अजिंक्य समजल्या जाणाऱ्या भाजपचा पराभव या घोषणेमुळे झाला होता का?

१३ मे २००४. भारताच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले होते. भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला होता. गेल्या दोन तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयीनां पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल हे कोणाला स्वप्नात देखील वाटल नव्हत.

त्याहूनही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस परत सत्तास्थानी येईल हे कोणाला वाटत नव्हत.

राजीव गांधींच्या मृत्यूनंतर देशभरातील कॉंग्रेस आकसत चालली होती. तिचे अनेक तुकडे झाले होते. नरसिंहराव याचं सरकार गेल्यापासून तर कॉंग्रेसमध्ये अनागोंदी माजली होती. रोज कोणीना कोणी नेता पक्ष सोडून जात होता. एकंदरीत हा पक्ष काही वर्षात नामशेष होईल असच सगळ्यांना वाटत होतं.खुद्द कॉंग्रेसवाल्यांना माहित नसेल की आपण सरकार स्थापन करू.

भाजपचे तब्बल ४४ खासदार कमी झाले होते. फक्त कॉंग्रेसच नाही तर समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी असे अनेक पक्ष यांना फायदा झाला होता. भाजपच्या एनडीएचा स्पष्ट पराभव झाला होता.

हा चमत्कार कसा घडला?

याची अनेक कारणे सांगितली गेली. जिंकणाऱ्याच श्रेय घ्यायला अनेक जण येतात मात्र हरणाऱ्याचे वाटेकरी कोणी नसतात. भाजपच्या अनपेक्षित हाराकिरीच श्रेय देण्यात आल एका स्लोगनला.

“इंडिया शायनिंग”

स्लोगनमुळे वाजपेयींचे सरकार पडले यावर विश्वास ठेवणे शक्यच नव्हते. पण तरी अनेक राजकीय पंडितांनी तसाच निष्कर्ष काढला होता. भाजपचा प्रचाराची मुख्य जबाबदारी होती प्रमोद महाजन यांच्याकडे. अनेक वर्ष माहिती व प्रसारण मंत्रालय सांभाळलेले प्रमोद महाजन हे वाजपेयींचे लाडके समजले जात होते. अगदी 2 खासदारांचा पक्ष असलेल्या भाजपाला मोठे करण्यात ज्या नेत्यांची मेहनत होती त्यात प्रमोद महाजन यांचा समावेश व्हायचा.

अडवाणींच्या रथ यात्रेची आयडिया त्यांची. शिवसेनेबरोबर युतीची आयडिया त्यांचीच.

अगदी कमी वयात ते भाजपच्या वरच्या वर्तुळात गणले जात होते. त्यांना भाजपचा चाणक्य आणि भावी पंतप्रधान अस समजल जात होतं. भाजपसोडून इतर पक्षांशी देखील महाजनांचे चांगले संबंध होते. निवडणुकीसाठीच्या बेरीज वजाबाकीमध्ये ते वाकबार होते.  शायनिंग इंडिया ही त्यांचीच आयडिया होती अस म्हटल गेल.

या प्रचाराचा प्रमुख भर अटलजींच्या काळात देश कसा बदलला यावर होता. भारत उदय होतोय याला धरून हे कॅम्पेन डिझाईन करण्यात आले होते. प्रचारातील फोटो मध्ये सगळे हसरे चेहरे दाखवले होते. सर्वत्र सगळ चांगल चालल आहे, शेतकरी खुश आहेत, अर्थव्यवस्था चांगली आहे, महिला वर्ग, तरुण वर्ग सगळ्यांच्या अपेक्षा सरकार पूर्ण करतंय याला धरून ही प्रचारव्यवस्था काम करत होती.

याला नावच दिल होत फील गुड फॅक्टर.

लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजस्थान मधील निवडणुकामध्ये याच ट्रायल घेण्यात आलं. भाजपला तिथे प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. त्या निवडणुका सहज त्यांनी खिशात टाकल्या. यामुळेच अतिआत्मविश्वासात संपूर्ण देशात हाच  कॅम्पेन प्रचार करण्यात आला.

प्रचंड पैसा ओतण्यात आलेल हे इलेक्शन कॅम्पेन भारतातील आत्ता पर्यंतच सर्वात हायटेक आणि भव्य अस समजल जात होतं. प्रत्येक मतदाराला फोनवर वाजपेयीजींचा संदेश, मोबाईल धारकांला एसएमएस गेले होते. शॉपिंग मॉलचा झगमगाट, आयटी क्षेत्रातील कंपन्याची प्रगती, शेअर मार्केटमधील बूम प्रत्येकाच क्रेडीट वाजपेयींच्या आर्थिक धोरणाला देण्यात आल होतं.

इतक असूनही आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, तामिळनाडू अशा कृषीप्रधान राज्यात भाजपला मोठा फटका बसला. महाराष्ट्रामध्ये हि अपेक्षित कामगिरी करून दाखवता आली नाही. आंध्रमध्ये वायएसआर रेड्डी सारख्या नेत्याने शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उचलून धरला. कॉंग्रेसला शेतकऱ्यांनी मदत केली. त्या पेक्षाही त्यांना त्यांच्या स्लोगनने मदत केली.

कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ

लीओ बर्नेट नावाच्या कंपनीने हे स्लोगन बनवलं होतं. वाजपेयींचे सरकार उद्योगपतीचे सरकार आहे तर कॉंग्रेस हि गरीब जनतेसोबत आहे हे ठसवण्यात ते यशस्वी झाले. भाजपने विकास केलाय, चांगले दिवस आणले आहेत यावर लोकांचा विश्वास ठेवला नाही.

फील गुड फॅक्टर फेल गेले. 

पाठोपाठ आलेल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील भाजप शिवसेना युतीचा पराभव झाला. सगळ खापर फोडलं गेल होतं प्रमोद महाजन यांच्यावर.

याच निवडणुकीनंतर आप कि अदालत या टीव्ही शो मध्ये प्रमोद महाजन यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांना कटघऱ्यात उभे करून इंडिया शायनिंग वर प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा मात्र प्रमोद महाजन यांनी स्पष्ट केल केल की इंडिया शायनिंग आणि फील गुड हे दोन्ही शब्द माझे नव्हते. त्यांनी या स्लोगन मागची कहाणी सुद्धा सांगितली.

इंडिया शायनिंग हा नारा मुळात निवडणुकीचा नारा नव्हताच.

जसवंतसिंग यांच्या अखत्यारीत असलेल्या अर्थमंत्रालयाने निवडणुकीच्या आधी एक वर्षापूर्वी परदेशातल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एका जाहिरात कंपनीला कॉन्टरॅक्ट दिलेलं. ग्रे वर्ल्डवाइडचे राष्ट्रीय सर्जन संचालक प्रताप सुथन हे या घोषणेचे निर्माते होते.

तर फील गुड हा शब्द अडवाणी यांचा होता.

इकोनोमिक टाईम्सच्या अवार्ड फंक्शनवेळी स्टेजवर लावलेली रेमंडची जाहिरात पाहून भाषणात अडवाणी यांनी फील गुड हे वाक्य वापरलं होतं.भाजपने त्यालाच कॅम्पेन बनवलं. जवळपास शंभर कोटी अधिकृतरित्या भाजपने टीव्ही, वर्तमानपत्रातील बातम्यांतील कॅम्पेन वर खर्च केले होते. बाकीचा खर्च पकडला तर तो किती याची कल्पना हि करता येणार नाही.

प्रमोद महाजन यांनी मुलाखतीमध्ये या दोन स्लोगनची जबाबदारी घेण्यास नकार दिला. मात्र दिलदारपणे हे मान्य केलं कि,

“या हायटेक प्रचारामुळे आमचा पराभव झाला. या प्रचारामुळे आम्ही गाफील राहिलो. त्याच्यासोबत जर कार्यकर्त्यांना घरोघरी जाण्यासाठी आम्ही प्रेरित केलो असतो तर निवडणुकीचा निकाल कदाचित वेगळा असता.”

आज प्रचाराची सगळी गणिते बदलली आहेत. प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार सोशल मिडिया वरील प्रचार, टिकटॉकवरील गाणी, चमकदार स्लोगन यावर भर देतोय. गल्लोगल्ली इलेक्शन कॅम्पेन मॅॅॅनेजर उगवले आहेत.

पण आजही भारतातील सर्वात मोठा चाणक्य समजल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन यांचा घरोघरी पोहचण्याचा संदेश जो विसरेल त्याच्या आत्मविश्वासाला या निवडणुकीत मोठा फटका बसेल हे नक्की.

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. Sachin datir says

    ????????????????????????

Leave A Reply

Your email address will not be published.