फुलन देवीचा मारेकरी शेरसिंग राणा, फुलनदेवीच्याच वाटेवरून जातोय

२६ जानेवारी १९९६. शेखर कपूर दिग्दर्शित ‘बँडीट क्वीन’ प्रदर्शित झाला आणि फुलन देवीची अंगावर काटे उभी करणारी कहाणी लोकांसमोर आली.

तत्पूर्वी ७० आणि ८० च्या दशकात चंबळच्या खोऱ्यातील सर्वांनाच फुलन देवी बऱ्यापैकी माहित झाली होती कारण आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत तिने बेह्माई येथील २२ ठाकुरांची हत्या केली केली होती. मल्लह (नाविक) समुदायातून येणारी फुलन देवी या प्रकारानंतर चंबळमधील ‘रॉबिनहूड लेडी’ म्हणून ओळखण्यात येऊ लागली.  फुलन देवीच्या मनात ठाकूर (राजपूत ) समुदायावर असलेल्या रागाला अनेक कारणं होती यातील एक महत्वाचं कारण म्हणजे फुलन देवीची टोळी आणि ठाकूर टोळीच्या भांडणात फुलनचा विनयभंग झाला होता. एका ठाकूर टोळीतल्या डाकुने तिला विकत घेतलं होतं तर दुसऱ्या एका ठाकूर टोळीतील डाकुने तीला गावभर विवस्त्र फिरवलं होतं. याच रागातून तीने ठाकुरांची हत्या केली होती.

पुढे उत्तर प्रदेशातील अर्जुन सिंग सरकारने फुलन देवीच्या अनेक अटी आणि शर्ती मान्य करत तीचं आत्मसमर्पण घडवून आणलं. नंतर फुलनदेवी सक्रीय राजकारणात आली आणि समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत खासदार देखील झाली. यथावकाश फुलनच्या आयुष्यावरचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. असं म्हणतात की या पुस्तकाच्या रॉयल्टीमधून मिळालेल्या पुस्तकातून फुलनदेवीला इतके पैसे मिळाले की दक्षिण दिल्लीत तीने स्वतःचा बंगला विकत घेतला. ‘बँडीट क्वीन’ याच पुस्तकावर आधारित होता. त्यानंतर एका लब्धप्रतिष्ठीत विकासकाने फुलनसोबत लग्न केलं. हे लग्न देखील वादग्रस्त ठरलं. फुलनदेवीने अनेकवेळा आपल्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली पण ती राहायला मात्र त्याच्याच सोबत होती. २००१ च्या जुलै महिन्यात फुलन देवीची हत्या झाली.

या हत्येच्या दोनच दिवसानंतर एक शेर सिंग राणा नावाच्या ऐन तिशीतल्या युवकाने पत्रकार परिषद घेऊन फुलन देवीच्या हत्येची कबुली देत डेहराडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. चौकशीदरम्यान बेह्माई येथील ठाकुरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपण फुलन देवीची हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर शेर सिंग राणा याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं.

२००४ मध्ये शेर सिंग राणा परत चर्चेत आला कारण त्याने चक्क तिहारमधून धूम ठोकली होती. तिहारमधून पळून गेल्यानंतर तो थेट अफगाणिस्तानात गेला. त्यानंतर २००६ साली त्याला कोलकात्यात पकडण्यात आलं. त्यावेळी आपण पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी भारतात आणण्यासाठी काबुलला गेलो असल्याचं त्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं. विशेष म्हणजे हे अवशेष भारतात आणून उत्तर प्रदेशात पृथ्वीराज चौहान यांचं मंदिर बांधण्याचा चंग त्याने बांधला. पळून जाण्यापासून ते काबुल आणि परत भारतात येईपर्यंतच्या अशा सर्वच घडामोडींचं त्याने व्हिडीओ शूट देखील केलं होतं. कोलकाता येथे अटक झाल्यानंतर त्याला परत तिहारमध्ये पाठविण्यात आलं. खटल्यादरम्यानच्या काळात त्याने  “जेल डायरी- तिहार से कंदहार तक” नावाचं पुस्तक लिहिलं. याच पुस्तकावर आधारित “एंड ऑफ़ बैंडिट क्वीन” नावाचा चित्रपट येणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. ज्यात शेर सिंग राणाची भूमिका नवाजुद्दिन सिद्धिकी साकारणार असल्याच्या बातम्या होत्या.

८ ऑगस्ट २०१४ रोजी फुलन देवी हत्या प्रकरणात शेर सिंग राणा याला स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मधल्या काळात (२०१२) शेर सिंग राणाने उत्तरप्रदेशमध्ये झालेली विधानसभेची निवडणूक जेवर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवली. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. आता पुन्हा एका खटल्यात शेर सिंग राणाचं नांव चर्चेत आलंय. हा खटला आहे सचिन वालिया या भीम आर्मीच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा. शेर सिंग राणा हा राजपूत महासभेचा अध्यक्ष आहे आणि राजपूत समाजातील युवकांमध्ये त्याचा प्रभाव वाढताना बघायला मिळतोय. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील सहारनपूर नावाच्या संवेदनशील जिल्ह्यातील वातावरण सध्या तापलंय.

२०१७ सालापासून शेर सिंग राणा जामिनावर बाहेर आहे. मध्य प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो तेथील राजपूत समाजाला आणि एकूणच हिंदुत्ववादी विचारधारेच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतोय. भरीस भर म्हणजे आपल्या सभांमधून शेर सिंग राणा फुलन देवीच्या इतिहासाच्या पुनरावृत्तीची भाषा करतोय. विशेष म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आणि पाठींबा मिळताना दिसतोय. सध्याच्या परिस्थितीत राजकीय परिघावरचे लोक राजकारणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेला कसलंही बंधन राहिलेलं नसताना उद्या जर मध्य प्रदेशामधूनही एखादा शेर सिंग राणा किंवा कुणी फुलन देवी निवडून आली तर त्याबद्दल नवल वाटण्याचं काही कारण नसावं. कारण राजकीय पटलावरील वाल्याचा वाल्मिकी बनवण्याच्या प्रक्रियेला सर्वपक्षीयांनी आपला हातभार लावलाय. याच प्रक्रियेचं बायप्रोडक्ट म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघायला लागेल.

  • केतनकुमार पाटील

 

Leave A Reply

Your email address will not be published.