शेषन यांचा निवडणूक आयुक्त म्हणून दरारा सुरु झाला याचे श्रेय सुब्रमण्यम स्वामींना जातं…

भारतीय राजकारण्यांना सर्वात जास्त दहशत कोणाची होती असं विचारलं तर एकच उत्तर समोर येईल. ते होते टी एन शेषन.

टी एन शेषन एक आयएएस अधिकारी होते. कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून त्याची कारकीर्द गाजली होती. पण ते संपूर्ण जगात ओळखले गेले निवडणूक आयुक्त म्हणून. या पदावर असताना शेषन यांनी भारतीय राजकीय व्यवस्थेला शिस्त लावली. सगळे पक्ष सगळे नेते यांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. निवडणुकीच्या वेळी मतदान ओळखपत्र सोबत असणं अनिवार्य करणं असेल किंवा राजकीय नेत्यांच्या निवडणूक खर्चावरील प्रतिबंध असेल, हे निर्णय शेषन यांचेच.

ते गंमतीने म्हणायचे,

“I eat politians for breakfast.” 

 

शेषन यांनी बनवलेली आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारी कुठलीही घटना असो, या घटनेतील सहभागी व्यक्ती कितीही मोठ्या पदावरील राजकारणी असो, त्याविरोधात कारवाई करताना निवडणूक अधिकारी भीड बाळगत नसत. 

शेषन यांच्या नंतर भारतीय राजकारण्यांना भीती वाटते ती व्यक्ती म्हणजे सुब्रमण्यम स्वामी.

 भारताच्या राजकारणातील सर्वात रंगीत गृहस्थ. एक तर हे खूप हुशार आहेत, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पण ते कधी काय बोलतील आणि कधी कोणावर आरोप करतील काय सांगता येत नाही.

म्हणूनच  भारताच्या राजकारणात सगळे जण त्यांना घाबरतात. कधी सोनिया गांधी यांना बारगर्ल तर कधी राहुल गांधी यांना बुध्धु म्हणणार तर कधी थेट अटलबिहारी वाजपेयी यांना आडव्या हाताखाली घेतात. आजवरचे सगळे अर्थमंत्री त्यांच्या रडारवर असतात. अनेक सिक्रेटचा खजिना स्वामींकडे असतो. आजच्या राजकारणात थेट नरेंद्र मोदींना आर्थिक धोरणावरून शिव्या घालण्याचं धाडस फक्त सुब्रमण्यम स्वामीच करतात. 

जी गोष्ट बोलायला इतर लोक शंभर वेळा विचार करतात ती गोष्ट स्वामीजी बिनधास्त बोलून जातात. त्यामुळे त्यांची दहशत आजही कायम आहे.

मागे स्वामींनी एक ट्विट केलं. काहीजणांना पटलं नाही पण गोष्ट खरी होती. 

भारतात टी एन शेषन यांच्यासारखे निवडणुक आयुक्त घडले याचं श्रेय सुब्रमण्यम स्वामी यांना जातं. 

आता हे सुब्रमण्यम स्वामी सांगतात म्हटल्यावर सगळ्यांना खोटं वाटू शकतं. पण तस नाही स्वतः टी.एन शेषन यांनी सुद्धा आपल्या आत्मचरित्रात ते लिहून ठेवलं आहे. 

साठच्या दशकात सुब्रमण्यम स्वामी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षक होते. नेमके याच काळात म्हणजे वर्ष सांगायचं झालं तर १९६८ साली टी.एन.शेषन यांना सरकारने पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा कोर्स करण्यासाठी हार्वर्ड मध्ये पाठवलं. योगायोगाने स्वामीजी त्यांना इकॉनॉमिक्स शिकवायला होते. दोघेही दक्षिण भारताचे, तिथेच त्यांचे सूर जुळले.

कित्येकदा सुब्रमण्यम स्वामी शेषन यांच्या घरी नाश्त्याला जायचे. शेषन यांची बायको खूप मस्त मसाला डोसा करायची असंही स्वामीजी सांगतात. पुढे शेषन भारतात आले आणि काही वर्षांनी जनसंघाच्या आग्रहामुळे सुब्रमण्यम स्वामी देखील भारतीय राजकरणात आले. 

आणिबाणीनंतरच्या जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांनी महत्वाचा रोल बजावला. जेव्हा जेव्हा जनता सरकारे आली तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांना मोठी मंत्रीपदे मिळाली. 

जेव्हा चंद्रशेखर पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात सर्वात जेष्ठ सदस्य म्हणून सुब्रमण्यम स्वामी यांना वाणिज्य व कायदा खात्याचं मंत्री बनवण्यात आलं होतं. कायदा मंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यातच एक निर्णय म्हणजे इलेक्शन कमिशनचा आयुक्त म्हणून शेषन यांची नेमणूक.

सुब्रमण्यम स्वामी सांगतात की, 

खरं तर पंतप्रधान चंद्रशेखर आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी या दोघांनीही शेषन यांना निवडणूक आयुक्त करू नका असं सांगितलं होतं पण तरीही मी हा निर्णय घेतला.

पुढे इतिहास घडला.

१२ डिसेंबर १९९० रोजी शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आणि पुढची  ६ वर्षे त्यांनी अक्षरशः गाजवली. राजकीय पक्षांव्यतिरिक्त सामान्य जनतेला फारशा माहित नसलेल्या निवडणूक आयोगाला त्यांनी लोकाभिमुख बनवलं आणि निवडणूक आयोगाच्या अपार शक्तीची जाणीव त्यांनी देशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना करून दिली. 

शेषन यांची आणि सुब्रमण्यम स्वामी यांची मैत्री पुढे देखील अशीच कायम राहिली.

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.