सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या ‘शेकाप’ला कॉंग्रेसने संपवले होते.

आज राज्यभरातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजप,शिवसेनेत जात आहेत. पाच वर्षांपूर्वी नेते मिळत नव्हते अशी परिस्थिती असणाऱ्या भाजपला आज हरवण्याची हिंमत देखील हे दोन्ही पक्ष गमावून बसले आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि त्यांच्या राज्यातील नेत्यांनी विरोधी पक्षाचं नामोनिशानचं मिटवून टाकण्याची भीष्मप्रतिज्ञा केली आहे आणि त्यात ते जवळपास यशस्वीदेखील झाले आहेत.

या दोन मोठ्या पक्षांच्या पडझडीत आणखी एक छोटा पक्ष देखील आपले अस्तित्व शोधतोय जो एकेकाळी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष होता पण कॉंग्रेसने त्यांना संपवल होतं. त्याच नाव शेकाप

शेतकरी कामगार पक्ष

किती जरी नाकारलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात जातवास्तव हे स्वीकारावंचं लागेल. ब्राम्हण, ब्राम्हणेतर चळवळ हा संघर्षही राज्यात जुनाच आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक सत्यशोधक समाजाची स्थापना करून या वर्ग व वर्णभेदाची मांडणी केली आणि बहुजनाच्या वेगळ्या आवाजाला वाचा फुटली.

तत्पूर्वी महाराष्ट्रात शिक्षणाची पार्श्वभूमी असल्यामुळे व पेशवाईनंतरही राजकीय भान सुटले नसल्यामुळे अल्पसंख्य असूनही ब्राम्हण समाजाचा राजकारणावर पकड होती. टिळकांपासून ते गोपाल कृष्ण गोखलेंच्या पर्यंत दोन्ही टोकाच्या विचारसरणीचे नेते कॉंग्रेसच्या माध्यमातून देशाच्या राजकारणावर छाप पाडत होते. याच काळात कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन मुलांना शिक्षणाची संधी निर्माण करून दिली, पुरोगामी विचाराना पाठींबा दिला व बहुजन चळवळ पुढे आली.

मराठा व तत्सम शेती करणाऱ्या जातींची ग्रामीण भागातील राजकारणावर व अर्थकारणावर बऱ्यापैकी पकड होती. पण राज्यपातळीवर अथवा त्याही वरच्या देशपातळीवर आपले वर्चस्व अजून निर्माण करता आले नव्हते. तरी कॉंग्रेसमध्येच शेतकरी कामगार संघाची त्यांनी स्थापना केली होती.

तो काळ देशाला स्वतंत्र करण्यासाठीच्या लढ्याचा होता. असे अनेक विचारांचे राजकीय प्रवाह महात्मा गांधींच्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली ब्रिटीशांना हाकलून देण्यासाठी एकत्र लढत होते. यानिमित्ताने त्यांचे वैचारिक संघर्ष देखील होत होते पण देशाच्या स्वातंत्र्यापुढे हे वाद त्यांनी मागे ठेवले होते.

१५ ऑगस्ट १९४७ अखेर इंग्रज देश सोडून गेले आणि पं. नेहरूच्या रुपी भारताला पहिला पंतप्रधान मिळाला. घटनासमितीने देशाचे संविधान बनवण्याच्या कामाला वेग दिला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या घटना समितीचे अध्यक्ष होते.

तोवर भाषावार प्रांतरचना झालेली नसल्यामुळे महाराष्ट्र हा गुजरातसह मुंबई प्रांतात येत होता. बाळासाहेब खेर हे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. खेर आणि जेष्ठ गांधीवादी नेते शंकरराव देव  अशा ब्राम्हण नेत्यांचे राज्यातील कॉंग्रेसवर घट्ट पकड होती.

३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करण्यात आला. हा खून नथुराम गोडसे या मराठी तरुणाने केला होता. त्याचे हिंदू महासभा व आरएसएस या संघटनाशी संबंध होते. हिंदू महासभेचे वि.दा.सावरकर यांना देखील याप्रकरणात आरोपी करण्यात आले. या हत्येमागे राज्यातील ब्राम्हण समाजाची सहानुभूती आहे असा आरोप करून त्यांच्या विरुद्ध दंगल पेटवण्यात आली. आरएसएसशी संबंधित व्यक्तींची घरे जाळण्यात आली. अनेक कॉंग्रेस कार्यकर्ते या दंगलीमध्ये उघडपणे सहभागी झाले होते.

गांधीजींच्या विचाराला सोडून केलेली ही कृती कॉंग्रेसपक्षाला शोभणारी नाही असे मत पक्षश्रेष्ठीनी व्यक्त केले.

बाळासाहेब खेर आणि शंकरराव देव यांनी या घटनेचा ठपका कॉंग्रेसमधील शेतकरी कामगार संघाच्या नेत्यांवर ठेवला. केशवराव जेधे, शंकरराव मोरे या नेत्यांनी खेर व प्रभूतीविरुद्ध आघाडी उघडली. कॉंग्रेस हा भांडवलदारांच्या वळचणीला गेलेला पक्ष असून बहुजन समाजाचे हित जपण्यास सक्षम उरला नाही असे आरोप करत त्यांनी आपल्या वेगळ्या पक्षाची स्थापना केली. नाव दिले शेतकरी कामगार पक्ष.

शंकरराव मोरेंनी राज्यभर रान उठवले. त्यांच्या आवाहनाला पाठींबा देत अनेक तरुण या पक्षात दाखल झाले. यात सांगली साताऱ्याला प्रतिसरकार स्थापन करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांच्या क्रांतीकारकांचा देखील समावेश होता.

भाई दाजिबा देसाई, उद्धवराव पाटील, यशवंतराव मोहिते, कृष्णराव धूळप, नारायण नागू पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, विठ्ठलराव हांडे, शंकररावांचे शिष्य व मानसपूत्र एन. डी. पाटील, नागनाथअण्णा नायकवडी  असे अनेक नेते शेकापमध्ये सामील झाले. माधवराव बागल यांचा पाठींबा सुद्धा सोबतीला होता.

सगळेच शेतकरी कामगार संघाचे नेते कॉंग्रेस सोडून गेले असे नाही. यशवंतराव चव्हाणांनी या नव्या पक्षात जाण्यास नकार दिला. उलट आपल्या सहकाऱ्याना त्यांनी स्पष्ट शब्दात सुनावले की,

“मुख्यमंत्री खेर यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल घडवायचा तर कॉंग्रेसमध्ये राहूनच तो समर्थपणे घडवून आणता येईल. नव्या पक्षाचे स्वरूप महराष्ट्रापुरते असून त्याला जातीयतेचा वास आहे, उलटपक्षी कॉंग्रेस हा अखिल भारतीय पक्ष असून पंडीत नेहरूंच्या समाजवादी नेतृत्वाखाली तो देशातला मुख्य प्रवाह आहे.या प्रवाहातून फुटून  वेगळा पक्ष काढल्याने बहुजन समाजाबरोबरच पुरोगामी विचारांचे नुकसान होणार आहे.”

तरी १९५२ सालच्या पहिल्या निवडणुका शेकापने लढवल्या. यापूर्वी आपली वैचारिक बैठक पक्की केली.  शिवाय ब्राम्हणेतर चळवळीचा वारसा तर होताच पण याला जोडणी म्हणून दाभाडी प्रबंधापासून मार्क्सवादालासुद्धा स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोठमोठ्या आंदोलनाचा त्यांना अनुभव होता, शेतकरी, कामगार व शोषितांच्या व=प्रश्नावर लढा देणारी संघटना असे स्वरूप पक्षाला देण्यात आले.

पण लोकसभा निवडणुकीला राज्यातून अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळाला नाही, मात्र विधानसभा निवडणुकीत २८ आमदार निवडून आले. हा शेकापचा सुवर्णकाळ मानला जातो. पक्षातून काही फाटाफूट होत होती मात्र उजव्या विचारांची हिंदूमहासभा, जनसंघ, डाव्या विचारांच्या कम्युनिस्ट पार्टी अशा पक्षांपेक्षा कितीतर पटीने जास्त प्रतिसाद या पक्षाला मिळत होता.

१९५७ साली मराठी भाषिकांचे संयुक्त महाराष्ट्र व्हावे अशी चळवळ जोर धरली. शेकापने या चळवळीला पाठींबा दिला. त्यावेळी आलेल्या लाटेत त्यांचे चार खासदार निवडून आले व  जवळपास ३१ आमदार निवडणुकीत जिंकले होते. शेकापची ताकद ग्रामीण भागात दुर्लक्ष करून चालणार नव्हती.

अखेर पंडीत नेहरूंनी भाषावार प्रांतरचनेला पाठींबा देऊन संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांच्या हाती सोपवला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री झालेल्या यशवंतरावांनी आपल्या जुन्या सहकार्यांना परतीचे आवाहन केले. साखर कारखानदारी व सहकाराच्या माध्यमातून विकास आपल्या गावात शेतकरयापर्यंत पोहचवता येईल ही अशा या नेत्यांना दिसू लागली. अखेर अकलूजचे मातब्बर सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, यशवंतराव मोहिते असे अनेक नेते कॉंग्रेसमध्ये परतले. काही नेत्यांनी कम्युनिस्ट पक्षाची वाट धरली.

स्वातंत्र्यानंतर बहुजन समाजाला एकहाती सत्ता मिळाल्यामुळे ब्राम्हणेतर चळवळ देखील मागे पडली होती. आंबेडकरांना मानणाऱ्या दलित समाजाने शेकाप हा उच्चवर्णीय जमीनदारांचा पक्ष आहे असे मानत त्यांना झिडकारून लावलेच होते. पण सहकाराच्या चळवळीमुळे शेतकऱ्याना देखील चार चांगले दिवस येऊ लागले यामुळे लहान मोठे शेतकरी, शेतमजूर पक्ष सोडून जाऊ लागले. 

आणि शेकापच्या भक्कम घराला चिरा पडायला सुरु झाल्या.

आणीबाणीनंतरच्या लाटेतही शेकापने आपले अस्तित्व दाखवून दिले होते, मात्र हळूहळू हा पक्ष राज्यातल्या वेगवेगळ्या पॅचेसपुरता मर्यादित उरत गेला. ऐंशीच्या दशकानंतर विरोधी पक्षाची जागा शिवसेना,भाजप यांनी भरून काढली. यशवंतरावांनंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या शिवसेनेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करत तिला मोठे करायचेच काम केले. यानंतर हिंदुत्व घेऊन आलेल्या भाजपने देखील राज्यात मोठी मजल मारली.

जागतिकीकरणाच्यानंतर जनतेला डावे विचार कालबाह्य वाटू लागले होते. शेकापचे बरेच नेते सत्तेसाठी कॉंग्रेसमध्ये व नंतर बनलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निघून गेले. निवडणुकीच्या राजकारणात अपयश आले तरीही चळवळीच्या माध्यमातून शेकापचे उपद्रव मूल्य कमी झाले नव्हते.

तब्बल एकवीसवेळा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद शेकापने भूषविले असा दावा केला जातो. हा एकप्रकारचा विक्रमचं आहे.

आज या पक्षाचे एनडी पाटील यांच्यासारखे लढाऊ नेते वयोवृद्ध झालेत. रायगड जिल्ह्यातील जयंत पाटील व सांगोल्यातून  विक्रमी वेळा आमदार राहिलेले जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची एकहाती सत्ता वगळता राज्यात या पक्षाला जनाधार व कार्यकर्ते उरले नाहीत अशी स्थिती आहे. भाजपच्या आक्रमक लाटेत जिथे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांची वाताहत झालीय तिथे शेकापसारखा पक्ष आपल्या अस्तित्वाची शेवटची आच देताना दिसत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.