शिर्डीतील फुल विक्रेत्यांच्या राड्यामागे देवस्थानातल्या फुलांची लय मोठी इकॉनॉमी आहे…

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये अग्रक्रमावर नाव येतं ते शिर्डी संस्थांनाचं. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील भाविक साईबाबांच्या दर्शनाला इथं येतात. फक्त देश काय तर विदेशातूनही पर्यटकांची गर्दी होते हे देवस्थान बघायला, इथली भव्यता बघायला. म्हणून नेहमी देवस्थान गजबजलेलं असतं. नेहमीच माध्यमांच्या चर्चेत असतं.

गेल्या २-३ दिवसांपासून हे देवस्थान असंच हेडलाईन्समध्ये आलं आहे. मात्र भाविकांची गर्दी, एखादी यात्रा यामुळे नाही तर या देवस्थानावर सुरु असलेल्या राड्यामुळे. 

मंदिर प्रशासनाविरुद्ध विक्रेत्यांच्या आक्षेपावरून हा राडा सुरू आहे. झालंय असं की साई संस्थानाने गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून मंदिरात हार, फुल, प्रसाद आणण्यास बंदी घातली आहे. कोरोना काळ होता तेव्हा ही बंदी घालण्यात आली होती. आता जवळपास १० महिने झाले आहे, कोरोनाचे नियम शिथिल झाले आहेत, जवळजवळ नाहीसे झाले आहेत. तेव्हा ही बंदी उठवण्यात यावी अशी मागणी हार-फुल विक्रेते करत आहेत. 

यासाठी आंदोलन, उपोषण केलं जात आहे. कालच २६ ऑगस्टला सुमारे दीडशे ते दोनशे हार-फुल विक्रेत्यांनी हातात फुलांच्या माळा घेऊन दर्शनरांगेतून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं आणि त्यांच्याकडील हार, फुलं, प्रसाद ताब्यात घेतले. तेव्हा विक्रेत्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यातील काही जणांना शिर्डी पोलिसांकडून १४९ च्या नोटिसा बजावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

तर मंदिरात फुल, प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी म्हणून २२ ऑगस्टपासून काही विक्रेत्यांनी उपोषण देखील सुरू केलं आहे आणि परवानगी मिळेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मात्र मंदिर प्रशासन त्यासाठी तयार नाहीये. म्हणूनच हा वाद पेटला आहे. 

कोरोनानंतरही बंदी न उठवण्याबाबत शिर्डी मंदिर संस्थांनाचं काय म्हणणं आहे? 

फुल-माळांच्या निमित्ताने भाविकांची लूट होत आहे. दोनशे रुपयांची फुल माळ दोन हजारांना विकली जाते. तर समाधीवर चढवली जाणारी फुलं गर्दीत भाविकांच्या हातून मंदिरात पडतात आणि त्यानंतर पायाखाली तुडवली जातात. यामुळे एक प्रकारे फुलांचा चिखल तयार होत आहे आणि अस्वच्छता निर्माण होत आहे.

सफाईसाठी अधिक वेळ लागत असल्याने याचा परिणाम भाविकांच्या दर्शनाच्या वेळेवर देखील होत आहे.  भाविकांची होणारी फसवणूक आणि खराब, अस्वच्छ परिसर बघून मंदिराची वाईट होणारी प्रतिमा बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने फुल हार-बंदीचा ठराव करुन अंमलात आणला असल्याचं साई संस्थानचं म्हणणं आहे. 

विक्रेते आक्रमकपणे मागणी करण्याचं काय कारण आहे?

कोरोनाकाळात लावण्यात आलेल्या या बंदीमुळे परिसरातील शेतकरी, हार, फुल आणि प्रसाद विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शिर्डीत दरवर्षी सुमारे ३ कोटी भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. 

साईबाबांना फुल आवडायची म्हणून श्रद्धेचा भाग म्हणून भाविक आवर्जून फुलं खरेदी करतात आणि मंदिरात वाहतात.

विक्रेतेच नाही तर फुलाची शेती करणारे शेतकरी देखील अडचणीत सापडतील.  

फुलांची मागणी बघता फुलांची शेती देखील परिसरातील शेतकऱ्यांनी फुलवली आहे. जवळपास १०० एकरमध्ये शेतकरी फुल शेती करतात. दररोज १० ते १५ लाखांची उलाढाल फुल व्यवसायातून होत असते. सुमारे २ हजारांपेक्षाही जास्त लोकं फुल व्यवसायावर अवलंबून आहेत. अशात या बंदीने शेतातच फुले सडू लागली आहेत, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढू लागला आहे. 

वेळोवेळी संस्थान प्रशासनाला निवेदनं, लाक्षणिक उपोषण करुनही बंदी उठवण्यात आली नाही, म्हणून आम्ही आता आक्रमक झालो आहोत, अशी माहिती विक्रेत्यांनी माध्यमांना दिली आहे.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर एक मुद्दा जाणवतोय की प्रामुख्याने हार-फुल विक्रेते जास्त आक्रमक होत आहेत. म्हणून शिर्डी देवस्थान संस्थानात फुलांची इकॉनॉमी काय सांगते? हे बघणं गरजेचं ठरतं.

ही फुलांची इकॉनॉमी जाणून घेण्यासाठी बोल भिडूने शिर्डीतील एका दोन व्यक्तींशी संपर्क साधला ज्यांना तिथल्या स्थानिक फुलांच्या व्यवसायाची माहिती आहे. संबंधित साईभक्त शिर्डीचे मूळ निवासी असून त्यांची तिसरी पिढी फुलांच्या व्यवसायात आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी माहिती दिली आहे.

ती माहिती अशी की, शिर्डीमध्ये प्रामुख्याने गुलाब, निशिगंध, झेंडू, शेवंती या फुलांची मागणी आहे. त्यातल्या त्यात जे बघायला गेलं तर गुलाब हे सगळ्यात जास्त मागणी असणारं फुल आहे. त्यानंतर साई बाबांना वाहिल्या जाणाऱ्या हारांसाठी झेंडू, निशिगंध आणि शेवंती यांना जास्त पसंती असते. 

गुलाबाच्या फुलांबद्दल जर सांगायचं तर काही फुलं मुंबई मार्केटमधून येतात तर काही नाशिक मार्केटमधून आयात केले जातात. झेंडू, शेवंती सारखी फुलं शिर्डीच्या आसपासच्या ५-१० किलोमीटर अंतरातील परिसरातच पिकवली जातात. प्रॉपर शिर्डीत फुलांची शेती नाही. 

काही वेळा मुंबई-नाशिक मार्केटमधूनही ही फुलं मागवली जातात. बाहेरून येणाऱ्या या फुलांचे मार्केटमधील व्यापारी आणि दुकानदार ठरलेले असतात. 

काही विक्रेत्यांनी इतर वस्तूंच्या दुकानदारांकडून त्यांच्या दुकानासमोरील जागा भाड्याने घेतलेली असते. गड्यांच्या साहाय्याने हार बनवले जातात आणि मग स्टॉल लावून ते विकले जातात. 

या विक्रेत्यांमध्ये काही प्रकार आहेत. एक म्हणजे जे दुकानात विकतात, दुसरे स्टॉलवाले, काही गळ्यात फुलांच्या माळा अडकून विकतात तर काही जण दर्शनरांगेत माळा विकतात. 

फुल विक्रेत्यांची संख्या जास्तीत जास्त ३०० पर्यंत सांगता येईल. यात दुकानातुन फुल विकणाऱ्यांची संख्या ३०-४० आहे. फेरीवाल्यांसारखे फुल विक्रेते म्हटलं तर त्यांची संख्या १००-१५० पर्यंत ग्राह्य धरा. व्यापाऱ्यांची संख्या जर सांगायची तर १०० व्यापारी. हे व्यापारी बाहेरून आलेली फुलं किंवा शेतकऱ्यांकडून फुलं घेतात आणि दुकानदारांना विकतात. 

होलसेल फुल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांचं बजेट बघितलं तर दररोज ४० ते ५० हजार रुपयांची फुलं घातली जातात. त्याची किंमत डबल करून विकली तरी दिवसाच्या उलाढालीचा एक लाखभर त्याचा आकडा आहे.

अशाप्रकारे महिन्याची उलाढाल २५ ते ३० लाखांपर्यंत जाते, ही ग्राउंड परिस्थिती आहे. यापुढे टर्नओव्हर जात नाही. माध्यमांत दाखवला जाणारा ‘दिवसाला १० ते १५ लाख’ एकदा फर्जी आहे, कारण तो गोंधळ करून हार विकणं आणि त्यातून मिळालेल्या पैशांवर आधारित आहे. 

इथून स्टोरीत जरा ट्विस्ट आला. शिर्डीतील मूळ रहिवासी असलेल्या साईभक्तांनी सांगितलं कि,

शिर्डीतली मूळ लोकसंख्या १५ ते २० हजार आहे ते या व्यवसायात नाहीत. हे लोकं फुल विक्री धंद्यात असण्याचं प्रमाण नगण्य आहे. प्रसाद, बाबांचे कपडे अशा इतर गोष्टी ते विकतात. फुल-हार विक्रेत्यांमध्ये शिर्डीच्या बाहेरील विक्रेतेच बहुतांश आहेत, एव्हाना तेच आहेत असं म्हणायला हरकत नाही. बाहेरचे म्हणजे शिर्डीमध्ये न राहणारे, आसपासच्या तालुक्यांतील किंवा पुणे, हैद्राबादवरून आलेले लोक यामध्ये मोडतात. 

हेच विक्रेते माध्यमांसमोर येऊन आंदोलन करत आहेत, कारण मंदिराने घेतलेला चांगला निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा नाहीये. बंदी घालण्याचा आधीची परिस्थिती सांगायची तर जे लोक इथे येऊन हा व्यवसाय करत आहेत त्यांनी भाविकांना फसवणं सुरु केलेलं. १० रुपयांचा फुलगुच्छ १०० ला विकला जातो. एजंट लोक हे करत असतात. 

शिर्डीतले व्यापारी त्यांना पॉलिशवाला असं म्हणतात.

भाविकांची फसवणूक होत असल्याने मंदिर आणि शिर्डी ग्रामस्थांची प्रतिमा खराब झाली होती. गेल्या काही वर्षांमध्ये पाकीटमार, चोऱ्या यांचं प्रमाण वाढलं. हेच रोखण्यासाठी मंदिराने घेतलेल्या या निर्णयाचं शिर्डी वासियांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे आज शिर्डी जेवढी शांत झाली आहे तेवढी कधीच नव्हती.

फुल शेतकऱ्यांमाबद्दल सांगायचं तर शिर्डीच्या आजूबाजूच्या परिसरातून रोज ३० ते ४० हजारांचे फुलं बाहेर जातात. त्यामुळे फुल शेतकऱ्यांना फटका बसलेला नाही. आधी महिन्याला २५-३० लाखांवर होणारी उलाढाल आता देखील शाबूत आहे कारण फुलं शेतात सडत नाहीये, त्यांनी बाहेरच्या मार्केटचा रस्ता निवडला आहे. 

शिवाय शिर्डीत गुलाब फुल विकल्या जात आहे. फुलगुच्छ मंदिराचे अधिकारी गेटवर जमा करतात आणि बाबांच्या चरणी वाहतात. तर काही लोकं परतीच्या वेळी फुल घेऊन जातात. राहिला प्रश्न प्रसाद विक्रेत्यांचा तर त्यांना फटका बसलेला नाहीये. कारण असंही प्रसाद घरी घेऊन जाण्यासाठी जास्त वापरतात. तेव्हा भाविक मंदिरातून बाहेर आले की प्रसाद घेतातच.

हे सर्व गोंधळ का केला जातोय? यावर दोघांनी सांगितलं…

“राजकारण करतांना सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं”

अशी ही शिर्डीतील फुलांची उलाढाल आहे. बंदी तर अजूनही कायम आहे. तेव्हा उपोषण आणि निर्देशन कोणतं वळण घेतंय, येणारा काळ सांगेल…

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.