या कारणांमुळे काँग्रेसमध्ये शशी थरूर यांना साईडलाईन करण्याचा प्लॅन आहे असं म्हटलं जातंय

काँग्रेस पक्षामध्ये साचलेपणा आलाय त्यात बदल घडवणे गरजेचं आहे असं म्हणत शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी थेट काँग्रेसचे कर्ते करविते असलेल्या गांधी घराण्याच्या विरुद्धच शड्डू ठोकलं होतं. थरूर यांच्या विद्रोही मानल्या जाणाऱ्या पाऊलामुळे ते काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडून तर येणारच नाहीत, सोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुद्धा ब्रेक लागेल अशी चर्चा सुरु झाली होती. 

अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे काँग्रेसमध्ये थरूर यांना साईडलाईन केलं जात आहे की काय अशी चर्चा सुरूआहे.

अलीकडेच कोझिकोडे येथील जवाहर युथ फाउंडेशनकडून एक व्याख्यानाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणे या कार्यक्रमात शशी थरूर यांचं सुद्धा एक व्याख्यान होणार होतं. विषय होता, ‘संघ परिवार आणि धर्मनिरपेक्षतेपुढील आव्हाने’. परंतु ऐनवेळी 

थरूर यांचं व्याख्यान रद्द करण्यामागे केरळच्या युवक काँग्रेसच्या एका नेत्याचा हात असल्याचे थरूर समर्थकांनी माध्यमांना सांगितलय. त्यामुळे थरूर यांना काँग्रेसमध्ये खच्चीकरण सुरु झालंय असं म्हटलं जातंय. कारण शशी थरूर यांचं महत्व कमी करण्यासाठी निव्वळ कार्यक्रम रद्द करणे ही एकमेव घटना घडलेली नाही. 

सर्वात प्रथम अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्येच थरूर यांना सहकार्य करण्यात आलं नव्हतं.

जेव्हा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा काँग्रेसच्या जी-२३ गटातील सदस्य असलेल्या थरूर यांनी पक्षात सुधारणांचा मुद्दा पुढे केला होता. यात थरूर यांचं मत होतं की, ‘पक्षात हायकमांड संस्कृती रुजलेली आहे, प्रत्येक लहान सहान काम करण्यासाठी हायकमांडची परवानगी घ्यावी लागते. ही हायकमांड संस्कृती मोडून जिथले निर्णय तिथे घेण्यासाठी पक्षात सुधारणा करावी लागेल.’

थरूर यांच्या विधानाचा रोख हा गांधी कुटुंबाकडेच होता, पण नॉन गांधी निवडणूक असतांना सुद्धा प्रचारामध्ये दोन्ही उमेदवारांना वेगवेगळी वागणूक मिळत होती. याबद्दल स्वतः शशी थरूर यांनीच बोलून दाखवलं होतं. 

ते म्हणाले की, “जेव्हा मी प्रचारासाठी राज्यांना भेट द्यायचो तेव्हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माझ्यासाठी उपलब्ध नसायचे, पण जेव्हा मल्लिकार्जुन खरगे प्रचारासाठी जात असत तेव्हा त्यांचं स्वागत केलं जायचं. याबाबत माझी तक्रार नाही पण पक्षातर्फे मला आणि त्यांना वेगळी वागणूक देण्यात आलीय.”

अध्यक्षपदाच्या प्रचारात आणि निवडणुकीमध्ये गांधी कुटुंबाचा प्रभाव होता. यामुळेच मल्लिकार्जुन खरगे हे ८४.१४ टक्के बहुमताने निवडून आले. तर शशी थरूर यांना फक्त ११.४२ टक्के मतं मिळाली होती असं सांगितलं जातं

या निवडणुकीत थरूर यांचा पराभव झाला तरी त्यांना मिळालेली मतं ऐतिहासिक होती. कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये गांधी परिवाराच्या विरुद्ध जाणाऱ्या उमेदवारांना एक-दीड टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली नव्हती. 

निवडणुकीतील पराभवानंतर थरूर यांना सुकाणू समितीमध्ये स्थान देण्यात आलं नाही. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीऐवजी सुकाणू समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे निर्णय घेणाऱ्या या समितीमध्ये ४२ सदस्यांना स्थान देण्यात आलं, पण यात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला नाही. काँग्रेसमधील बुद्धिजीवी आणि हुशार नेत्यांपैकी आघाडीचे नाव असलेल्या थरूर यांचं नाव सुकाणू समितीत नसणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.

यापाठोपाठ गुजरात निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून थरूर यांना वगळण्यात आलं.

भाजप आणि काँग्रेसच्या दुहेरी निवडणुकीत आपचा प्रवेश झाल्यामुळे गुजरातची निवडणूक तिहेरी झालीय. यापूर्वी पंजाबचा बालेकिल्ला आपने काँग्रेसच्या हातातून हिसकावून घेतलाय, त्यामुळे गुजरातची निवडणूक काँग्रेससाठी महत्वाची आहे. मात्र यात सुद्धा काँग्रेसने प्रचारासाठी ज्यांची नाव निश्चित केली त्यात थरूर यांचं नाव नाही.

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये थरूर हे काँग्रेसचे स्टार प्रचारक राहिले होते. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून काम सांभाळलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या संवेदनशील जागांवर थरूर यांची विशेष नेमणूक करण्यात आली होती.

एवढंच नाही तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राजनाथ सिंग यांचा मुलगा पंकज सिंग हा नोएडा मतदारसंघातून उभा होता. तेव्हा प्रियांका गांधी यांनी विशेष करून या मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी थरूर यांच्याकडे दिली होती असं सांगितलं जातं. मात्र थरूर प्रचारामध्ये एवढे महत्वाचे असतांना सुद्धा गुजरात निवडणुकीच्या प्रचारात त्यांना बाजूला सारण्यात आलं.

हे झाले राष्ट्रीय राजकारणाचं, पण आता केरळच्या राजकारणात सुद्धा थरूर यांचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

केरळ काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. केरळचे विरोधी पक्षनेते वि डी सतीसन आणि सुधाकरण यांच्यात उडणाऱ्या खटक्यांमुळे सतीसन यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर या वादावर पडदा पडला आहे.

परंतु याच पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी चार दिवसांचा उत्तर केरळचा दौरा सुरु केला. एकीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक ११.४२ टक्के मिळवणाऱ्या थरूर यांचा राष्ट्रीय स्तरावर चांगलाच प्रभाव वाढलाय. केरळच्या राजकारणात सुद्धा थरूर यांचा प्रभाव वाढण्याची चिन्ह दिसत आहेत, त्यामुळे काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व चिंतेत पडलंय.

थरूर यांचा केरळ राज्यात प्रभाव वाढण्यासाठी काही महत्वाची कारणं आहेत.

थरूर हे केरळमध्ये प्रमुख लोकसंख्या असलेल्या नायर समाजातून येतात. राज्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये नायर समाजाची टक्केवारी १२.५ एवढी आहे, पण राजकारणात नायर समुदाय प्रभावी समाज मानला जातो. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या दोघांमध्ये नायर समाज प्रभावी आहे. 

२००९ मध्ये थरूर जेव्हा पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते तेव्हा त्यांचा त्यांचा नायर समाजावर प्रभाव नव्हता. मात्र तीन वेळ खासदार आणि राष्ट्रीय राजकारणातील महत्व यांच्यामुळे थरूर यांचा सुद्धा दिवसेंदिवस प्रभाव वाढत आहे. 

केरळ काँग्रेसमध्ये सध्या वेणुगोपाल, विरोधी पक्ष नेते वि डी सतीसन, माजी विरोधी पक्ष नेते रमेश चेन्निथला आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के मुरलीधरन यांचा प्रभाव आहे. २ जानेवारीला नायर सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक माननाथु पद्मनाभन यांच्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षपद थरूर यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे समाजात त्यांचा प्रभाव वाढायला लागला आहे. 

नायर समाजाच्या बाहेर सुद्धा थरूर यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 

थरूर हे बुद्धिजीवी नेत्यांपैकी एक मानले जातात त्यामुळे दक्षिण केरळसोबतच उत्तर केरळमधील काँग्रेस नेत्यांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे. यात नायरांसोबतच इतर समाजाचा सुद्धा समावेश आहे. जर थरूर यांचा प्रभाव असाच वाढला तर जुने नायर नेते आणि केरळ काँग्रेसच्या नेतृत्वासमोर अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून त्यांनीच थरूर यांचं महत्व कमी करण्यासाठी व्याख्यान रद्द केलं असं सांगितलं जातंय. 

एकीकडे वि डी सतीसन यांचा पाठिंबा कमी करण्यासाठी सुधाकरण प्रयत्न करत आहेत. सोबतच ते हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत. सुधाकरण यांच्या हिंदुत्ववादी भूमिकांमुळे युपीए मधील घटक पक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीगने काँग्रेसकडे वारंवार तक्रार केलीय. त्यामुळे काँग्रेसमोर आघाडी वाचवण्याचं सुद्धा संकट उभं झालंय. 

दुसरीकडे शशी थरूर हे स्वतःचा प्रभाव वाढवत आहेत. सोबतच त्यांच्या अलीकडच्या विधानामुळे असं कळतं की थरूर मागे हटायला तयार नाहीत. आता थरूर यांचा वाढत जाणारा पाठिंबा आणि काँग्रेसमध्ये थरूर यांचं होणारं खच्चीकरण याला कोणता वळण मिळेल याकडे विश्लेषकांच लक्ष लागलं आहे. 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.