूर रूमच्या बाहेरून जाताना दारातून म्हणाला, “मला खात्री आहे तुला डान्स करता येईल. यु कॅन डू इट” 

शशीच्या या ट्रीटमेंटमुळे शबानामध्ये आमुलाग्र बदल झाला आणि तिने डोळे पुसले. तिच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. ‘मी डांस करू शकते’ अशी जाणीव तिच्यामध्ये जागृत झाली आणि ती सेटवर आली.

पुढे ते गाणं व्यवस्थित शूट झालं. या प्रसंगातून शबानाचा शशी कपूरबद्दलचा आदर आणखीच वाढला.  

ती शशी बाबत कायम म्हणायची “Most Handsome and Respectable Person in the Industry”

नंतर अनेक सिनेमातून ही जोडी रसिकांच्या समोर आली. १९७८ साली शशी कपूरने रस्किन बॉण्ड यांच्या कादंबरीवर ‘जुनून’ नावाचा सिनेमा काढला त्यात शबानाला आवर्जून भूमिका दिली होती.

या काळात ‘फकीरा’ हा सिनेमा अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारीत आहे या गैरसमजातून अनेक मराठी रसिकांनी हा सिनेमा पहिला होता आणि मग प्रचंड नाराज देखील झाले होते. 

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.