लाल बहादूर शास्त्री यांची इच्छा म्हणून मनोजकुमारने ‘उपकार’ बनवला.

सध्या देशात ज्या त्या क्षेत्रात देशभक्तीचे वारे वाहत आहेत. क्षेत्र कुठलंही असो त्यात काम करण्यासाठी तुमच्यात देशभक्ती असावी लागते आणि ती वेळोवेळी सिद्धही करून दाखवावी लागते. मग यात बॉलीवूड तरी कसे मागे राहणार ? देशभक्तीपर सिनेमा बनवताना भारत-पाकिस्तान यांच्यात घडलेल्या घटनांना प्राधान्य देण्यात येत त्यानंतर मग बाकी उरले सुरले चिल्लर विषय असतात.

चालू दशकात आतापर्यंत गाझी अटॅक, उरी, केसरी, एअरलिफ्ट, हॉलिडे सारखे बरेच देशभक्ती शिकवणारे सिनेमे येऊन गेले. असे सिनेमे बनवण्यासाठी अभिनेत्यांचीही चांगली चढाओढ चालू असते. यात अक्षय कुमार अग्रण्य स्थानी आहे. त्याच्या पाठोपाठ विकी कौशल, जॉन अब्राहम येतात. आता अक्षय कुमारचा मिशन मंगल येतोय, विकी कौशलचा सॅम तर जॉन अबह्रामचा बाटला हाऊस हे आगामी सिनेमे आहेत जे सत्य घटनेवर आधारित आहेत.

तर देशभक्तीपर सिनेमा बनवायची बॉलीवूडची ही प्रथा तशी जुनीच आहे. पण आता सगळं काही एकटा हिरोच करतो असे दाखवले जाते, मात्र पूर्वी असे नव्हते. स्वातंत्र्योत्तर दशकात असाच एक हिरो होऊन गेलेला, ज्याच्या देशभक्तीपर सिनेमे बघून लोकांनी त्याचे ‛भारत कुमार’ असे नामकरण केलेले. तो हिरो म्हणजे मनोजकुमार.

मनोजकुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी अबोटाबाद, पाकिस्तान मध्ये झालेला. तेव्हा हा भाग भारताचाच होता पण फाळणी नंतर तो पाकिस्तान मध्ये गेला. फाळणी नंतर मनोजकुमार यांच्या कुटुंबाला गाव सोडून रिफ्युजी कॅम्प मध्ये राहावं लागलं होतं त्यामुळे मनोजकुमार यांचे बालपण रिफ्युजी कॅम्प मध्येच गेले. त्यानंतर ते दिल्ली मधील जुन्या राजेंद्र नगरमध्ये स्थायिक झाले. मनोजकुमार यांचं सिनेमात काम करण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. त्यातूनच पुढे दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फिल्म करिअर मध्ये प्रवेश केला.

याबाबत एक मजेदार किस्सा आहे. मनोजकुमार नेहमी आपली होणारी बायको शशी हिला विचारून फिल्ममध्ये काम करायचे. तिने होकार दिला तर ठीक नाही तर मग फिल्मला स्पष्ट नकार देऊन द्यायच्या. अशात एकदा एका मोठ्या फिल्ममध्ये लीड रोलचो ऑफर मनोजकुमार कडे आली होती. तेव्हा त्यांनी सरळ सांगितले की, आपल्या गर्लफ्रेंडच्या परवानगी शिवाय काम करणार नाही. जेव्हा शशीने परवानगी दिली तेव्हा त्यांनी काम करण्यास होकार दिला.

साल होत १९६५. नुकतच भारत-पाकिस्तान युद्ध संपल होतं. तेव्हाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‛जय जवान, जय किसान’ अशी घोषणा केली होती. लाल बहादूर शास्त्री हे मनोजकुमार यांचे मोठे चाहते होते. त्यापूर्वी १९६५ हुतात्मा भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित शहीद पिक्चर आला, ज्यात मनोजकुमार यांनी भगतसिंगची भूमिका निभावली होती. हा पिक्चर सुपरहिट झाला होता. शास्त्रीजींना देखील खूप आवडला होता.

 त्यांनी जय जवान जय किसान या विषयावर फिल्म बनवण्याच्या आग्रह मनोजकुमार यांच्याकडे केला. शास्त्रीजींच्या आग्रहाचा मान राखत मनोजकुमार यांनी ‛उपकार’ हा पिक्चर काढला. यातच त्यांनी दिग्दर्शक म्हणून पर्दापण केलं. पिक्चर मध्ये त्यांनी एका सैनिकाची भूमिका निभावलेली. हा ही पिक्चर सुपरहिट झाला. पिक्चरने सहा फिल्मफेयर अवॉर्ड जिंकले, ज्यात मनोजकुमार यांनी पर्दापणातच बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड जिंकलेला.

पिक्चर मधील ‛मेरे देश की धरती’ गाणं अजरामर झालं. जे ५२ वर्षानंतर आजही २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट च्या पहाटे ऐकायला मिळतं.

त्यानंतर त्यांनी पुरब और पश्चिम, बलिदान, क्रांती, देशवासी असा अनेक पिक्चर मध्ये काम केले. पुरब और पश्चिम मधील ‛भारत का रहनेवाला हूं’ ह्या गाण्यातून भारताच्या जगाच्या विकासातील योगदानापसून ते भारताच्या संस्कृती पर्यंतचा अध्याय मांडलेला आहे. मनोजकुमार यांची आणखी एक खासियत होती, ती म्हणजे निम्म्याहून अधिक पिक्चर मध्ये त्यांचं नाव भारत होतं. यावरूनच लोकांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिलेले.

चित्रपटसृष्टीत तीन दशके काम केल्याबद्दल १९९२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आज मनोजकुमार उर्फ भारतकुमार यांचा वाढदिवस !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.