शर्ट काढून सिनेमा हिट करता येतो हे सगळ्यात आधी धरम पाजीला कळालं होतं..

दबंग सिनेमात सलमान खान आणि सोनू सूद ची हाणामारी सुरू असते. अचानक सल्लुचे दंड फुगतात आणि त्याचं शर्ट फाटतं. आणि मग बलदंड शरीर दाखवत भाईजान रागात सोनू सूद कडे पाहत असतो. काही वेळ कॅमेरा क्लोज अप अध्ये भाईजानच्या पिळदार शरीराकडे स्थिरावतो. भाईजानचे फॅन असाल, नसाल तरी हे दृश्य पाहून टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायचा मोह आवरत नाही.

काही अपवाद सोडले तर सलमानच्या प्रत्येक सिनेमात त्याचा असा एकतरी शर्टलेस सीन असतोच असतो. सलमान या बाबतीत जरी ग्रेट असला तरी त्याआधी सुद्धा एका कलाकाराने असा सीन केला होता. आणि तो सीन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड हाऊसफुल गर्दी केली होती.

हा कलाकार म्हणजे धर्मेंद्र. आणि तो सिनेमा म्हणजे ‘फुल और पथ्थर’.

१९६६ चा काळ होता. राजेश खन्ना, शम्मी कपूर सारखे कलाकार रोमँटिक सिनेमे गाजवत होते. बॉलिवुड आणि प्रेक्षकांना सुद्धा अशा सिनेमांची एक सवय लागली होती. अशा काळात ओ. पी. रलहान यांनी ‘फुल और पथ्थर’ सिनेमा बनवणं हे धाडसाचं काम. परंतु हा सिनेमा रिलीज झाला आणि संपूर्ण भारतभरात एकच चर्चा झाली ती म्हणजे धर्मेंद्र ची.

धर्मेंद्र ला एक अभिनेता म्हणून वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या फुल और पथ्थर सिनेमात असं काय खास होतं? शर्टलेस धर्मेंद्र ची इतकी चर्चा का झाली ? जाणून घेऊ..

जेव्हा दिग्दर्शक ओ. पी. रलहान यांनी सिनेमा बनवायला घेतला तेव्हा सिनेमातील डॉन ची भूमिका सुनील दत्त यांनी करावी, अशी त्यांची इच्छा होती. काही कारणास्तव दत्त साब ना सिनेमात काम करणं जमलं नाही. पुढे रलहान यांनी डॉन च्या प्रमुख भूमिकेसाठी धर्मेंद्र ची निवड केली. धर्मेंद्र त्यावेळी स्टार नव्हता. पण त्याने स्वतःची ओळख मात्र निर्माण केली होती.

धर्मेंद्र च्या साथीने रलहान यांनी सिनेमा बनवायला सुरुवात केली. सर्व सुरळीत सुरू होतं. परंतु शूटिंगदरम्यान रलहान साब चा स्वभाव धर्मेंद्र ला खटकला. उगाच सर्वांवर डाफरणाऱ्या आणि वेगळ्या माजात असणाऱ्या ओ. पी. रलहान यांच्यासोबत काम करणार नाही असं धर्मेंद्र ने ठरवलं. परंतु सर्वांनी धरम पाजींना समजावलं.

आणि तेव्हा कुठे पुन्हा एकदा शूटिंग करायला धर्मेंद्र तयार झाले.

सिनेमात एक प्रसंग आहे जिथे धर्मेंद्र दारूच्या नशेत असतो. त्याचा हा अवतार पाहून मीना कुमारी ला थोडी धास्ती वाटते. म्हणून ती अंथरुणावर जाऊन झोपते. इतक्यात संपूर्णपणे उघडा असलेला धर्मेंद्र तिच्या घराचं दार उघडतो. आणि मीना कुमारी जवळ येतो. तो झोपलेल्या मीना कुमारी ला काही क्षण पाहत असतो. मीना कुमारी भीतीने अंग चोरुन झोपली घेते. प्रेक्षक म्हणून आपलीही खात्री झाली असते, की दारूच्या नशेत शर्टलेस धर्मेंद्र काहीतरी वाईट कृत्य करणार.

परंतु मीना कुमारी कडे काही क्षण पाहिल्यानंतर धर्मेंद्र तिच्या अंगावर पांघरुण घालतो आणि तिथून निघून जातो.

तुम्हाला वाटलं असेल त्यात काय एवढं? परंतु भिडूंनो, हा छोटासा सीन एकही संवाद नसताना सुद्धा खूप काही सांगून जातो. संपूर्ण सिनेमात दगडाचं काळीज असणाऱ्या डॉन च्या भूमिकेत धर्मेंद्र वावरत असतो. हा डॉन कठोर जरी वाटत असला तरी तो आतून प्रेमळ आहे, हे या सीन मुळे आपल्याला कळतं. तसेच त्या काळातल्या हिरोने असा शर्टलेस सीन देणं ही फार अनोखी गोष्ट होती. या सीन विषयी स्वतः धर्मेंद्र एका मुलाखतीत म्हणाले होते,

“स्वतःचा शर्ट काढून या संपूर्ण शॉट मध्ये वावरणं ही माझीच कल्पना होती. शर्ट काढल्यामुळे सिनेमा सुपरहिट झालाच शिवाय माझ्या करिअरला सुद्धा मार्ग मिळाला”.

धरम पाजी जे म्हणाले ते अगदी खरं. कारण १९६० दरम्यान जिम वैगरे गोष्टी अस्तिवात नव्हत्या. त्यामुळे व्यायाम करुन शरीर तंदुरुस्त ठेवणारे धर्मेंद्र सारखे फार कमी कलाकार होते. धर्मेंद्र अभिनयात ग्रेट होताच. शिवाय शारीरिक दृष्ट्या धर्मेंद्र किती सुदृढ आणि फीट आहे ही गोष्ट सर्वांना कळली. धर्मेंद्र च्या या सीन ची जोरदार माऊथ पब्लिसिटी झाली.

धर्मेंद्र ने नेमकी काय किमया साधली आहे, हे बघण्यासाठी फुल और पथ्थर सिनेमाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

उत्तम शरीरामुळे सर्वजण धर्मेंद्र ला बॉलिवूडचा HE – MAN म्हणू लागले. या सिनेमाची आणखी एक विशेष गोष्ट अशी, त्या काळात सिनेमातील हीरो – हिरोईन च्या ओठांवर गाणी असायची. या सिनेमात बॅकग्राऊंड ला गाणी वाजतात. परंतु धर्मेंद्र एकही गाणं गुणगुणताना दिसत नाही.

फुल और पथ्थर सिनेमा ५० आठवडे चालला. धर्मेंद्र ला फिल्मफेयर साठी बेस्ट अॅक्टर म्हणून नामांकन मिळाले. याच वर्षी देवानंद यांचा ‘गाईड’ सिनेमा रिलीज झाला होता. त्यामुळे गाईड साठी देवानंद यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. धर्मेंद्र यांचा फिल्मफेअर पुरस्कार जरी हुकला असला तरी ‘फुल और पथ्थर’ मुळे धर्मेंद्र बॉलिवूडचे स्टार झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.