पुण्याच्या विकासात शीख समाजाचं मोठ्ठ योगदान आहे

गुरुद्वाऱ्याचे मंगलमय वातावरण, रंगेबेरंगी पगड्या, जो बोले सो निहालच्या घोषणा, शिस्तबद्ध रीतीने सुरु असलेलं लंगर. हे दृश्य बघून वाटेल कि पंजाब मधला हा गुरुद्वारा असेल. पण नाही हे दृश्य आहे पुण्यातलं.

पेशवाईपासूनच मंदिराचं गाव म्हणून ओळख मिळालेल्या पुण्यात आज जवळपास २०च्या वर गुरुद्वारे आहेत. याच पुण्यात न आणि ण चा उच्चार परफेक्ट करणारे, अस्खलित मराठी बोलणारे पंजाबी लोक राहतात. पुण्याचा महापौर पदी एक शिख माणूस बसतो, इथले अनेक उद्योगधंदे शीख पंजाबी व्यक्तींनी सुरु केले आहेत.

पुण्याच्या विकासात शीख समाजाचाही सिंहाचा वाटा आहे. पण मूळ प्रश्न हा पडतो की पंजाब सोडून हा शीख समाज पुण्यात आला तर कधी?

तस बघायला गेलं तर पंजाबच आणि महाराष्ट्राचं नातं खूप जुनं आहे. तेराव्या शतकात संत नामदेव पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी तब्बल वीस वर्षे तिथे काढली. त्यांचे अनेक अभंग गुरुग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट करण्यात  आले. आजही शीख परंपरेत भगत नामदेव असा उल्लेख अतिशय आदराने केला जातो.

औरंगजेबाच्या विरोधात छत्रपती महाराजांनी महाराष्ट्रात स्थापन केलेले स्वराज्य आणि या मातीत राष्ट्रवाद  रुजवला, त्याच काळात पंजाबमध्ये गुरु गोविंदसिंह यांनी औरंगजेबाच्या दडपशाही विरोधात लढा सुरु केला होता. स्वाभिमान आणि तलवारीचे शौर्य हा पंजाब आणि मराठी मातीचा समान धागा.

अगदी स्वातंत्र्यलढ्यात देखील पंजाबचे भगतसिंग आणि पुणे जिल्ह्यातील शिवराम राजगुरू यांनी एकत्र येऊन सशस्त्र क्रांतीचा उठाव केला होता. इतिहासात असे अनेक दाखले मिळतील.

पण पुण्यात शिखांचं आगमन मात्र १९३० च्या दशकात झालं.

ब्रिटिशांनी लष्कराच्या सदर्न कमांडच मुख्यालय पुण्यात केलं आणि शीख रेजिमेन्टच्या निमित्ताने पंजाबी जवान पुण्यात येऊ लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करासाठी लागणाऱ्या सामान वाहण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिल्ली पंजाबमधील काही वाहतूक व्यावसायिकांना मिळालं. त्यांचे ड्रायव्हर म्हणून आलेले शीख पुढे पुण्यातच रमले. इथेच त्यांनी आपले वाहतुकीचे व्यवसाय सुरु केले आणि मेहनत करून वाढवले.

जालंधरवरून ड्रायव्हर म्हणून आलेल्या भोलासिंग मोखा यांनी पुण्यात खऱ्या अर्थाने पहिला जम बसवला. त्याकाळात वाफेवर चालणाऱ्या इंजिनाच्या बसगाड्या होत्या. कोळसा आणि वाफ यांच्या माऱ्यामुळे अशा बस चालवणे हे अत्यंत अवघड काम असायचे.  कित्येकदा ही वाहन चालवतांना चालक बेशुद्ध होऊन पडत असत.

पण भोलासिंग मोख यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि पुणे-जुन्नर-मंचर या मार्गावर बस चालवायला घेतली, चार आणे पगारावर सुरवात करून पुढे स्वतःचाच वाहतूक व्यवसाय सुरु केला. त्यांच्या पुढच्या पिढ्या पुण्यातच रुजल्या. पुण्यात वसलेलय पहिल्या शीख कुटुबांपैकी हे एक.

फक्त वाहतूक व्यवसाय नाही तर पुण्याच्या बांधकाम व्यवसायातदेखील शीख समाज उतरला. छोटी छोटी घरे बांधण्यापासून ते मोठमोठी प्रोजेक्ट खात्रीशीर रित्या पूर्ण करणारे कॉन्ट्रॅक्टर म्हणून शीख तरुणांना ओळखलं जाऊ लागलं. दरबारा अहलुवालिया यांनी मॉडेल कॉलनी परिसरात त्याकाळात आकर्षण ठरलेली वसाहत उभारली. ती आजही दरबार कॉलनी म्हणून ओळखली जाते.

१९४५ साली पुण्यात स्थिरावलेल्या शीख समाजाने गणेश पेठेत गुरुसिंग सभा या संस्थेच्या माध्यमातून पहिला गुरुद्वारा उभा केला. पुढे तिथेच धर्मशाळा आणि विद्यालय देखील सुरु करण्यात आलं. भोलासिंग मोखा हेच या संस्थेचे कर्ताधर्ता  होते. समाजसेवा करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना सोबत घेऊन त्यांनी ही संस्था मोठी केली.

त्या पूर्वी जेव्हा पुण्यात एकही गुरुद्वारा नव्हता तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शिखांना पुणे कँन्टोन्मेंट एरियामध्ये हॉलिवूड क्लबच्या विस्तीर्ण जागेतील एक भाग शिखांना गुरुद्वारा म्हणून वापरण्यास दिला. स्वातंत्र्यानंतर याच जागेचे रूपांतर गुरुद्वाऱ्यात करण्यात आले. आजही या गुरुद्वाऱ्याला हॉलिवूड गुरुद्वारा म्हणून ओळखलं जातं.

या हॉलिवूड गुरुद्वाऱ्यात असलेल्या रुग्णालयात सर्वजाती धर्माच्या गरजू रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात.

फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली आणि या भागात राहणारा पंजाबी व सिंधी परिवार निर्वासित झाला. पोटापाण्यासाठी वणवण भटकत यातील अनेक कुटूंबे पुण्यात येऊन वसली. त्यांनी बेकरीपासून ऑटोमोबाईल पर्यंत अनेक उद्योगात त्यांनी प्रवेश केला.

१९४७ साली रास्ता पेठेत सुरु झालेलं हरबन्ससिंग छाबरा यांचं महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन हे दुकान आज दहा शाखेत सुरु आहे.

याच शीख समुदायातून आलेल्या दिलबागसिंग यांनी पुण्यात पुन्हा गाडगीळ रांका ज्वेलर्स यांना तगडं आव्हान देणारी नीलकंठ ज्वेलर्सची स्थापना केली. फक्त उद्योग व्यवसायात नाही तर इंद्रसिंग गिल, सुरेंद्रपाल सिंग आनंद,हरजितसिंग अजमानी असे अग्रगण्य वकील, डॉ.एसपी चढ्ढा, बालरोगतज्ज्ञ दशमीतसिंग असे डॉक्टर देखील प्रसिद्ध झाले.  

गेल्या काही वर्षात देखील आयटीच्या नोकरीच्या निमित्ताने पंजाबातून अनेक तरुण तरुणी हिंजवडी, वाकड, बाणेर या भागात स्थलान्तरित होताना दिसतात. 

दुधात साखर विरघळावी अशा पद्धतीने पुण्यात शीख समाज सामावून गेला. इथल्या प्रगतीला हातभार लावत राहिला. मोहनसिंग राजपाल सारख्या पगडीधारी शीख नेत्याने पुण्याचा महापौर होऊन दाखवलं आणि आपली छाप सोडली. पहिले जागतिक पंजाबी संमेलन पुण्यातच आयोजित करण्यात आलं.

आजही जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर हा पुण्यातला शीख समाज स्वतःला पुणेरी म्हणवून घेतो आणि पुणेरी मराठीतच संवाद साधतो हे विशेष.

संदर्भ- अस्सल पुणेरी जो बोले सो निहाल : राजीव साबडे 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.