सोमय्या सध्या आरोप करतायत त्या शेल कंपन्या म्हणजे नेमकं काय ?

सध्या राज्यात हसन मुश्रीफ आणि किरीट सोमय्या वाद चांगलाच पेटलाय. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचे आतापर्यंत दोन घोटाळे उघडकीस आले. यातला पहिला घोटाळा १२७ कोटी तर दुसरा १०० कोटींचा असल्याचे समजते. एवढं नाही तर किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं कि, ते मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा देखील समोर आणणार आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांचा म्हणण्यानुसार मुश्रीफांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा करोडो रुपयांचा घोटाळा केला.

आता या शेल कंपन्यांचा संबंध फक्त मुश्रीफांच्या प्रकरणातचं नाही तर अनिल देशमुख यांच्या घोटाळ्यातही शेल कंपन्यांचा उल्लेख आला होता. अनिल देशमुखांच्या मुलांची झोडियाक डेलकॉम कंपनी कोलकात्यात ज्या पत्त्यावर असल्याचे सांगितली गेली होती, तो शेल कंपन्यांचा हॉटस्पॉट मानला जातो.  

आता बहुतेकांना ही प्रकरणं माहित असतील  माध्यमं देखील सतत अपडेट देतायत, पण त्याचवेळी नेमक्या शेल कंपन्या म्हणजे काय? असा प्रश्न पडला असेल.

तर शेल कंपन्या म्हणजे अश्या कंपन्या ज्या फक्त कागदपत्रावर अस्तित्वात आहेत. कंपनीत गुंतवणूकदार असतात, पण या कंपनीची कोणतीही बिझनेस अॅक्टिव्हिटी नसते, तसेच कंपनीची उलाढाल शून्य असते. कंपनीचे कर्मचारी नसतात, कार्यालयही नसते.  पण इतर ठिकाणी जमा झालेले पैसे जमा करण्यासाठी या कंपनीच्या नावाने बँकेत खाती असतात. म्हणजे काय तर काळा पैसा पांढरा करण्याच्या कॉर्पोरेट पद्धतीला शेल कंपनी म्हणतात. 

शेल कंपन्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही कंपन्या देशांतर्गत म्हणजेच डोमेस्टीक शेल कंपनी. कलकत्त्याच्या लाल बाजार परिसरातच एका पत्त्यावर ३०० कंपन्या आहेत.  तर दुसऱ्या आहेत ओव्हरसीज म्हणजे परदेशातल्या शेल कंपनी. या दोन्ही प्रकारात कंपनीत होणाऱ्या काळ्या पैशांची उलाढाल ही पांढरी करून दाखवली जाते.

अश्या कंपन्यांवर काही वर्षांपूर्वी म्हणजेचं ८ नोव्हेंबर २०१६ नंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता, त्यावेळी मोठी कारवाई करण्यात आली होती. नोटाबंदीमुळे शेल कंपन्यांना मोठा फटका बसला होता.

नोटाबंदीनंतर रद्द केलेल्या जवळपास २ लाख कंपन्यांमधून काळा पैसा पांढरा केल्याचे उघड झालं होत. त्यामुळे तब्बल २ लाख, ९ हजार, ३२ कंपन्यांची नोंदणीचं रद्द करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ५ हजार, ८०० कंपन्यांची १३ हजार, १४० बँक खाती असल्याचे उघड झाल्याचे समजले होते. म्हणजे एका कंपनीची हजारो खाती. एका कंपनीची तर तब्बल २१३४ बँक खाती आढळली होती. 

या बँक खात्यातून करोडोंची उलाढाल झाल्याचं समजलं होत. एकंदरीत काय तर नोटाबंदीमुळे बोगस किंवा शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा झाला.

या संदर्भांत अधिक माहितीसाठी बोल भिडूने कंपनी सेक्रेटरी प्रतिभा टारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं कि,

शेल कंपन्यांचे काही हेतू असतात.  एक म्हणजे जनरल  कंपन्यांमधले शेयर होल्डर, डिरेक्ट्रर जे असतात ते बहुदा आयडेंटिफाय होत नाहीत. दुसरं म्हणजे टॅक्स इल्युजन करायचं असत. म्हणजे एखाद्या कंपनीला भरपूर टॅक्स असतो आणि कंपनीला तो टॅक्स दाखवायचा नसतो. तेव्हा कंपनी टॅक्स डायव्हर्ट करण्यासाठी अश्या शेल कंपन्या तयार करून त्याचा वापर करत.

आता ही शेल कंपन्यांची प्रकरण लवकर समोर येत नाही, जोपर्यंत या कंपन्या मनी लाँडरींग अ‍ॅक्ट २००२, बेनामी ट्रँझॅक्शन अ‍ॅक्ट२०१६, आणि कंपनी अ‍ॅक्ट २०१३ या  कायद्यांचे उल्लंघन करत नाहीत.

सोबतच,  या कंपन्यांचे घोटाळे समोर न येण्यामागची सुद्धा दोन कारणे आहेत. एक म्हणजे या कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यापूर्वी त्या अनेक वेगवेगळ्या खात्यातून फिरून येतात. दुसरं म्हणजे सरकारी लाचलुचपत आणि इतर शोध घेणार्‍या संस्थांवर असलेले राजकीय वर्चस्व. या सगळ्यामुळं या शेल कंपन्यांचा घोटाळा सहसा उघड होत नाही, मात्र यातून करोडो रुपयांची उलाढाल सुरूच असते.

 

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.