” ऊस नव्हे काठी आहे, भ्रष्ट साखर सम्राटांच्या पाठी आहे ” आवाज मावळला.

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ऊसाचा पट्टा, याच पट्ट्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केलं ते अजित नरदे यांच्यासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, मात्र ज्यावेळी शेतकरी संघटनेत फूट पडली ती सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, जयसिंगपूर परिसरातच.

पण अजित नरदे यांनी शरद जोशी यांची साथ सोडली नाही. तर २००२ पासून सुरू झालेल्या ऊस आंदोलनात ” ऊस नव्हे काठी आहे, भ्रष्ट साखर सम्राटांच्या पाठी आहे ” ही त्यांची घोषणा महाराष्ट्रभर गेली, पण हा घोषणा देणारा आवाज मंगळवारी थांबला.

अजित नरदेंच्या निधनाने शेतकरी चळवळीतल्या थिंक टँक मधला एक तारा निखळला.

१९८३ ला अजित नरदे यांनीच कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. तत्पूर्वी ते मुंबईत पत्रकार होते तिथे निळू दामले वरिष्ठ, तर निखिल वागळे त्यांचे सहकारी होते. त्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने व वाचन, अभ्यासू , संशोधक वृत्ती असल्याने त्याचा उपयोग खुल्या अर्थव्यवस्थेचा विचार मांडताना व शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी झाला.

नरदे हे शेतकऱ्यांचे पंचप्राण, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशींचे निकटचे सहकारी होते. साखर धंद्याबाबत त्यांना विपुल माहिती होती. गुजरातमध्ये साखर कारखाने कसे काम करतात ? ऊसाला कसा दर देतात? हे वारंवार गुजरातमध्ये जाऊन त्यांनी अभ्यासले. व ते संघटनेद्वारे महाराष्ट्रपुढे मांडले.

सन २००२ साली ऊस दर आंदोलनाची सुरवात झाली. त्यासाठी अभ्यासपूर्ण माहिती त्यांनीच पुरवली होती.

त्यावेळी गाजलेल्या ” ऊस नव्हे काठी आहे, भ्रष्ट साखर सम्राटांच्या पाठी आहे ” या पोस्टरचे जनक अजित नरदे होते. त्यानी अनेक कार्यकर्ते मार्गदर्शन करून घडवले . नोव्हेंबर २००० मध्ये मिरज येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात प्रसिध्दी विभागाचे काम त्यांनी सांभाळले.

मध्यंतरी व्यावसायिक व्यग्रमुळे संघटना कामात सहभागी होण्यासाठी मर्यादा पडल्या. त्यावेळी सहकाऱ्यांना त्यांनी पुढे केले. कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनेत पहिल्यांदा शिरोळ तालुक्यात फूट पडली.

मात्र अजित नरदेनी शरद जोशींची साथ सोडली नाही.

अलीकडे भारतात HTBT , BT या GM  पिकांना परवानगी मिळावी यासाठी संघटने च्या तंत्रज्ञान आघाडीचे काम ते जोमाने करत होते.किंबहुना भारतीय शेती व GM तंत्रज्ञान याबाबतीत देशातील अभ्यासक म्हणून ते एकमेवद्वितीय होते. GM विषयी त्यांनी हरियाणा, दिल्ली सह महाराष्ट्र राज्यात भरपूर प्रयत्न केले.

२९ जानेवारी रोजी जयसिंगपूर येथे पायी जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना ठोकरले. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु सोमवारी न्यूमोनियाचा त्रास सुरू झाल्याने रात्री मिरजेला हलवण्यात आले होते, तेथेच मंगळवारी पहाटे प्राणज्योत मालवली शेतकरी चळवळीचा अभ्यासू, धडपड्या पाईक अनंतात विलीन झाला .

  • प्रवीण शिंदे सांगली

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.