आमटे कुटूंबातला वाद नेमका काय होता व कधी सुरू झाला..?

जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल आमटे-कराजगी यांनी आज आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण उद्याप समोर आले नसले तरी कौटुंबिक गृहकलह आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आमटे कुटुंबीयांच्या वादाने समाजमाध्यमांमध्ये जागा घेतली होती. समाजमाध्यमे आणि वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमधून या वादावर भाष्य करणाऱ्या बातम्या वेळोवेळी प्रकाशित होत होत्या.

पण हा वाद नेमका काय होता आणि कधी सुरु झाला होता ?

जेष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये या आनंदवनाची उभारणी केली. संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना याठिकाणी आश्रय मिळाला.

बाबा आणि साधना आमटे यांनी या रोग्यांची सेवा केली. त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. सोबतच कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद्र किंवा रुग्णालय होऊ नये, याची ही बाबांनी दक्षता घेतली. कुष्ठरोग्यांच्या श्रमातून औद्योगिक वसाहत उभी करत स्वयंपूर्ण करून जगायला शिकविले.

२००८ मध्ये बाबांच्या निधनानंतर हा कारभार त्यांचा मुलगा विकास आमटे यांच्यावर सोपविला.

त्यांनी काही काळ कारभार सांभाळल्यानंतर आमटेंची तिसरी पिढी डॉ. दिगंत-अनिकेत आणि डॉ. शीतल-कौस्तुभ यांनी बाबा आमटे यांचे काम हातात घेतले. कौस्तुभ यांची महारोगी सेवा समितीवर नियुक्ती करण्यात आली.

सन २०१६ मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना स्थान देण्यात आले.

याच दरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिव पदावरून राजीनामा दिला. पुण्यात पाणीप्रश्नावर काम करण्यासाठी आनंदवनातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अशी झाली वादाला सुरुवात…

यानंतर मागील ५ ते ६ महिन्यांपासून वादाने डोके वर काढले. डॉ. शीतल आणि गौतम कराजगी यांनी कारभार आपल्या हातात घेतल्यानंतर आनंदवनाला कॉर्पोरेट लुक देत असल्याचा आरोप होवू लागला.

लोकसत्ताने २५ जुलै २०२० रोजी या संदर्भातील बातमी दिली.

याच बातमीनुसार, आनंदवनातील अनेक उपक्रम नव्या पिढीच्या काळात बंद पडल्याचा आरोपही केला गेला. कुष्ठरुग्णांनी स्वयंपूर्ण व्हावे म्हणून आनंदवनात अनेक उत्पादने तयार व्हायची. त्यांची चांगली विक्रीही होत असे. यामध्ये चाळण्या, गाळण्या, सतरंज्या, चादरी, टॉवेल, बैठकीचे जाजम यांसारख्या उत्पादनांचा समावेश होता.

मात्र आता ही उत्पादने नाहीशी झाली आहेत. नव्या व्यवस्थापनाने जुने पॉवरलूम मोडीत काढत कोटय़वधी रुपये खर्चून नवे आधुनिक पॉवरलूम आणले. असा दावा या बातमीमध्ये करण्यात आला.

सोबतच १९६७ मध्ये बाबांनी सुरु केलेली निशुल्क श्रमसंस्कार छावणी (शिबीर) याला ही नव्या पिढीने शुल्क आकारायला सुरुवात केली, त्यामुळे तरुणाईचा ओघ आटत गेला. तसेच आनंदवनचा मित्रमेळावा ही बाबांच्या निधनानंतर झाला नाही असा ही दावा लोकसत्ताच्या बातमीमध्ये केला गेला.

लोकसत्ताने आनंदवनातील शेती बाबत ही आरोप केला होता. ही शेती ठेक्याने आंध्रमधील शेतकऱ्यांना करायला दिली जाते. शासनाने ही शेती आनंदवनला दिली ती कुष्ठरुग्णांना आत्मनिर्भर होता यावे म्हणून. नियमाप्रमाणे ती ठेक्याने देता येत नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. असे म्हंटले होते.

यानंतर आनंदवनातील हा वाद पोलीस ठाण्यात गेला.

नवी कार्यकारिणी आपल्या पद्धतीने काम करत असतानाच आनंदवनात राहणाऱ्या दोघांनी नाराजी व्यक्त करत नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणे सुरू केले.

यात डॉ. विकास आमटे यांचा सहाय्यक आणि आनंदवनचे माजी सरपंच राजू सौसागडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपल्याला हीन दर्जाची वागणूक मिळत असून आपला छळ होत आहे. असा आरोप त्यांनी केला.

नव्या व्यवस्थापनाने ऑफिसमध्ये बोलावून घेत आपला अपमान केला. तसेच सर्व जबाबदाऱ्या काढून घेत घर खाली करायला लावले असा ही आरोप केला. त्यामुळे सौसागडे यांनी नव्या प्रशासनाविरोधात दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अन्वये तक्रार केली.

याच दरम्यान बाबा आमटे यांचे सहकारी शंकरदादा जुमडे यांचा मुलगा विजय जुमडे यांनी देखील या वादात उडी घेत महारोगी सेवा समितीकडून कार्यकर्त्यांचा छळ होत असल्याची तक्रार केली.

इथूनच आनंदवनातील मतभेद तसेच परस्पर आरोप-प्रत्यारोप जगासमोर आले.

मात्र, आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे करजगी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

या वादाची पालकमंत्र्यांकडून दखल

चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. आनंदवनमधील वाद, तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून, त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ व्यवस्थापनाने येऊ देऊ नये.

आमटे कुटुंबीयांनी स्वत: पुढाकार घेऊन या वादावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

केवळ राज्यच नाही तर देश-परदेशातून अनेकांनी आमटे कुटुंबातील हे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक दशकांपासून ‘आनंदवन’शी जोडलेल्या राज्यातील अनेक कलावंतांनी आमटे कुटुंबाशी चर्चा करून कौटुंबिक कलह संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

बाबा आमटे तसेच आनंदवनापासून प्रेरणा घेऊन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटेंना एक पत्र लिहून हे वाद मिटवावेत, अशी विनंती केली होती.

शीतल आमटेंचा वादग्रस्त व्हिडिओ

यानंतर महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे कराजगी यांनी काही दिवसांपूर्वी एक फेसबुक लाईव्ह केले होते. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.

मात्र त्यानंतर दोन तासांतच माध्यमावरून हा व्हिडिओ हटविण्यात आला होता.

आठ दिवसांपुर्वी आमटे कुटुंबीयांचे संयुक्त निवेदन

२२ नोव्हेंबर २०२० रोजी शीतल आमटे-कराजगी यांनी व्हिडिओत केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे एकत्रित जारी करण्यात आले.

WhatsApp Image 2020 11 30 at 2.03.27 PM

डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची सही असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

डॉ. शीतल यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचे या चौघांनी म्हटले होते.

लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला आहे. समाजाने कोणत्याही अप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली होती.

आज आत्महत्येची बातमी आली.

आमटे कुटुंबीयांच्या या संयुक्त निवेदनानंतर आज आठ दिवसांनंतर डॉ. शितल यांची आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. त्यामुळे या वादाने आता आणखी नवे वळण घेतले आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.