शेतकरी संघाचा बैल हा कोल्हापूरच्या सहकारी चळवळीची ओळख होता.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजल्याच चित्र आज आपल्याला दिसतं. हा सहकार रुजवण्यात मोठ्या नेत्यांचं योगदान आहे. पण त्याच बरोबर काही संस्थांनी पण हा सहकार रुजवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. यात अग्रक्रमावर आहे कोल्हापूरचा शेतकरी संघ.

शेतकरी संघाचा बैल हा कोल्हापूरच्या सहकारी चळवळीची ओळख होता.

भारताच्या सहकारी चळवळीच्या इतिहासात कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघाचे स्थान अव्वल आणि महत्त्वाचं आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील शेतकऱ्यांच्या हालाखीची परिस्थितीची वेदना जाणून रावसाहेब पी. ए. राणे यांनी २३ ऑक्‍टोबर १९३९ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.

सावकारी कर्जाच्या पाशात गुरफटत जाणाऱ्या कृषीपुत्रांना आर्थिक स्थैर्य सुबत्ता मिळावी व त्यांचं राहणीमान सुधाराव या हेतूने स्थापन केलेल्या शेतकरी संघाच्या वाटचालीला लवकरच गती मिळाली. सरकार दरबारी नोकरीत असूनही रावसाहेब पांडुरंगराव राणे यांनी सकाळ-संध्याकाळ संघाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं.

अगदी पहाटेपासूनच ते स्वतः शेतकऱ्यांशी संवाद साधत व त्यांच्या बैलगाड्या संघाकडे वळवत आगाऊ रक्कम देऊन त्यांच्या गावाकडे पाठवण करीत. संघाच्या उन्नतीसाठी पूर्ण वेळ देऊ शकणारी व्यक्ती म्हणून यळगुडचे तात्यासाहेब मोहिते यांना संस्थेत येण्यास रावसाहेबांच्या सहकारी मित्रांनी सुचवलं.

तोडकर वकील, डी. आर. भोसले, ग. गो. जाधव, बी. टी. पाटील, मामासो मिणचेकर, बापुसो राजाज्ञा, डी. एस. पाटील यांसारख्या गुणी सामाजिक हेतू जपणाऱ्या सहकाऱ्यांनी रावसाहेबांच्या या स्वप्नवृक्षाच्या वाढीसाठी मोलाची मदत केली. १९४४ साली राणेंची शिरोळ तालुक्यात मामलेदार म्हणून बदली झाली. कामाच्या वाढत्या दगदगीमुळे त्यांची प्रकृती बिघडत गेली.

अशा कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी, तात्यासाहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संघाची वाटचाल प्रगतीपथावर सुरूच ठेवली. तत्कालीन वरिष्ठ सहकारी अधिकारी कलेक्टर राम साहेब यांच्या सहाय्याने सरकारी नियंत्रित वस्तूंची एजन्सी संघाला मिळाली. पुढे संघाचे तालुकावार शाखा व डेपो उघडण्यात आले. शेतीकामासाठी उपयुक्त लोखंडी वस्तू, इंजिने, घाणे, काहिली, सिमेंट, अन्नधान्य यांची घाऊक खरेदी करून काही वस्तूंची एजन्सी घेऊन अत्यल्प नफा ठेवून विक्री सुरू करण्यात आली.

शेतकरी बांधवांना सोबत सामान्य लोकांनाही याचा फायदा झाला.

शेतकरी संघाविषयी लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले. १९५३ साली वडगाव ऑइल मिल, स्वतंत्र डिझेल विभाग,१९५५ ला बैलछाप मिश्र खतांचा कारखाना, १९५८ मध्ये वस्तू व वस्त्र भांडार, १९५८ ला माती पाणी खते यांच्या परीक्षणासाठी प्रयोगशाळा आणि याच वर्षी रात्रंदिवस सेवा देणारे औषध दुकान अशा अनेक उपक्रमातून ग्राहकांची सेवा करण्याचे ब्रीद सांभाळले.

या संस्थांच्या सचोटीच्या व्यवहारातून अल्प नफा घेऊन सुद्धा व्याप्ती वाढल्यामुळे कोट्यावधी रुपयांची गंगाजळी व स्थावर-जंगम उत्पन्न संस्थेने उभारले. मुंबई पेठेचा व्यापारी संबंध महत्त्वाचा असल्यामुळे मुंबई सुद्धा शाखा उघडली. पण काही कारणाने ही शाखा लवकरच बंद पडली. पुढे पुण्यात शाखा सुरू करून भांडी, मुद्रण, औषधे, कापड इत्यादी माला बरोबरच रवा, मैदा, साखर अशा सरकार नियंत्रित मालाच्या वितरणाची जबाबदारी या शाखेने स्वीकारली आणि पार पडली.

सुरुवातीला शाहूपुरीतील व्यापारी पेठेतील छोट्याशा जागेतील प्रशासकीय कार्यालय, जुन्या राजवाडा जवळील प्रशस्त जागेत १९५८ सालात आले. अनेक व्यापाऱ्यांचा विरोध असताना सुद्धा संघाची पेठ व गोदामे शहराबाहेर मार्केट यार्ड येथे नेण्यात आली. कालांतराने या निर्णयाची योग्यता समजल्याने विरोध करणारे व्यापारी पण मार्केट यार्डात आले.

पण या दगदगीतून प्रकृती ढासळल्याने तात्यासाहेब मोहिते १९५९ रोजी निर्वतले. संघावर मोठा आघात झाला. पण वाटचाल होत राहिली. पुढे संघाचा व्याप वाढत गेला. रसायन शाळा, बियाणे, शेती, विकासकेंद्र, शेतीसाठी औषधे, कीटकनाशके या सेवांसाठी अनुभवी व तज्ञ शेतकी अधिकारी नेमले गेले. मध्यंतरीचा काही काळ संघाच्या दृष्टीने फारसा आशादायक नव्हता. तरीही पुन्हा नव्या जोमाने, दमाने ज्येष्ठांकडून प्रेरणा घेऊन अजित सिंह मोहिते, वसंतराव मोहिते यांच्या कर्तबगार नेतृत्वाने संघाला पुन्हा उभारी मिळाली.

१९३९ मध्ये लावल्या गेलेल्या इवल्याशा रोपट्याचा वेलू आज गगनभरारी घेत आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.