दिल्लीचा तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याची किमया फक्त शीला दिक्षीत यांनाच जमली होती.

नुकतच बातमी आली, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचं हृद्यविकारान निधन झालं. आधीच खिळखिळी झालेल्या कॉंग्रेसने आणखी एक खंदा शिलेदार गमावला.

एक काळ होता जेव्हा राजधानी दिल्लीमध्ये फक्त शीला दिक्षीत यांचा शब्द चालायचा. त्यांनी सलग पंधरा वर्षे दिल्ली मध्ये मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केला होता. पक्षाबाहेरचे तर सोडाच पण पक्षांतर्गत रथीमहारथीनी जंग जंग पछाडल आणि त्यांना चौथ्यांदा मुख्यमंत्री पदावर बसू दिल नाही.

कोण होत्या या शीला दिक्षीत? काय होती त्यांची जादू?

शीला दिक्षीत या मुळच्या पंजाबच्या कपूरथलाच्या शीला कपूर. घरचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. दिल्लीमध्ये लहानपण गेल. आई वडिलांनी पंजाबी कल्चर प्रमाणे त्यांना वाढवताना कोणतेही बंधन घातले नव्हते. अगदी तेव्हा सुद्धा त्या बिनधास्त होत्या.

एकदा काय झालं की त्यांना आणि त्यांच्या मैत्रिणीना पंतप्रधानांना पाहायचं होत. शाळा सुटल्यावर या सहावी सातवीच्या मुली सायकल घेऊन थेट प्रधानमंत्री निवासाला गेल्या. तेव्हा पंडीत नेहरू पंतप्रधान होते. बराच वेळ या मुली गेटच्या बाहेर उभ्या होत्या अखेर प्रधानमन्त्रींची गाडी बाहेरून आली. नेहरूंच लक्ष त्यांच्या कडे गेले. या छोट्या मुलीच्या टीमकडे कौतुकाने हसत सलाम केला. तो सलाम एखाद पराक्रमाच मेडल मिरवाव तसा मिरवत या मुली घरी आल्या. त्या कधीच हा प्रसंग विसरल्या नाहीत.

शाळेत हुशार असणाऱ्या शीलाने सुप्रसिध्द अशा मिरांडा हाऊस कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. याच काळात आपल्या बरोबरच्या विनोद दिक्षीत नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. दिल्ली विद्यापीठाच्या पायर्यांवर बसून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आधी तर घरचे तयार नव्हते. जात वेगळी आहे हा प्रश्न नव्हता तर मुलगा काय करतो हा सवाल होता. विनोद दिक्षीत तेव्हा युपीएससीची तयारी करत होते. शीला दिक्षीतनां तो पर्यंत एका शाळेत शिक्षिकेची नोकरी लागली होती. शिवाय भारत समाज संघ सारख्या संस्थेमध्ये समाजसेवेचं काम देखील करत होत्या.

त्यांनी घरच्यांना ठामपणे सांगितलं ,

” विनोदचे वडील स्वातंत्र्यसैनिक आहेत. कधी ना कधी तो युपीएससी पास होणार याची मला खात्री आहे. नाही झालं तर आम्ही स्वतःच पोट भरेल इतक तरी कमवू शकतोच. मी केलं तर लग्न फक्त आणि फक्त विनोद बरोबरच करणार.”

अखेरचे घरचे तयार झाले. पण विनोदचा निकाल लागेपर्यंत त्याला भेटायचं नाही ही अट घातली. दोघेही तयार झाले. निकाल लागला तेव्हा कळाल विनोद दिक्षीत यांचा अख्ख्या भारतात नववा क्रमांक आला आहे. शीला आणि विनोद यांचं लग्न ठरलं.

सगळ्यांना वाटलं की आयएएस मुलगा आहे, धूमधडाक्यात लग्न होईल तर अगदी साध्या गांधीपद्धतीने खादी साडीमध्ये लग्न झालं.

शीला दिक्षीत यांचे सासरे उमाशंकर दिक्षीत हे राजकारणात होते. पुढे जाऊन इंदिरा गांधी यांचे विश्वासू साथीदार म्हणून त्यांना ओळखले गेले. त्यांन आपल्या हुशार सुनेचा खूप गर्व होता. ती दैनंदिन प्रशासकीय कामात त्यांना मदत करू लागली.

पुढे जाऊन उमाशंकर दिक्षीत यांच्यावर देशाच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या सोबत शीला दिक्षीत यांनासुद्धा राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव मिळाला. उमाशंकर दिक्षीत यांनी वर्ष दोन वर्ष या पदावर काढले असतील नसतील तोवर राजकारणात संजय गांधी यांचं आगमन झालं. जुन्या नेत्यांची गच्छन्ति करून त्या जागी नव्या नेत्याना आणण्यात आलं. दिक्षीत यांची रवानगी बंगालच्या राज्यपाल पदी केली गेली. थोड्याच दिवसात आणिबाणी जाहीर झाली.

शीला दिक्षीत यांनासुद्धा राजकारणात कोणावर भरवसा ठेवायचा नाही आणि हार न मान्य करता संयमीपणे आपल्या वेळेची वाट बघायची हा धडा शिकायला मिळाला.

१९८२ हे वर्ष आलं. तोवर संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. भारतीय राजकारणाच्या पटलावर राजीव गांधी यांचं आगमन झालं होत. त्यांनी स्वतःची नवी टीम बनवली होती. त्यांच्या कॉम्प्यूटर, लॅपटॉप घेऊन काम करण्याच्या नव्या स्टाईलने सगळ्यांना भरून टाकलं होत. यात शीला दिक्षीत देखील होत्या. १९८२ला या टीमने दिल्लीमधल्या आशियाड गेम्स स्पर्धा यशस्वी पणे आयोजित करून दाखवल्या. याकाळात दिल्लीचा चेहरा मोहरा बदलला. देशात रंगीत टीव्ही आले.

पुढे जेव्हा इंदिरा गांधींचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी शीला दिक्षीत यांना निवडणूक लढवायला लावली होती. इतकेच नव्हे तर पहिल्यांदाच खासदार बनत असलेल्या शीला दिक्षीत यांचा मंत्रीमंडळात देखील समावेश केला. शीला दिक्षीत यांना राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या खास म्हणून ओळखलं जात होतं.

१९८९ साल त्यांच्या साठी खूप निराशाजनक होते. बोफोर्स घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी यांचं सरकार परत निवडून येऊ शकल नाही. खुद्द शीला दिक्षीत देखील निवडणुकीत हरल्या होत्या. त्यांच्या नवऱ्याच हार्ट अटकने निधन झालं होत. शीला दिक्षीत राजकारणातून बाजूला पडल्या. नरसिंहरावच्या रुपात कॉंग्रेसचा पुढचा पंतप्रधान आला पण त्यांनी गांधी घराण्याच्या एकनिष्ठाना सत्तेपासून लांबच ठेवलं होतं.

शीला दिक्षीत यांचं आगमन झालं १९९८ मध्ये. तोवर सोनिया गांधी राजकारणात येणार याचे पडघम वाजू लागले होते. शीला दिक्षीत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने दिल्लीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचं सरकार पाडल.

पुढची पंधरा वर्षे दिल्लीमध्ये शीलाराज सुरु होतं. त्यांच्या काळात दिल्लीची लोकसंख्या तब्बल १ कोटीने वाढली. दिल्लीचं रुपांतर खरोखर मेट्रो सिटी मध्ये झालं यात शीला दिक्षीत यांचा सिंहाचा वाटा आहे. कॉंग्रेसच्या सर्वात शक्तीशाली मुख्यमंत्र्यामध्ये त्यांचा समावेश होत होता.

पण २०१०च्या कॉमनवेल्थ गेम्स दिल्लीमध्ये खेळवण्याची महत्वाकांक्षा त्यांना महागात पडली. या गेमच्या वेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. १५ वर्षाची anti-incumbancy देखील काम केली. आम आदमी पार्टीच्या झाडूच्या दणक्यात शिला दिक्षीत सरकार वाहून गेले.

त्यानंतर शीला दिक्षीत यांनी परत उभारी घेतलीच नाही. कॉंग्रेसने देखील कधी त्यांना राज्यपाल, कधी युपी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार, कधी दिल्ली कॉंग्रेस चा प्रदेशाध्यक्ष अशा अनेक पदांवर फिरवले. पण त्या थकल्या होत्या.

आज त्यांच्या मृत्यूने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्यावर अनेकांनी बऱ्यावाईट टीका झाली असेल पण त्या अशा मोजक्या महिला नेत्यांपैकी होत्या ज्यांनी पुरुषकेंद्रित राजकारणात स्वबळावर खमकेपणाने आपले स्थान निर्माण केले आणि बऱ्याच वर्षापर्यंत ते टिकवून ठेवले. यात काही शंका नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.