लाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.

लाल बहादुर शास्त्री. देशाचे माजी पंतप्रधान. आपल्या प्रामाणिक पणासाठी आणि आदर्शासाठी संपुर्ण देशात आजही आदरस्थानी आहेत. विचारसरणीने पक्के गांधीवादी. पण गांधीवाद केवळ पुस्तकी न ठेवता तो खऱ्या आयुष्यात देखील आचरणात आणला.

देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत मजलं मारली होती पण आपल्या पदाचा मोठेपणा त्यांनी कधीही मिरवला नाही. नम्रपणा हीच त्यांची खरी ताकद होती. देशाच्या या सर्वोच्च पदावर राहुन देखील एक कार विकत घेण्या एवढे देखील पैसे त्यांनी आपल्या आयुष्यात कमावले नव्हते. नेहरु देखील शास्त्रीजीच आपले उत्तराधिकारी, असे अनेकदा जाहिरपणे सांगायचे.

पंतप्रधानपदावर विराजमान होण्यापुर्वी ते रेल्वेमंत्री आणि देशाच्या गृहमंत्री पदावर होते. रेल्वेमंत्री असताना पदाच्या काळात जेव्हा एक मोठा अपघात झाला तेव्हा त्यांनी थेट राजीनामा देत त्यांनी अनेकांना चकित केलं होतं. सरकारी गाडी न वापरण्याचे स्वतःवर बंधन. शास्त्रीचींच्या आयुष्यातील प्रामाणिकपणा, नैतिकता यांचे हे आणि असे अनेक किस्से सांगितले जातात.

असाच एक किस्सा सांगितला तो जेष्ठ पत्रकार प्रेम प्रकाश यांनी.

तो किस्सा म्हणजे दिल्लीमधील गुलमोहर पार्क पत्रकार कॉलनीच्या उदयाचा. ही भेट शास्त्रीजींनीच पत्रकारांना दिली होती. पण अगदी कायदेशीर पद्धतीने. पत्रकारांच्यासाठी म्हणून कुठे ही नियमांना बगलं दिली नव्हती. पण दिल्ली सारख्या राजधानीचं ठिकाण असलेल्या शहरात पत्रकारांना प्रमुख ठिकाणी ही जागा असल्यामुळे, पत्रकार ही भेट कधीच विसरु शकणार नसल्याच सांगतात.

त्याचं झालं असं होत की, जेष्ठ पत्रकार प्रेम प्रकाश आणि शास्त्रींची ओळख तशी जुनी. प्रकाश त्यावेळी दिल्ली पत्रकार युनियनचे सदस्य म्हणून त्यांच आणि शास्त्रीजींच बऱ्याचदा बोलणं-भेटणं व्हायचं.

त्यावेळी दिल्लीमधील पत्रकारांना घर बांधण्यासाठी सरकारकडून जागा हवी होती. 

त्यामुळे प्रकाश आणि शास्त्री या दोघांनी मनात आणलं असतं तर ओळखीने आणि वशिल्याने हवी ती जागा अगदी सहज उपलब्ध झाली असती. पण प्रकाश यांच्या स्वभावातच आडवाटेन जायचं नव्हतं. आणि शास्त्रीजींचा तर या मार्गाने जायचा प्रश्नच नव्हता.

त्यामुळे एकदा प्रकाश यांनी सर्व पत्रकारांना एकत्र करतं घरासाठी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीच मत बोलून दाखवलं. त्याचं कारण होतं, सरकारने १९५७ मध्ये घरांच्यासाठी दिल्ली विकास प्राधिकरण तयार केले होते.

प्रेम प्रकाश सांगतात, हे तसं पाहिलं तर हे जरा फॅबियन समाजवादासारखं होतं. जो नेहरुंनी इंग्लंडकडून स्विकारला होता. यामध्ये जर तुमचा एक सहकारी गट असेल तर सरकारकडे घरासाठी जागेची मागणी करु शकत होता.

यामुळेच दिल्लीत एअरफोर्सची गगनविहार कॉलोनी, बँकवाल्यांची बँक कॉलोनी, फिल्मवाल्यांची फिल्म कॉलोनी अशा कॉलोनी उभ्या राहिल्या आहेत.

पत्रकारांची घरं असलेली गुलमोहर पत्रकार कॉलनी.

जेव्हा शास्त्रीजी गृहमंत्री होते, तेव्हा प्रेम प्रकाश आणि त्यांचे सहकारी बी. सी. सक्सेना हे सहकारी समुदायाला जागा मिळावी यासाठी प्रयत्न करत होते.

पण भारतात एकत्र काम करणं ही सोपी गोष्ट नसते, असे प्रेम प्रकाश म्हणतात. कारणं त्यावेळी दिल्ली पत्रकार युनियनमध्ये चार पत्रकार असोसिएशन होत्या. त्यात प्रेस असोसिएशन, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कर्मचारी असोसिएशन आणि टाईम्स ऑफ इंडिया असोसिएशन.

त्यामुळे प्रकाश सांगतात की या चार असोसिएशन एकत्र असणं तशी ही जरा डोकेदुखीच होती. पण अखेरीस चौघांच एकमत होवून ज्या जमिनींचा प्रस्ताव सरकारकडून येईल त्यातील कोणता निवडायचा हे ठरवण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रकाश सांगतात, मला आठतयं शास्त्रीजी या प्रश्नाची चर्चा खूपच मैत्रीपुर्ण वातावरणात करत होते. पण त्यांनी प्रकाश यांना मोलाचा सल्ला देखील दिला. शास्त्रीजी म्हणाले,

जर सहकारी संस्था चालवू शकत असालं तरचं पुढाकर घ्या. नीट चालवु शकला नाहीत तर बरीच बदनामी होते अशा कामात.

पण आम्ही सर्वांनी मिळून त्यांना आम्ही व्यवस्थित चालवू अशी हमी दिली. आणि चालवली देखील. बी. सी. सक्सेना, प्रेम प्रकाश आणि कै. सब्रम्हण्यम्य यांच्या नेतृत्वात ही मागणी मान्य झाली.

जवळपास ३२५ पत्रकारांना ३२५ प्लॉट्स उपलब्ध करुन देण्यात आले. निबीड जंगल असलेलं ते ठिकाण आज दिल्लीच मुख्य ठिकाणी म्हणून ओळखलं जातं.

गुलमोहर पार्क.

या नावामागे देखील तसाच काहीसा इतिहास आहे. प्रेम प्रकाश यांनी ‘गुलमोहर’ हे नाव सुचवलं होतं. पण हिंदी आणि इंग्लिश अशा भाषांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये त्यावरून बरीच चर्चा झाली. इंग्रजी वाल्यांना हे नाव उर्दु भाषेत असल्यासारखं वाटतं होतं. तर काहींनी पत्रकार कॉलनी अशा नावाचा आग्रह धरला.

पण टाईम्स ऑफ इंडियाचे तत्कालिन मॅनेजर जे. एम. डिसुझा यांनाच हे नाव आवडलं होतं आणि त्यांनी त्यासाठी पाठपुरावा करत हे नाव सगळ्यांच्या गळी उतरवलं होतं. अखेरीस गुलमोहर पार्क पत्रकार कॉलनी असं नाव अंतिमतः ठेवण्यात आलं.

प्रेम प्रकाश सांगतात शास्त्रीजींनी दिलेली ही भेट आम्ही कधीच विसरु शकत नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.