पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या कामात स्वतःचे रेकॉर्ड नाेंद करणाऱ्या शीला डावरे

आज भारत वेगाने विकसित होणाऱ्या देशांमध्ये गणला जातो, त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे महिला सबलीकरण. आज  भारतातील महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतायेत, आपली एक वेगळी ओळख निर्माण करतायेत. नोकरी सोबतच, व्यवसाय सुद्धा आपल्या हाती घेत, हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.

पण नाही म्हंटल तरी अशी बरीच  पुरुष प्रधान क्षेत्र आहेत, जिथे आजच्या जमान्यात सुद्धा महिलांनी काम करणं  म्हणजे लवकर स्वीकार होत नाही. त्यातलंच एक क्षेत्र म्हणजे रिक्षा चालवणं.

म्हणजे आता बघा ना आपण कधीही रिक्षावाला असा उच्चार करतो पण रिक्षावाली हे सहसा कधी तोंडातून निघत नाही. कारण रिक्षा चालवणं म्हणजे सहसा पुरुषांचचं काम असा एक दृष्टिकोन तयार झालाय.

आता आजच्या जमान्यात असून सुद्धा परिस्थिती अशी आहे, मग विचार करा हेच चित्र तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचं असतं तर गटात न बसणारा शब्द असा काहीसा प्रकार. त्यात सो कॉल्ड चार लोकांच्या चर्चा ह्या वेगवेगळ्या, बाई न फक्त चूल आणि मूल एवढ्याचं गोष्टींवर लक्ष घालावं अशी पुरुषप्रधान संस्कृती,  बाईच्या जातीनं घराचा उंबरठा ओलांडू नये असे स्वघोषित कायदे कानून.

पण या सगळ्या गोष्टींना न जुमानता अनेक महिलांनी सुद्धा त्या काळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, आणि नुसती ओळख नाही तर आपल्या पुढच्या पिढीला कुठल्याही कामात नवीन संधी निर्माण करायची शिकवण दिली. याचचं उदाहरण म्हणजे  देशाच्या पहिल्या महिला रिक्षाचालक.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये शीला डावरे यांची भारताची पहिली महिला  रिक्षा चालक म्हणून नोंद आहे.

शीला या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या. त्यांना लहानपणापासूनचं गाड्या चालवण्याची आवड होती. 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडिलांना रिक्षा चालवायची म्हणून सांगितलं. सहाजिकचं त्या काळात  महिलेनं रिक्षा चालवायची म्हंटल्यावर आई – वडिलांनी नकार दिला, या प्रकरणावरून मोठा वाद सुद्धा झाला.

घरच्यांच्या अशा वागण्यामुळं रागावलेल्या शीला यांनी रेल्वे स्टेशन गाठलं. तिथं बसल्या बसल्या आपल्या नशीबाला दोष देणाऱ्या शीला यांना  समोर एक रेल्वेची लाईट चमकताना दिसली, आणि त्यांनी हिचं संधी मानली आपलं नसीब घडवण्याची. निदान दुसऱ्या ठिकाणी तरी आपल्याला इतका विरोध होणार नाही या विचाराने वयाच्या 18 व्या वर्षी शीला यांनी घर सोडायचा निर्णय घेतला.

जाण्यासाठी म्हणून खिशात हात घातला तर 12 रूपये होते आणि त्या 12 रूपयांवर शिला यांनी पुणे गाठलं.  पुण्यात  रिक्षा चालवायला सुरुवात करायचं त्यांनी ठरवलं, पण इथेही त्यांना दबाव आणि विरोध अशा गोष्टींचा मोठा सामना करावा लागला. बरीचं जण तर वेड्यात काढायची. हे काय लाली – पावडर लावण्याचं काम आहे का? असे टोमणे सुद्धा ऐकायला लागले, पण शीला मागे हटणाऱ्यातल्या थोडी ना होत्या.

शीला यांनी रिक्षा चालवायचीचं हे ठरवलं होतं,पण अडचण अशी होती की त्या महिला असल्या कारणामुळे बरीचं जण त्यांना रिक्षा भाड्याने  द्यायला घाबरायची. लोक हे मान्य करायला तयार नव्हती की एखादी महिला रिक्षा चालवेल.

बरं स्वतः ची रिक्षा घेण्यासाठी खटाटोप केला तर परमीटसाठी त्यांना सगळीकडे  खेटे घालावे लागले, तिथेही त्यांना  उलट-सुलट बोलणं ऐकून घ्यावं लागलं. शीला एका मुलाखतीत सांगतात की, नशीबाला शोधून त्याला लाथ मारून उठवायचं होत.

शेवटी वैतागून त्यांनी थेट परिवहन मंत्र्यांची गाठ घेतली. मला जोपर्यंत परमिट मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, असं एकचं म्हणणं त्यांनी लावून धरलं. शेवटी परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या अर्जावर शिक्का मोर्तब केला आणि शीला यांना रिक्षाचं परमिट मिळालं.

त्यांनंतर हळूहळू पैसे साठवून लोकशाही संघटना आणि युनियनच्या मदतीने स्वतःचा ऑटो विकत घेतला आणि  रिक्षा चालवायला सुरुवात केली.

याच दरम्यान त्यांची भेट झाली शिरीष कांबळे यांच्याशी, शिरीष सुद्धा रिक्षा चालक होते, या दोघा नवरा बायकोने 2001 पर्यंत रिक्षा चालवली. त्यानंतर त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी उघडली.

1988 ते 2001 या दरम्यान म्हणजे वर्ष शीला यांनी ऑटोपासून मॅटाडोरपर्यंत सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवल्या. आज शीला स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी सांभाळतात. 

हे ही वाचा भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.