नेम हुकलेला गेम “शिकारी”

फँटसीमाय पावली होती. थेटरात रांगेच्या मधोमध शोधत मी माझ्या ‘सीट’ पाशी थांबलो होतो. उजव्या बाजूला सुंदर साडी नेसलेली स्त्री होती आणि डाव्या बाजूला वखवखलेल्या विशीतल्या मुलांची गॅंग. मध्ये मी. इतकी सुंदर ही आणि कचकाऊन सेक्सी अशा या पिक्चरला रात्रीची का बरं आली असेल? असा ‘चान्स’ पुन्हा नाही. इंटरवल मध्ये ओळख काढुच. फँटसी मातेनं तडक बसवलं. निमशहरी फट्टू चोरनजरेनं कपाळावर दव साचलं. थेटरात अंधार झाला. सेन्सॉरवाल्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट स्क्रीनवर झळकलं तेवढ्यात त्या स्त्री ने बाजूच्या पुरुषासोबत जागा बदलली. त्यांचं नुकतंच लग्न झालं असावं बहुतेक.

सुरुवातीलाच वाटलेली स्वतःची शरम ‘शिकारी’ फिल्म ने कायम वाढवत ठेवली. सेक्स समाज आणि सिनेमा यांच्या त्रैराशिक समीकरणाचे संतुलन विस्कटलेलेच असते. त्यात पुन्हा शिकारी ने समाज आणि सिनेमाच्या किमती शून्य ठेऊन फक्त सेक्स चे उथळ गणित मांडले आहे. गावाकडे राहणाऱ्या पण हिरोईन बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका लग्न झालेल्या स्त्रीची (नेहा खान) ही गोष्ट आहे. अर्थात गाव कुठलं, त्यांचे सामाजिक-राजकीय संदर्भ काय वगैरे फालतू प्रश्नांना उत्तर म्हणून दिग्दर्शकाने डोंगर, नदी, बोटीतला प्रवास अशा गोष्टी दाखवल्या आहेत. भाषेवरून गाव पश्चिम महाराष्ट्रातलं असावं असा अंदाज निघालाच तर गावातला भटजी नाकातून कोकणी मराठी बोलायला लागतो. तर ही स्त्री सदासर्वकाळ अस्सल मराठी ‘टू पीस’ मध्ये एकतर आंघोळ करत असते नाहीतर पदर ढाळत चालत असते. अशा समीकरणात 61-62 ह्या महत्वाच्या किमती असतात, ही दिग्दर्शकाची नजर लगेच लक्षात येते. त्या स्त्रीला गावातला नुकताच लग्न झालेला( सुव्रत जोशी ) पण बायकोच्या ( मृण्मयी देशपांडे )  सेक्सच्या बाळबोध अज्ञानामूळे मोकळा न झालेला तरुण हेरतो आणि हिरोईन बनवण्याचे स्वप्न दाखवून मुंबईला नेतो. तिथे तिला शिकारी निर्मात्यांच्या कास्टिंग काऊचला बळी पडावे लागते. असा एकूण पटकथेचा धोपट प्रवास आहे. बाकी बारकाव्यासाठी 86 सालचा ‘अनुभव’ हा हिंदी सिनेमा पाहिला तरी चालेल.

लॉजिक नावाच्या गोष्टीला दिग्दर्शकाने कितीही तंग चोळीला बांधले तरी काही महत्त्वाचे प्रश्न राहतातच. लैंगिक शोषण हे सर्वच क्षेत्रात तितकेच लिंगनिरपेक्ष ठसठशीत दुखणे आहे. चित्रपटसृष्टी त्याला अपवाद नाही. पण नाटकसिनेमातल्या स्त्री कलाकारांविषयी सामान्य मराठी माणसाचे बालगंधर्वांच्या काळात असलेले गैरसमज आज ही तसेच आहेत का? सिनेमात काम करणारे काम करत नसतातच फक्त ‘काम’च करत असतात असंच अजूनही लोकमत आहे का? स्किन करन्सी शिवाय मोठा ब्रेक मिळत नाही असं मध्यमवर्गीय गृहीतक आजही टिकून आहे का? गावगाड्यातून येणाऱ्या कित्येक स्त्री कलाकारांकडे पाहिल्यास याचं उत्तर ‘नाही’ असं द्यावं लागेल. कास्टिंग काऊच च्या घटनांमागची मानसिकता, शोषिताची घालमेल याकडे पाहताना कोणत्याही सुज्ञ माणसाला करुणा वाटावी, चीड यावी तर या भावनिक बाजूला दिग्दर्शकाने सवंग व्यावसायिक विनोदनिर्मितीने फाट्यावर मारलेले आहे.

पारशी नाटकांच्या प्रभावाने हिंदी सिनेमा खतरनाक मेलोड्रामॅटिक झाला. राज कपूर ते करण जोहर पर्यंत अजूनही मुख्य प्रवाहातला हिंदी सिनेमा त्याच ह्रेटॉरिक मध्ये अडकलेला आहे. फक्त पुण्यामुंबईपुरत्या असणाऱ्या तद्दन मराठी व्यावसायिक नाटकांचा प्रभावही असाच मराठी सिनेमाची वाढ खुंटवताना दिसतो आहे. सिनेमातली दृश्यरचना (mise en scene) व्यावसायिक नाटकांसारखी उथळ आणि कार्यकारणभावरहीत होते आहे. लोकपरंपरेतले वगनाट्य, तमाशा, शाहिरी जलसे यांच्या अस्सलपणाकडे फक्त विनोदाने पाहिल्या गेलं त्यामुळे आपल्या दृश्यात्मक भाषेत मोठी पोकळी तयार झाली. वर्गव्यवस्थेतल्या ठराविक वर्गाच्याच भावनिक विरेचनाचं साधन मराठी सिनेमा बनत असल्याचं हे लक्षण आहे का?

आता प्रश्न खरा प्रेक्षकांचा आहे. सतत पदर पाडणारी उत्तान हिरोईन आहे म्हणून सिनेमा बोल्ड होतो का? लगेच मराठी सिनेमा वयात आला, कात टाकतोय अशा बाता करणं योग्य आहे का? सेक्स हा मराठी सिनेमासाठी अजूनही अनभिज्ञ प्रदेश आहे. गँग्ज ऑफ वासेपुरच्या वेळी मुलाखतीत अनुराग कश्यपने त्याची सर्वात मोठी खंत व्यक्त केली होती. तो म्हटला “लोग गलत चिजोपे हस्ते है। वासेपुर मे लोग गालियोपे हस रहे थे।” शिकरीमध्ये मात्र डबल मिनींग संवादाचा भडीमारच यासाठी आहे. ‘धरलं’, ‘उठवलं’, ‘गळून गेलं’ यातला विनोद मलाच कसा कळला आहे हे हसून दाखवण्यात प्रेक्षकांची दमछाक होत असावी. व्यावसायिक म्हणून तुमच्यापुढे काहीही फेकलं तरी गोड मानून घ्यायची तयारी लोकांची झालेली दिसते. यापेक्षा दादा कोंडके खरे बोल्ड. जे आहे ते सरळ असंच आहे उद्देश आणि निर्मितीत बनचुकेपणा नव्हता. मात्र आताचा हा प्रेक्षक जोपर्यंत वयात येत नाही तोपर्यंत सिनेमाच काय इथे काहीच बोल्ड होऊ शकत नाही. माझा चित्रपटक्षेत्रातलाच एक मित्र म्हणतो की महाराष्ट्रात फक्त दोन प्रकारचे सिनेमे चालतात एक सप्रेस्ड सेक्स वाले आणि दुसरे नॉस्टॅल्जीयावाले. दुर्दैवाने बोल्ड सिनेमाच्यानावाखाली ओल्डच गोष्टी दाखवणारे, हास्य क्लबला आल्यासारखे वागणारे वयात आलेले प्रेक्षक, जागेची अदलाबदल केलेलं विवाहित जोडपं आणि मी, आपण सर्वच  सप्रेस्ड सेक्सच्या फँटसी शमवण्याकडेच ‘प्रगती’ आणि ‘विकास’ करत आहोत.

 

फळाची अपेक्षा प्रत्येकालाच असते. शिकारी फिल्मसाठी आम्ही देतोय दोन केळं.

  • अरविंद जोशी –  8149073103