रेल्वे स्टेशनवरुन सुरु झालेला ‘शेगाव कचोरी’चा प्रवास आज अख्या महाराष्ट्रात पोहचलाय.

शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताना कधी रेल्वेनं गेला असाल तर साधारण जळगाव, भुसावळ ही स्टेशन आली की कचोरीचे ठेले दिसायला सुरुवात होते. पुढे शेगावात दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मंदिराबाहेरच्या रोडला पण असे ठेले आणि कचोरीचे हॉटेल दिसतात.

त्या सगळ्या ठेल्यांवर किंवा हॉटेलला कचोरीच्या पुढे ठसठशीत अक्षरात लिहिलेलं असतं,

‘शेगाव कचोरी’

तसचं पुढे अमरावतीमध्ये गेलात तर गाडगेनगर वगैरे या भागात पण शेगाव कचोरीची दिसून येते. पुढे नागपूर मध्ये देखील असचं काहीसं. तिथून थेट ठाण्यातल्या विष्णूनगर, सेंट जॉन स्कूल, कल्याणमधल्या टिळक चौक, कोळसेवाडी या भागात या कचोरीची मोठेले हॉटेल आहेत.

आता थोडं पुण्यात या. डी. पी. रोड, शास्त्री रोड, नारायण पेठ इथं तर ही शेगाव कचोरी आज ही फेमस आहे.

थोडक्यात काय, तर विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ही अशी ही शेगाव कचोरी पुऱ्या महाराष्ट्रात फेमस आहे यात वाद आणि दुमत असूच शकत नाही. 

पण त्यामुळे या निमित्तानं प्रश्न पडतो की,

असं नेमकं काय आहे या कचोरीत की ती एव्हढी फेमस आहे? आणि मुख्य म्हणजे मूळचा मराठी माणसाचा नसणारा कचोरीसारखा हा पदार्थ जवळपास ७० वर्षानंतर देखील संपूर्ण राज्यात टिकून कसा आहे?  

तर भिडुनों, या मूळचा मराठी माणसाच्या नसणारा पण तरीही शेगाव कचोरी या नावानं फेमस झालेला कचोरी या पदार्थाचं मूळ आहे दिल्लीत. भारत – पाकिस्तान फाळणीनंतर पंजाबच्या तिरथराम शर्मा यांनी दिल्लीत चरितार्थसाठी सुरु केलेली कचोरी बरीच फेमस होती.

पुढे १९५० च्या आसपास शर्मा यांना शेगाव रेल्वे स्टेशनच्या कॅन्टिनचं काम मिळालं. तिथं शर्मांच्या स्टॉलवर मिळणारी तेज तर्रार कचोरी ‘शेगाव कचोरी’ म्हणून ओळख मिळवू लागली. इथल्या संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक या कचोरीकडे वळू लागला. सुरुवातीला ती अवघ्या २ आण्याला मिळायची. 

हळू हळू विदर्भात असलेल्या तिखटाची आवड ओळखून शर्मा यांनी या कचोरीच्या चवीत थोडा बदल केला. मुगाच्या डाळीऐवजी बेसन पीठ वापरायला सुरुवात केली.

मात्र, कालांतरानं रेल्वेनं मंजूर केलेल्या दरांमध्ये तो चविष्टपणा टिकवणं अवघड झाल्यानंतर ही कचोरी शेगाव स्टेशन सोडून शहरात स्थलांतरित झाली. शर्मा यांच्यासाठी हाच टर्निंग पॉइंट ठरला. शहरात त्यांना स्टेशनपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाला.

शहरात शर्मांच्या कचोरीचं नाव पाहून इतरांनी देखील याच नावानं कचोरी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकडूनच बाहेरच्या भागात म्हणजे खामगाव अकोल्याकडे पण या कचोरीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर विदर्भात कचोरी फेमस व्हायला वेळ लागला नाही. शेगाव कचोरी अवघ्या काहीच वर्षात अमरावती, नागपूर पर्यंत पोहचली.

त्यामुळे शेगाव कचोरी ही आता केवळ आपली ओळख राहिली नसून ती आता संपुर्ण शेगावची ओळख झाली आहे. या गोष्टीमुळे शर्मांना आपल्यवर प्रचंड जबाबदारी असल्याची जाणिव झाली. कारण क्वालिटीमध्ये कुठे जरी तडजोड झाली असती तर शर्मांसोबतच शेगावच पण नाव खराब होणारं होतं.

शेगावला राज्यभरातुन येणारे भाविक हे शर्मा यांचे हक्काचे ग्राहक होते. आजही आहेत. पण हेच भाविक शर्मांची कचोरी विदर्भाच्या बाहेर नेण्यास कारणीभूत ठरले. साधारण १९८० च्या आगे-मागे पुण्यात या कचोरीचे ठेले उभे राहिले. डी. पी. रोड, शास्री रोड, नारायण पेठं इथल्या काही ठेल्यांचं आज हॉटेलात रुपांतर झालं आहे.

पुढे २००० ते २०१० च्या दशकात शेगावला जाणऱ्या गजानन महाराजांच्या भक्तांनी केलेल्या आग्रहानंतर या कचोरीनं थेट ठाणे आणि कल्याणचं स्टेशन गाठलं. मुंबईत देखील या कचोरीनं आपलं प्रस्थान बसवलं. कचोरचं माहेरघर असलेल्या गुजरात सोबत राजस्थान, मध्यप्रदेश इथून देखील मागणी होतं गेली.

तिरथराम शर्मा यांच्या पुढच्या पिढीने पण हा व्यवसाय तेवढ्याच समर्थपणे वाढवला.

शेगाव कचोरीच्या या वाढलेल्या लोकप्रियतेमुळे त्यांनी ‘तिरथराम शर्मा यांची शेगाव कचोरी’ अशी टॅगलाईन दिली.

सध्या करण शर्मा आणि लोहित शर्मा ही तिरथराम यांची चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळते. 

स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या व्यवसायात त्यांनी काळानुरूप बदल केले आहेत. कचोरीमध्ये नवीन प्रयोग केले आहेत. सध्या या ठिकाणी पारंपारिक कचोरीसोबतच कचोरी सँडविच, मिक्सव्हेज कचोरी, स्पेशल जैन कचोरी, चीज कचोरी देखील मिळते.

मात्र; कचोरीवर प्रयोग केल्यानंतर देखील तिरथराम यांच्या मेन कचोरीच्या चवीला पुढच्या पिढ्यांनी तेवढ्याच आत्मियतेनं जपलेलं आहे. त्यात कुठे ही कसलीही तडजोड केलेली नाही. एवढचं नाही तर त्यांच्या याच चवीला आयएसओ मानांकन देखील मिळवलं आहे.

हे आयएसओ मानांकन मिळण्याचा देखील एक वेगळा किस्सा आहे.

शेगाव येथे काही वर्षांपूर्वी मुंबई येथील एक न्यायाधीश कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी गगन शर्मा यांच्या स्टॉलवरील कचोरीचा आस्वाद घेतला. कचोरीबाबत आणि त्याच्या इतिहासाबाबत ऐकल्यानंतर त्यांनी स्वतःहून शर्मा यांना मानांकनाबाबत सांगितले. शर्मा यांनी या न्यायाधीशांनाच याबाबत मदतीचं आवाहन केलं.

त्यानंतर न्यायाधीशांनी मानांकन देणाऱ्या संस्थेला कचोरीबाबत कळवलं. मार्च २०१३ मध्ये शेगाव कचोरीचं ऑडिट करण्यासाठी खास टिम शेगावात येऊन गेली. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आदी निकष तपासल्यानंतर या संस्थेनं शेगाव कचोरीला आयएसओ ९००१;२००८ मानांकन दिलं आहे.

परदेशात पण पोहचली आहे कचोरी…..

गगन शर्मा सांगतात,

शेगावची ही प्रसिद्ध कचोरी आम्ही परदेशात नेण्यात यशस्वी झालो आहोत. बाहेरच्या देशात  पाठवण्यासाठी खास बनवण्यात येणारी ‘फ्रोजन कचोरी’ ३ दिवस खराब होत नाही. तसेच ही कचोरी फ्रिजमध्ये ठेवली तर ३ महिन्यापर्यंत टिकते.

दुबई येथील एका हॉटेल कंपनीचा शर्मा यांच्याशी करार झालेला आहे. त्यामुळे शेगाव कचोरी दुबईत पोहोचलेली आहे. यापूर्वी शेगावच्या कचोरीनं पाकिस्तान व जपानचा प्रवास केला असून तेथील अनिवासी भारतीयांनी याची चव चाखली आहे.

हे सगळं वाचल्यानंतर आता सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे शर्माच्या कचोरीचं रहस्य काय? 

तर या स्वादिष्ट कचोरीची सारी खासियत त्यातल्या मसाल्यात आहे. तिरथराम शर्मा यांच्या ५ मुलांकडून १६ नातवंडांकडे मसाल्याचा तो फार्म्युला आला आहे. कितीही प्रयत्न केला तरी मसाल्याची रेसीपी शर्मा भावंड कोणालाही सांगत नाहीत. घरातल्या मंडळींशिवाय कोणालाही मसाला तयार करण्याच्या कामात सहभागी करून घेतलं जात नाही.

आलं – लसूण पेस्ट, गरम मसाला, बडीशेप अशा विविध सामग्रींपासून तयार केलेला हा ‘मसाला’ मैद्याच्या आवरणात भरला जातो. हाताचा हलकासा दाब देऊन तेलात सोडलेली ही कचोरी पुरीसारखी फुगते. राजस्थानी कचोरीएवढी शेगाव कचोरी फुगत नाही. बाहेरुन ती काहीशी चपटी परंतु भरीव असते.

शेगाव कचोरीत लाल मसल्याचा वापरही होत नाही. अन्य कचोरीप्रमाणे इथे पुदीना – मिरचीपासून बनवलेली हिरवी चटणी, चिंच – गुळाची गोड चटणी किंवा दहीसुद्धा मिळत नाही. सोबत तोंडी लावायला मिळते ती केवळ मिरची. काही ठिकाणी ही कचोरी तेजतर्रार तिखट केली जाते. तर काही ठिकाणी तिखट आंबट गोड चव सांभाळली जाते.

पण, तिरथराम शर्मा अशी टॅगलाईन असलेल्या कचोरीची चव कोणाच्याही हाताला येणार नाही हे मात्र नक्की….

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.